तुमच्या कृपेचे पोसणे
137.
तुमच्या कृपेचे पोसणे मी हरी । तुम्हांविण दु:ख वारी कोण माझे ॥१॥
भवताप श्रम निवारी दयाळा । मागणे गोपाळ हेचि असे ॥२॥
काया वाचा मने संतांची ते सेवा । आन नको हेवा दुजा कांही ॥३॥
चोखा म्हणे देवा नको धरू दुजे । उतरा हे वोझे संसाराचे ॥४॥
