जीवीचे गुज राही रुक्
956.
जीवीचे गुज राही रुक्माईसी पुसे | न धरवे मज हांसे नवल वाटे ॥१॥
काय अभिश्राप आला देवराया | केली आपणया आत्मशुद्धी ॥२॥
हे मज बाई सत्य सांगा वाणी | कवणे चक्रपाणि भुलविले ॥३॥
सूर्य आणि अंधारू वर्ते एके ठायी | हे भूतभविष्य नाही वर्तमान ॥४॥
ऐसे हे अघटित जरी घडेल प्रसंगी | तरीच दोष संसर्गी देवराया ॥५॥
अग्निमाजी बीजे पाल्हेजती सुरवाडे | की बुडाले सांपडे लवण जळी ॥६॥
ऐसे हे अभिनव जरी घडेल प्रसंगी | तरीच संसर्गी पडती देवो ॥७॥
ज्योतीसी अळूमाळू मिळाल्या कर्पुरी | पुढती त्यासी उरी उरे जरी ॥८॥
ऐसे होय जरी या त्रिभुवनामाझारी | तरीच 'केशिराजी वसती दोष ॥९॥
तरी हे न कळे माते सांगावे साचार | सर्वज्ञ चतुर बडील तुम्ही ॥१०॥
रुक्माई म्हणे या नामयाचे चाडे | अनंत पवाडे केले देवे ॥११॥
