रुक्माई म्हणे परीयेस
957.
रुक्माई म्हणे परीयेसी वो आरजे | सांगेन सकळ जे वर्म तुज ॥१॥
अनाथा माहेर एक चक्रपाणि | बहु दिनालागोनी लोभापर ॥२॥
म्हणोनि भुलला देव नाम्याचेनि लोभे | कमे शुभाशुभ अंगिकारी ॥३॥
आवडीचा वोरसु न करी कायकाय | हा प्रसिद्ध अनुभव आहे लोका ॥४॥
विषम विषयसुख विषयाचे गळाले | तयांचे सोहळे करिती लोक ॥५॥
आंधळे पांगुळे मुके अनरगंळ | परी जीवापरिस बाळ पढिये माते ॥६॥
अंतरीच्या कळवळे खेळवी लाडेंकोडे | परि विलासाचे नावडे चोख चांग ॥७॥
प्रीतीच्या पडिघरे नेघे पै विकृती | देखोनि विश्रांति थोर मानी ॥८॥
म्हणे माझे आळीकर दिठावेल झणी | इडापीडा घेउनी वदन चुंबी ॥९॥
स्नेहाच्या संभ्रमे नेणे लोकलाज | उचलोनि भुज घाली कंठी ॥१०॥
तनुमनप्राणांची करूनी ओवाळणी | जावे हे माझेनि म्हणे जीवे ॥११॥
तैसीच परी आहे या विठ्ठलाच्या ठायी | चित्त याच्या पायी ठेविले जेणे ॥१२॥
न पाहे तयाचे जाती कुळ कर्म | वर्णाश्रमधर्म शुद्ध वाणी ॥१३॥
अनंत जन्मांचा कायामनेंवाचा | आहे या दोघांचा ऋणानुबंधु ॥१४॥
तो नकळे न सुटे कोणिये कल्पांती | जिवलग सांगाती जाला नामा ॥१५॥
