वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

देहनगरी मन राजा ।

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076075 · अभंग क्र. ४२६

426.
देहनगरी मन राजा ।
राज्य चालवी आपुले ।
दोघी स्त्रिया तयालागी ।
निवृत्ती प्रवृत्ति हे भले ।
निवृत्ति ज्ञानाची कन्या ।
प्रवृत्ति अज्ञानी वोतले ।
सवतीमत्सर दोघी ।
तया भांडण लागले ॥१॥
ऐसा सावध श्रोते तुम्ही ।
करा निवाड दोघींचा ।
भांडती त्यापरोपरी ।
थोर गर्जताती वाचा ।
निवृत्ति न बीहे कोणा ।
मन भोगी प्रवृत्तीचा ।
तयाचिया बळे दोघी ।
वर्म काढती हे साच ॥२॥
प्रवृत्तीने व्याप केला ।
पुरे पठणे बसविली ।
देश दुर्गे नानापरी ।
राया पाडियेली भुली ।
पुत्र कन्या प्रजा कैसी ।
येकायेकी प्रसवली ।
लावण्य दाविले मना ।
प्रवृत्तीने ख्याती केली ॥३॥
प्रवृत्ति-“सर सर वेडिये बाई ।
तुझे नामचि निवृत्ति ।
येथे तुज ठाव कैचा” ।
घाली बाहेर प्रवृत्ति ।
निवृत्ति-“ऐक वो तू म्हणने माझे ।
ऐक वचन तू बाई ।
तुज मुळी ठावो कैचा ।
मुळी मीचि आहे पाही ॥४॥
पठराणी माझे नाव ।
रावो विसरला देही ।
देखोनी लावण्य तुझे ।
भ्रम जालासे कायी ।
जाय वो तू परती ।
होय तुझे लावण्य लटिके॥
अज्ञान हा पिता तुझा ।
मुळी पाहे आधी निके” ॥५॥
प्रवृत्ति-“प्रवृत्ति हे काय बोले ।
“ऐक वचन सवती ।
ब्रह्मादिक बाळे माझी ।
ऐसी नेणती तू ख्याती ।
रविचंद्रादि देव अवघे ।
माझ्या गृहात असती ।
सनकादिक माझे नातू ।
ऐसे कळो तुझे चित्ती” ॥६॥
निवृत्ति-“आम्ही नारी पठाचिया ।
अखंड रायाचे शेजारी ।
घरचार करावया ।
दाही घातली बाहेरी ।
ब्रह्मादिक बाळे पाळी ।
पठराणी येईल सरी ।
चंद्रसूर्यादिक तेही ।
माझे सत्तेने निर्धारी” ॥७॥
प्रवृत्ति-“तू तव पठाची खरी ।
ऐसे बोलसी वचन ।
रावणाने सीता नेली ।
तै का न चाले मजविण ।
दंभाची स्त्रिया केली ।
एवं मिथ्या तू बो जाण ।
प्रवृत्ति मी थोर गाढी ।
नाही नाही मजविण” ॥८॥
निवृत्ति-“ऐके बा विदेह माझा ।
पिता ज्ञानी हा समर्थ ।
होते मी रामाचपासी ।
यज्ञ करावयया तेथ ।
परी मी अदृश्य रामी ।
तू वो नोळखसी सत्य ।
तुझेअंग क्रिया माझी ।
तुम्हा सर्व साक्षाभूत” ॥९॥
प्रवृत्ति-“ऐक वो का बोलतेसी ।
तुझे संगे सुख नाही ।
म्हणउनी मज प्रवृत्तीसी ।
माळ घातली पाही ।
अवतारही कृष्णादिक ।
मजसाठी कष्टी तेही ।
कासया बोलसी व्यर्थ ।
अदृश्य हे मिथ्या देही” ॥१०॥
निवृत्ती-“उन्मनी हे नाम माझे ।
मज निर्गुणाचा संग ।
सगुण आरते बाई ।
मी तव अव्यय अभंग ।
प्रवृत्ति हे माझी सत्ता ।
मना लागला झोटिंग ।
मनपण आले मना ।
माझिया आलेसे बघ” ॥११॥
प्रवृत्ति-“ऐक वो निवृत्ति एक ।
तुझे स्तळ येथे कोण ।
इतुके सांगे मज ।
मी वो जाईन येथून ।
कन्यापुत्रासमवेत ।
राज्य टाकून जाईन ।
यासी जरी मिथ्या होय ।
तरी रायाचीच आण” ॥१२॥
निवृत्ति-“निरंजनवन स्थळ ।
माझे निवृत्तीचे आहे ।
भाऊ माझा परमार्थ ।
यासी मिथ्या बाई नोव्हे ।
भाव आणि निजबोध ।
पुत्र शांति क्षमा होय ।
ऐसी निवृत्ति कन्या ।
ज्ञानाची हे बोलो जाय” ॥१३॥
प्रवृत्ति-“निवृत्तीसी शब्द नाही ।
निरंजनी पाहे बाई ।
परादिक वाचा फिरे ।
तरी येथे तुझे काई ।
बोलसी जिये वाचे ।
ते तव प्रवृत्तीचे आहे ठायी ।
तुझे बाई काय येथे ।
हो सावध तू देही” ॥१४॥
निवृत्ति कुंठित झाली ।
प्रवृत्तीने जिंकियेले ।
तव एक आठवले ।
तुझे माहेर वहिले ।
निवृत्ति-“सांग वो मजलागी ।
मायबाप कोण बोले ।
इतुके सांग वो बाई ।
खरे खोटे तेथे कळे” ॥१५॥
प्रवृत्ति-“अज्ञान हा पिता ।
माझा अहंकार पूर्वज ।
मोहो काम क्रोध पुत्र ।
कन्या आशादिक मज ।
क्षेत्र हे हो घर माझे ।
काय पुसतेस्सी मज ।
जाय तू येथोनी ।
आता नये बोलता लाज ॥१६॥
निवृत्ति-“घर जेव्हा जळे तुझे ।
तेव्हा कोठे तू राहसी ।
अज्ञान हे पळे जैसे ।
रवि-प्रकाश तमासी ।
मनपण मन सांडी ।
तै तू कोठे गे बाई ।
हागवण गेली मग ।
कैचा ठावो कडतरासी ॥१७॥
बरे तो सवतीबाई ।
मग जेव्हा विषयी विटे ।
तेव्हा सांडिले प्रवृत्ति ।
तुज तव देसवटा ।
आला, ऐसे जाण चित्ती ।
बोलसी ते शब्द वाया ।
जाय परती प्रवृत्ति ॥१८॥
प्रवृत्तीचे भान मिथ्या ।
ज्ञान पाहसी जरी बाई ।
अज्ञान ही मान दोन्ही ।
जाली स्वरूपाचे ठायी ।
अज्ञाना ठावो नाही ।
मी हे आहे कोण कायी ।
इतुकेनिच हे आहे आधी ।
शरण रिघे गुरूपायी” ॥१९॥
प्रवृत्ति-प्रवृत्ति मानली मोठी ।
म्हणे “निवृत्ति बहिणी ।
तुम्ही आम्ही नांदो येथे ।
सुखे सुख मनपणी ।
गुरू तो कवण तेथे ।
मग सांग वो निर्वाणी ।
शरण मी आले तुज ।
जोडूनिया कर दोन्ही” ॥२०॥
निवृत्ति-“ऐक वो वचन येक ।
प्रवृत्ति हे तुझे नाव ।
प्रवृत्तीचा धर्म तोचि ।
भ्रतारासीच भजावे ।
मनाचे तू धरी पाय ।
सुख पावसी स्वभावे ।
हे मन उन्मन पदाते ।
ज्ञाने पावसील दैवे” ॥२१॥
मी हे कोण आठविता ।
नामे प्रवृत्ति तत्त्वता ।
मनचि उन्मन जाले ।
ठेविताचि चरणी माथा ।
सवतीचा द्वैत गेला ।
अवघी निवृत्ति तत्त्वता ।
येकरूप दोघी झाल्या ।
सवती भांडता भांडता ॥२२॥
बहेणि म्हणे प्रवृत्तीत ।
अवघी निवृत्ति आहे ।
अज्ञानाचे मूळ सांडी ।
आपणचि द्वैत जाये ।
विकल्प हा स्वये तुटे ।
तेथे द्वैत कैचे राहे ।
सवती त्या एकरूपा ।
मनपणी मन आहे ॥२३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग