वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

ऐका तुम्ही भाविक सज्

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076118 · अभंग क्र. ४२७

427.
ऐका तुम्ही भाविक सज्जन ।
काही एक बाळकवचन॥
आत्म्या-काये लागले भांडण ।
साधुसंती द्यावे निवडून ॥१॥
काया म्हणे आत्मयासी “पाहे ।
मज स्वामी मोकलिसी काये॥
हे तो तुज उचित पै नव्हे ।
आधी बरे विचारी का हे ॥२॥
मर मर आत्मया रे नष्टा ।
मज येथे सांडिसी पापिष्टा”॥
येरू म्हणे “ऐक काय माझे ।
देह तव लटिके सहजे ॥३॥
आत्मा अविनाश श्रुति गर्जे ।
का बा व्यर्थ भांडिसी सांगिजे॥
सोडी मज वेडिये अज्ञाने ।
तुज मज वेगळीक ज्ञाने” ॥४॥
काया-“ऐके स्वामी आत्मया जिवलगा ।
मजसंगे सुख तुज की गा॥
नानापरी सोसुनी की गा ।
सेखी मज सांडुनी जासी गा” ॥५॥
आत्मा-“ऐक वेडे नाव हे समुद्री ।
प्राण्यालागी नेत पैलतीरी॥
नाव राहे उदकी जयेपरी ।
तैसे तुज जाहाले सुंदरी” ॥६॥
काया-“तुजमज वियोगचि नाही ।
जाण्याआधी सांगेन तुज पाही॥
टाकावे हे उचितचि नाही ।
सेवा मजपासुनिय घेई” ॥७॥
आत्मा-“अश्वावरी पार्थिव बैसला ।
नेउनिया स्वस्थानी उतरला ।
आंतरसुख काये, प्राप्त त्याला ।
अश्वा प्राप्त झाली अश्वशाळा” ॥८॥
काया-“रतिसुख आत्म्या मजसी ।
नानापरी घेतले विशेषी॥
इंद्रियद्वारे सुख घेसी ।
सेखी मज पापिष्टा सांडिसी !” ॥९॥
आत्मा-“लोहारासी अग्निचाड आहे ।
म्हणउनिया फुंकिती उपाये॥
कार्य झाल्या टाकील सर्व हे ।
तैसे तुझे काम आम्हा काये ॥१०॥
लोहोसंगे अग्न भासे परी ।
घण पडिती लोहाचेच शिरी॥
तैसे तुझे संगती माझारी ।
असोनिया अलिप्त सुंदरी” ॥११॥
काया-“आम्ही तव पतिव्रता नारी ।
स्वामी जाता जाळून शरीरी॥
तू रे तव नष्ट सर्वांपरी ।
भोगुनिया चालिलासी वरी” ॥१२॥
आत्मा-“तुझे नाव पाहता तुकडी ।
तुज आम्हासंगती आवडी॥
निज आत्मा निर्गुण निर्वडी ।
जाय परती आहेसी तू वेडी” ॥१३॥
काया-“मजआत कासया वर्तसी ।
अंती आम्हा सांडुनिया जासी॥
सुखभोग सर्वही तू घेसी ।
अलिप्त हे नाम मिरविसी” ॥१४॥
आत्मा-“तुजमज संगतीच मूळ ।
जैसा चंद्र उदकीच सोज्ज्वळ॥
भासे परी अभिन्न केवळ ।
तैसा कायेमध्ये हा गोपाळ” ॥१५॥
ऐसा आत्मा बोलता आपण ।
मग कुडी पडियेली जाण॥
आत्मा आहे व्यापक परिपूर्ण ।
देही आहे परी विलक्षण ॥१६॥
देह-आत्मा संबंधुचि नाही ।
गुरूकृपे करूनिया पाही॥
तुकारामी निष्ठा पूर्ण तेही ।
बहेणि हे मुळी नाही ॥१७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग