वोखटा तरी मी विटलो द
2869.
वोखटा तरी मी विटलो देहासी । पुरे आता जैसी जोडी पुन्हा ॥१॥
किती मरमर सोसावी पुढती । राहिलो संगती विठोबाचे ॥धृपद॥
आता कोण याचा करील आदर । जावो कलेवर विटंबोनि ॥२॥
तुका म्हणे आता सांडि तेचि सांडि । कोण फिरे लंडी यासी मागे ॥३॥
अर्थ :
हा देह फार वाईट आहे मी याला फार विटलो आहे पुन्हा याची प्राप्ती होणे आता हे पुरे झाले. या देहाचा लाभ करुन घेऊन किती मरमर म्हणजे जन्ममरण पुढे सोसत राहावेत त्यापेक्षा विठोबाशी एकरुप होऊन मी त्याच्या संगतीत राहिलो आहे. आता या देहाचा आदर तरी कोण करेन कितीही या देहाची विटंबना झाली तरी काही हरकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आता या देहाचा त्याग केला म्हणजे केलाच, पुन्हा भामटेपणा करुन याच्याकडे कोण माघारी फिरणार ?
