मग त्या मिळोनिया सकळ
95.
मग त्या मिळोनिया सकळ जनी ।
मध्ये बैसवूनिया शारंगपाणी ।
भोंवत्या खेळविती खेळणी ।
नाचती नाचणी गीतस्वरे ॥१॥
कृष्णा म्हणोनिया आळविती ।
मधुर स्वरे गायने गाती ।
तेणेचि मिसे त्या कृष्णासि स्तविती ।
आणि रंजविती परमात्मया ॥२॥
म्हणती गे नंदयशोदेचे पुण्य ।
उरले त्रैलोक्या पुरोन ।
आम्हा झाले ते सुप्रसन्न ।
कृष्णाकृती या काळे ॥३॥
म्हणोनिया जिवेप्राणे ।
ओवाळिती तनुमने ।
घालूनिया दिव्यासने ।
वरी कृष्णाते बैसविती ॥४॥
करुनिया आनंद सोहळा ।
खेळती नानापरीच्या खेळा ।
लई लई लखोटे पिंगे सकळा ।
फुगडया घलिती निज वारे ॥५॥
हेटी मेटी । कपाळ झेटी ।
पक्के घालिती नमन लल्लाटी ।
टोकर खडेही झेलिती बेटी ।
नाचती टिपरी घेऊनिया ॥६॥
निळा म्हणे ऐशियापरी ।
रंजविती जगदात्मयाहरी ।
आणि घेऊनिया अंकावरी ।
क्रीडा विनोदे खेळविती ॥७॥
