साधावया स्वरूपसिद्धी
709.
साधावया स्वरूपसिद्धी | सिद्ध साधक समाधी |बैसोनी ध्यानबुद्धी | परी तो हरी न सापडे ॥१॥
धन्य धन्य वैष्णव संग | अखंड तेथे पांडुरंग |कीर्तनी नाचतसे अभंग | अखंड काळ सर्वदा ॥२॥
नाम घेता धावे विठ्ठल | नलगे तप नलगे मोल |कष्ट न लगती बहुसाल | हा कृपाळु दीनाचा ॥३॥
नामा म्हणे भक्तीचे कारण | भक्तीसी तुष्टे नारायण |याचे करिता कीर्तन | आपोआप तुष्टले ॥४॥
