काळिया नाथूनि आला वर
3764.
काळिया नाथूनि आला वरी । पैल हरी दाखविती ॥१॥
दुसरिया भावे न कळे कोणा । होय नव्हेसा संदेह मना ॥धृपद॥
रूपा भिन्न पालट झाला । गोरे सांवळेंसा पै देखिला ॥२॥
आश्वासीत आला करे । तुका खरे म्हणे देवा ॥३॥
अर्थ :
लोकाहो, तो पहा, भगवान श्रीकृष्ण कालियाचे मर्दन करून पाण्यातून वर आला आहे. ' तो पहा, पलीकडे दिसतो आहे, ' असे म्हणत ते गोपाळ एकमेकांना दाखवु लागले. प्रेमपूर्वक श्रद्धेवाचुन दुसऱ्या कोणत्याही भावनेने कोणालाही देव दिसणार नाही. शुद्ध, भाव, प्रेम नसले तर देव जवळ असूनही 'तो नाही' 'तो दिसत नाही' असा भ्रम मनात निर्माण होतो. देव अवतार घेतो म्हणजे त्याच्या ब्रम्हरूपात बदल होतो. पूर्वीच्या रामआवतारात दिसणारा देव गोरा होता, तर आताच्या कृष्ण आवतारात तो काळा दिसत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, 'गोपाळांनो, भिवु नका, मी आलोच' असे म्हणत आश्वासन देत, देव तुमच्याजवळ आला.
