हरी गोपाळांसवे सकळा
3765.
हरी गोपाळांसवे सकळा । भेटे गळ्या गळा मेळवूनी ॥१॥
भाविके त्यांची आवडी मोठी । सांगे गोष्टी जीविंचिया ॥धृपद॥
योगियांच्या ध्याना नये । भाकरी त्यांच्या मागोनि खाये ॥२॥
तुका म्हणे असे शाहाणिया दुरी । बोबडिया दास हाका मारी ॥३॥
अर्थ :
सर्व गोपाळा सोबत मिळून हरीने त्यांच्या गळ्याला गळाला लावून सर्वांची भेट घेतली. भाविक गोपाळांची देवाला खूप मोठी आवड आहे त्यामुळे आपल्या अंतरंगातील गुह्य गोष्टी तो गोपाळांना सांगू लागला. जो हरी योग्यांच्या ध्यानस्थ अवस्थेमध्ये त्यांच्या ध्यानी लवकर येत नाही तोच गोपाळांना भाकरी मागून खात आहे. तुकाराम महाराज म्हणतात शहाण्या शब्द ज्ञानी मनुष्य पासून देव दूर राहतो तसेच बोबड्या गोपाळांनी त्याला हाक मारली की तो त्यांच्यापुढे दासा सारखा उभा राहतो.
