अविद्या निशींचा लोटल
118.
अविद्या निशींचा लोटला पहार । रजेंसी लोपला तम अंधकार ।
सत्व शोधित शुद्ध सुमनहार । प्रबोध पाहता परतला कृष्ण वीरवो ॥१॥
आला रे आला रे म्हणती पहा कृष्ण । जैसा निर्जीवा मीनला जीवप्राण ।
श्रुती परतल्या आत्मासाक्षात्कार देखोनि । तैशा विव्हळ गोपिका हरि पाहुन वो ॥२॥
कृष्णापाशीं मिनल्या व्रजनारी । का हो निष्ठुर तू जालासी हरी ।
स्नेह धरिती तयासी होसी दुरी । लोभु सांडीती त्यापाशी निरंतरी वो ॥३॥
थोर शिणलाती तुम्ही मजविण । माझे स्वरुपी ठेविला जीव प्राण ।
माझे भेटीसी तंव नाही खंडन । सब्राह्मा अंतरी माझे अधिष्ठान वो ॥४॥
ऐसे वचन ऐकोनि हरिमुखे थोर चकल्या वियोगाचे दुःखे ।
आम्हांमारिले शस्त्राविण वचन तिखें । शेखी हे ना ते केले संगदोषे वो ॥५॥
कृष्णां गोपिका वेधल्या एका मने । माना मुरडिती प्रीति प्रेमाचें रुसणं ।
जेवी श्रुति परतल्या नेति या वचनें । एका जनार्दनी धरुनी ठेल्या मौन्ये वो ॥६॥
