॥ श्रीएकनाथमहाराजकृत
9.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
सुंदरकांड
॥ अध्याय नववा ॥
दशरथ - कौसल्या विवाहाची पूर्वकथा
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
मंदोदरीकडून रावणाचा अनुनय :
रावण सीतेसी लावितां हात । हनुमान त्याचा करिता घात ।
तो मंदोदरी येऊनि तेथ । अति अनर्थ चुकविला ॥१॥
अतिकायाची जननी । रावणप्रिया वनमालिनी ।
तया रावणा आलिंगूनी । युक्तवचनीं बोलत ॥२॥
स्वदारकाम मजसी रम । मजसी रमणें हा स्वधर्म ।
सीता अकाम चित्ता काम । परम अधर्म अधःपात ॥३॥
सांडी अकाम सीतेंसी । स्वेच्छा रमावें मजसी ।
माझेनि कामे सुखी होसी । सीतेपासीं अति दुःख ॥४॥
सीताहरणामुळे होणारे भावी अनर्थ :
श्रीरामकांता सीता सती । तिचे कामाचे आसक्तीं ।
राक्षसांची जावया व्यक्ती । होईल समाप्ती वंशाची ॥५॥
कुमार प्रधान सेनापती । अश्व गज रथ पदाती ।
इंद्रजित कुंभकर्ण लंकापती । भस्म होती सीताक्षोभें ॥६॥
सर्व रस चाखी माशी । दीप चाखिता दाहो तिसी ।
तेंवी सांडोनि स्वदारेसी । सीतेपासीं भस्मार्थ ॥७॥
निजपुत्राचा द्वेषकरी । खांब हाणिता शस्त्रधारीं ।
हिरण्यकशिपु नखाग्री । सहपरिवारी निमाला ॥८॥
खांबी उठिला नरहरीं । येथे वनी उठेल वनकेसरी ।
सीता सती क्षोभल्यावरी । होईल बोहरी राक्षसा ॥९॥
परस्त्री अभिलाषेची निंदा :
जानकीचे निजगुह्यांत । काय भरले आहे अमृत ।
आमुचे गुह्य विषप्रयुक्त । कडू लागत रावणा ॥१०॥
स्वस्त्रीपरस्त्रीकामकामुक । समान सुखाचे परिपाक ।
स्वदारकामें परम सुख । परम दुःख परदारा ॥११॥
परदारेची आसक्ती । पूर्वजां होय अधोगती ।
आपण पावे नरकाप्रती । वंशसमाप्ती परदारें ॥१२॥
वनमालिनी नानायुक्तीं । शिकवितां त्या लंकापती ।
मंदोदरीने धरोनि हाती । नेला एकांती रावण ॥१३॥
नारदाकडून कळलेल्या कथेचे निवेदन :
बैसवोनि प्रिया एकांती । नारदभाष्यकल्पोक्ती ।
सांगतसे रावणाप्रती । मुनि वदंती जे वदला ॥१४॥
आंगींचिये बळाचे मस्ती । तुवा पुसिले नारदाप्रती ।
मज वधी कोण त्रिजगती । देवीं दैत्यीं की दानवीं ॥१५॥
देवा अटक तू दशकंठ । दैत्यतुज पुढे फोलकट ।
दानवेशीं धीट तिखट । परी नर तुज दुर्धर संग्रामी ॥१६॥
भविष्य पुसो नको रावणा । संकल्पभावी भावना ।
भविष्य चुकवावया जाणा । नाना विंदान करिती प्राणी ॥१७॥
रावणे धरिले दोनी चरण । मज सांगावे माझे मरण ।
नारद जाणे रामायण । सत्य भाषण तो वदला ॥१८॥
रावणा तुझ्या वधार्थीं । कौसल्यासुत राम दाशरथी ।
तो येवोनि लंकेप्रती । करील समाप्ती राक्षसा ॥१९॥
ऐसे सांगोनि रावणाप्रती । नारद निघे ऊर्ध्वपंथीं ।
त्याचे गमनाची गती । त्रिजगती अनुपम्य ॥२०॥
रामनामे वीणा वाजत । श्रीरामनाम मुखी गात ।
नामामृतें नित्य तृप्त । स्वये डुल्लत स्वानंदे ॥२१॥
कीर्तनाच्या संतुष्टी । श्रीरामरूप देखे दृष्टी ।
पदोपदीं आनंदकोटी । सुखसंतुष्टी उल्लासे ॥२२॥
रावणाचा ब्रह्मदेवास प्रश्न :
ऐसे नारदे केलिया गमन । मागे रावण उद्विग्न ।
पाचारोनि चतुरानन । पुसे आपण ते ऐका ॥२३॥
कौसल्या ते कोण कैसी । दशरथ तो कोण कोणाचे वंशीं ।
त्याची वस्ती कोणे देशी । हे मजपासी सांगावे ॥२४॥
नाही कौसल्येचा विवाह झाला । नाही दशरथ उपजला ।
नाही राम जन्माला आला । तै बोलिला नारद ॥२५॥
ऐकोनि रावणाचे वचन । चहू मुखे हांसें चतुरानन ।
नारदाचे जे भाषण । अन्यथा कोण करू शकें ॥२६॥
ब्रह्मदेवाचे कथन :
ब्रह्मा सांगे रावणापासी । कौसल्या कन्या कोसलरायासीं ।
दशरथ तो सूर्यवंशी । अयोध्येसी निजराजा ॥२७॥
त्या दोहींचे पाणिग्रहण । होता रावणे केले विघ्न ।
अन्यथा नव्हे नारदवचन । लागले लग्न समुद्री ॥२८॥
कौसल्या आणि दशरथ । केंवी पा गेले समुद्राआंत ।
कैसेनि लग्न लागले तेथ । श्रोतें वृत्तांत पुसती ॥२९॥
हे तंव जुनाट परिपाटी । काळिकाखंडी गुह्य गोष्टी ।
नारदे देखोनि ज्ञानदृष्टी । वदे जगजेठी निःशंक ॥३०॥
सेतुबंधमाहात्म्यात आलेले वर्णन :
सेतुबंधमाहात्म्यांत । दुसरे एके लघुमाहात्म्यांत ।
थोरलिया माहात्म्यांआंत । ग्रंथ समस्त लिहिला असे ॥३१॥
अहिरावण महिरावण । त्यांचे जनन आणि मरण ।
कौसल्यादशरथपाणिग्रहण । तेथे संपूर्ण लिहिलें असे ॥३२॥
असो या ग्रंथाची ग्रंथोक्ती । झाडा सुचावा पै किती ।
वदनी वदविता श्रीरघुपती । कविता करिता श्रीराम ॥३३॥
माझे अंगी मूर्खपण । लटिकें लिहिले रामायण ।
तेंही वाचितां पै जाण । होय क्षालन महापापा ॥३४॥
ग्रंथ असंख्य आनआन । तेथेंही आनआन निरूपण ।
माझे भावार्थरामायाण । सावधान अवधारा ॥३५॥
कौसल्यादशरथपाणिग्रहण । रावणे करिता अति विघ्न ।
समुद्रामाजी लागले लग्न । ते अतिविंदान अवधारा ॥३६॥
कौसल्येला पेटीतून समुद्रात सोडले :
ब्रह्मा सांगे रावणापासी । कौसल्यादशरथलग्नासी ।
वर्हाड जाते कोसलदेशीं । पांचवे दिवशी लग्नसिद्धि ॥३७॥
ऐसी रावणे ऐकता गोष्टी । कौसल्येवरी क्षोभक दृष्टी ।
धाडी घालोनि उठाउठी । हरिली गोरटी कौसल्या ॥३८॥
रावण पोटी भयभीत । कौसल्या न ठेवी लंकेआंत ।
देंव चिंतिती माझा घात । ते विपरीतार्थ करितील ॥३९॥
देव कामारे मजपासीं । माझा मृत्यु आवडे त्यांसी ।
ते कौसल्या दशरथापासीं । लघुलाघवेंसीं नेतील ॥४०॥
ऐसा धाक रावणासीं । कौशल्या न ठेवीच लंकेसी ।
तीते घालोनि पेटीसीं । समुद्रापासीं ठेवणें धाडी ॥४१॥
द्वीपद्राक्षें अमृतफळें । लाडू पक्वान्नें रायकेळें ।
पात्रें भरूनि शीतळ जळे । सांठविलें पेटींत ॥४२॥
त्या पेटीमाजी कौसल्येसी । घालोनिं धाडी समुद्रापासीं ।
समुद्रें ठेविली मीनापासीं । मीनें दाढेंसीं घातली ॥४३॥
मीन क्रीडतां समुद्री । त्यासी तिमि धावे युद्धावारीं ।
मीन म्हणे युद्धाचे संचारीं । पेटी चकचुरी होईल ॥४४॥
म्हणोनिया उठाउठी । पेटी ठेवोनि समुद्रबेटी ।
मीन परतला युद्धासाठीं । सक्रोधदृष्टी संग्रामा ॥४५॥
त्याप्रमाणेच दशरथावर आक्रमण व समुद्रार्पण :
दशरथ लग्नत्वरा करी । पायवाट मार्ग दुरी ।
तारूवीं बैसोनि समुद्री । जाऊ त्रिरात्रीं कोसलदेशा ॥४६॥
चेउलींहूनि जेंवी द्वारका । पायवाट दूरी देखा ।
तारूवीं बैसोनि जाता लोका । दिवसा दो का जाऊ पावती ॥४७॥
राया दशरथें यापरी । वर्हाड घालोनि नावेवरी ।
स्वये निघाला समुद्री । त्वरेंकरीं जावया ॥४८॥
टकेपताका नावेवरी । निशाणे त्राहाटिल्या भेरी ।
वर्हाड चालिलें समुद्री । अति गजरी उल्लासें ॥४९॥
रावणे पाळती करोनि पुरी । विमानबळें येवोनि अंधारी ।
दशरथ बैसला जे नावेवरी । ते निशाचरीं फोडिली ॥५०॥
बाप होणार कैंसे बळीं । ते न चुके कदाकाळीं ।
दशरथ बुडता पै जळीं । जाले ते काळी अपूर्व ॥५१॥
दशरथ बुडता पै तळवटीं । रामनाम स्मरे वाक्पुटी ।
तंव सांपडली फुटकी पाटी । राम संकटी तारक ॥५२॥
दशरथ-कौसल्या मीलन, परस्परांकडून वृत्त निवेदन :
श्रीराम दसरथाचे कुशीं । म्हणोनि नाम आठवे त्यासी ।
बुडता नव्हे कासांवीसी । नामे रायासी तारिले ॥५३॥
नाम आठविल्या आकांती । आकांतामाजी अति विश्रांती ।
नामे तारक त्रिजगती । सुखसंवित्ती श्रीरामे ॥५४॥
सांपडता फुटकी पाटी । समुद्रलाटांच्या पै लोटीं ।
जेथे कौसल्येची पेटी । राजा त्या बेटीं लागला ॥५५॥
दशरथ पै उठाउठी । सवेग चालिला त्या बेटीं ।
संमुख देखोनिया पेटी । आश्चर्य पोटी मानिलें ॥५६॥
भोंवतीं समुद्राची घरटी । येथे कोणे ठेविली पेटी ।
पाहता दुसरे न दिसे दृष्टी । विस्मय पोटी अनिवार ॥५७॥
तेणे ती पेटी हाती धरिली । होणारे किल्ली उघडली ।
भीतरी कौसल्या देखिली । असे बैसली संचित ॥५८॥
दशरथ पुसे तू कोण । येरी विस्मयो पावली पूर्ण ।
तुम्ही कोणाचे कोण । येथे आगमन कैसेनि ॥५९॥
राजा म्हणे तू गोरटी । तुज कैसेनि प्राप्त पेटी ।
तुज कोणे ठेविले ये बेटीं । समूळ गोष्टी सांगावी ॥६०॥
पयोनिधि अगाध गहन । मत्स्य मगर अति दारूण ।
ऐसे दुस्तर दुर्गम स्थान । येथे आगमन कैसेनि ॥६१॥
कोसलरायाची मी राजबाळा । राये दशरथू वरू नेमला ।
तंव रावणे घालोनि घाला । घेऊन आला मज लंके ॥६२॥
भविष्ये रावण दचकला पोटी । भयेंचि मजला घालोनि पेटीं ।
ठेवणें धाडिले समुद्राचे पोटी । तेणे ये बेटी ठेविले ॥६३॥
ऐसिया सांगता गोष्टी । कौसल्या बाष्पे दाटली कंठी ।
भाग्ये अभाग्य मीच सृष्टी । नव्हेचि भेटी दशरथा ॥६४॥
न व्हावे दशरथाचें लग्न । यालागी रावणे केले विघ्न ।
दशरथा करावया भग्न । सवेग सैन्य मोकलिले ॥६५॥
जळो जळो तो दशानन । स्वप्नींही न व्हावे संभाषण ।
धरोनि दशरथाचें ध्यान । प्राण त्यागीन स्वानंदे ॥६६॥
ऐकोनि कौसल्येचें वचन । राजा जाला विस्मयपन्न ।
सप्तसागरीं होता मग्न । होणार पूर्ण चुकेना ॥६७॥
राजा सांगे निजवृत्तांत । रावणे माझा करिता घात ।
रक्षिता झाला श्रीरघुनाथ । समुद्राआंत बुडवितां ॥६८॥
तो समुद्र भरिल्या आंत । येथे आलो मी दशरथ ।
येरी पुसे तू अजाचा सुत । रघूचा नातू सूर्यवंशी ॥६९॥
दशरथ-कौसल्या विवाह :
ऐकोनि निश्चयवचन । कौसल्या जाली सुखसंपन्न ।
मज तुष्टला जनार्दन । केले सुलग्न एकांती ॥७०॥
नाही कर्माची खटपट । नाही लौकिक अंत : पट ।
नसतां लोकी कटकट । लग्न लागले निर्दोष ॥७१॥
दोहींचा जो निजहरिख । तोचि तयांचा मधुपर्क ।
बोल बोलिली जे अनेक । मंगळाष्टकें ती तेथे ॥७२॥
विकल्पाचीं झाडिलीं पळें । संकल्पासीं मूद ओंवाळे ।
स्वधर्माचा दीप उजळे । सुखकल्लोळ लग्नार्थ ॥७३॥
अनोळखता मागे सांडे । तेचि पायी पायमांडे ।
परमानंद वाडेकोडें । सुखसुरवाडें लग्नार्थ ॥७४॥
उदरा येईल रघुनाथ । लग्नीं पावला अभिजित ।
लग्नघटिका पाहे भास्वत । काल सांगत सावधान ॥७५॥
दोहींसी ओळखी होता स्पष्ट । सुटोनि गेला अंत : पट ।
ॐपुण्याहंवचनें श्रेष्ठ । मौननिष्ठ होवोनि ठेले ॥७६॥
लग्नधरा समुद्रबेंटी । बोहोलें तेंचि मुख्य पेटी ।
लग्न लागले उठाउठी । दृष्टादृष्टी होतांचि ॥७७॥
यापरी कौसल्येनें निजकांत । लग्नीं वरिला दशरथ ।
पुढील कथेचा अर्थार्थ । आश्चर्यार्थ अवधारा ॥७८॥
कौसल्या आणि दशरथ । दोघें बैसलीं पेटीआंत ।
फळे पक्वान्नें भक्षित । जळ प्राशित स्वानंदे ॥७९॥
कौसल्या पुसे दशरथासी । पुढे निर्गती आमुची कैसी ।
राजा सांगे कौसल्येसी । रामनामेंसीं आम्हा मुक्ति ॥८०॥
वसिष्ठसद्गुरूवचन । करिता रामनामस्मरण ।
भवभयाचें निर्दाळण । बंधमोचन ते किती ॥८१॥
आम्ही तुम्ही मिळोन आता । सावधान एकाग्रता ।
भावे स्मरतां श्रीरघुनाथा । भय सर्वथा आम्हा नाही ॥८२॥
पृथ्वी बुडावया हडबडे । आकाश तुटोनिया पडे ।
तरी नामस्मरत्याकडे । भय बापुडे केंवी निघे ॥८३॥
ऐकता रामनामगोष्टी । विघ्नें पळती बारा वाटीं ।
भिवो नकों वो गोरटी । सुखसंतुष्टी श्रीरामे ॥८४॥
उदरा यावया श्रीरघुनाथ । निजसामर्थ्यप्रतापवंत ।
प्रवेशला दशरथाआंत । नामी भावार्थ तेणे त्यासी ॥८५॥
ऐशीं दोघें करिता गोष्टी । मीनें मीना जोणोनि हाटीं ।
दोघांसहित घेवोनि पेटी । उठाउठी निघाला ॥८६॥
रावणाच्या दर्पोक्तीला ब्रह्मदेवाचे उत्तर :
ब्रह्मयासी पुसे रावण । कौसल्यालग्नसमय कोण ।
आजिंचे होते संधान । लागले लग्न दशरथासी ॥८७॥
ऐकोनि ब्रह्मयाची मात । रावण खदखदां हांसत ।
पहाहो सत्यलोकनाथ । असत्य वदत मजपासीं ॥८८॥
सत्यलोकी मग असता । असत्य मानिसी लंकानाथा ।
तरी ब्रह्मलिखितार्था । तुज तत्वता कळलें नसे ॥८९॥
म्या केला दशरथाचा घात । कौसल्या घातली समुद्रांत ।
आता लग्नीं कैंचा दशरथ । वचन असत्य न माने ॥९०॥
जिणें मरणे भगवत्सता । ते तुज आली लंकानाथा ।
म्हणसी म्या मारिले दशरथा । हे तत्वता असत्य होय ॥९१॥
रावणाने ती पेटी आणवून पाहिले तो त्याला दशरथ-कौसल्येचे दर्शन, त्यांची निर्भयता :
ऐसी वक्रोक्ति ब्रह्मवचन । ऐकोनि का दशानन ।
पेटी आणोनि पाहे आपण । तंव दोघा जणा देखिले ॥९२॥
प्रथम निघतां दशरथ । दचकला तो लंकानाथ ।
त्याचा करावया घात । शस्त्रा हात घातला ॥९३॥
पुढा देखोनि रावण । दशरथा आले स्फुरण ।
दहा कंठ विंशति नयन । भुई पाडीन करघातें ॥९४॥
ते काळी श्रीरघुनाथ । पूर्णप्रतापें दशरथाआंत ।
यालागी रावणा नाही भीत । निःशंकित पुरूषार्थे ॥९५॥
दशरथाचा वध करण्यास रावण प्रवृत्त, परंतु त्याचा मंदोदरीने प्रतिकार केला :
निःशंक देखोनि दशरथ । रावणा तद्वधीं उद्दत ।
मंदोदरी आली तेथ । निवारीत रावणा ॥९६॥
त्यासी बेवोन एकांता । बुद्धि सांगे लंकानाथा ।
मारू जाता दशरथा । तू अपघाता पावसी ॥९७॥
पेटी आणोनि अकस्मात । आतांचि निघाला दशरथ ।
तैसाचि निघालिया रघुनाथ । मरण प्राप्त रावणा ॥९८॥
ऐसी ऐकता गोष्टी । रावण भय घे पाठी पोटी ।
डोळा देखतांचि पेटी । रामभयें पोटी चळीं कांपे ॥९९॥
दशरथलग्नाकरितां विघ्न । रावण जाला अति उद्विग्न ।
दाही मुखें हीन दीन । कंपायमान भयभीत ॥१००॥
मंदोदरीच्या सूचनेप्रमाणे दशरथ-कौसल्येला अयोध्येस पाठविले :
बुद्धि सांगितली रावणासी । कांही न चले होणारासी ।
कौसल्येसहित दशरथासी । अयोध्येसी धाडीं वेगी ॥१०१॥
कौसल्या आणि दशरथासी । मारिता न मारवे आम्हांसी ।
ठेवों नये गा लंकेसी । अयोध्येसी धाडवीं वेगी ॥१०२॥
अन्यथा करू जाता आपण । यांसी सर्वथा न ये मरण ।
रावणा मानले वचन । वेगी विमान आणविलें ॥१०३॥
आणोनियां विमानासीं । कौसल्यायुक्त दशरथासी ।
विमानी बैसवोनि दोघांसी । अयोध्येसी स्वये धाडी ॥१०४॥
राजा बुडाला समुद्रात । अयोध्यानगरी अति आकांत ।
तंव तेथे आला दशरथ । कौसल्येसहित सुलग्न ॥१०५॥
राजा आला देखोनि नगरी । निशाणे त्राहाटिल्या भेरी ।
गुढिया मखरे घरोघरी । नरनारी आल्हाद ॥१०६॥
ऐसा पूर्वींल वृत्तांत । मंदोदरी सांगे साद्यंत ।
रावणा तू का होसी भ्रांत । होणारार्थ चुकेना ॥१०७॥
ऐसे शिकवोनि रावणासी । सांडवू सिताप्रलोभासी ।
हाती धरोनिया त्यासी । निजभुवनासी चालविला ॥१०८॥
एकाजनार्दना शरण । कौसल्यादशरथांचे लग्न ।
परम गोड रामायण । निरूपण स्वये वदवी ॥१०९॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
दशरथकौसल्याविवाहकथनं नाम नवमोऽध्यायः ॥९॥
॥ ओव्या १०९ ॥ श्लोक - ॥ एवं संख्या १०९ ॥
