॥ श्रीएकनाथमहाराजकृत
24.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
सुंदरकांड
॥ अध्याय चोविसावा ॥
वानरांकडून मधुवनाचा विध्वंस
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
हनुमंताने सांगितले की सीतेच्या तेजाने रावण भस्मप्रायच झालेला आहे
हनुमंत सांगे वीरांप्रती । सीता तपस्विनी श्रीरामसती ।
तिने राक्षसांची वीर्यशक्ती । नेली भस्मांतीं कोपाग्नीं ॥१॥
रावणाची शक्ति तेजोराशी । सीतेने भस्म केले त्यासी ।
राम निमित्त मारावयासी । रावणासी रणरंगी ॥२॥
सीताक्षोभे दशानन । जळोन भस्म जाहला जाण ।
पतीस यश दिधले पूर्ण । रामे रावण मारिला ॥३॥
सीता जाळी श्रीराम मारी । ऐसेनि राक्षसांची बोहरी ।
क्षणे होईल लंकेमाझारी । सांगे वानरी हनुमंत ॥४॥
ते ऐकून अंगदास स्फुरण चढले व स्वतःच
सर्वांचा संहार करून यावे असे तो सुचवितो
एकोनि हनुमंताचे वचन । अंगदा आले अति स्फुरण ।
सीतेने जाळिला दशानन । मारिता आपण भय काय ॥५॥
एकला एक मी अंगदु । छेदोनि रावणाचा कंदु ।
स्वजन सुह्रद सखे बंधू । करीन वधू ससैन्येंसी ॥६॥
सखा सुह्रद वीर जगजेठी । तुम्ही राखिल्या माझी पाठी ।
ते मी लंकेच्या त्रिकूटी । राक्षसकोटी मारीन ॥७॥
कुंभकर्णेसीं दशवक्त्र । इंद्रजितासहित राजपुत्र ।
प्रधान मारीन सर्वत्र । सैन्यसमुद्र मंथीन मी ॥८॥
हनुमंते मारिले वीर समर्थ । इंद्रजित केला मेला ना जित ।
रावणा केले हताहत । असे धुकधुकित वांचला ॥९॥
हनुमंतासमवेत । आम्ही गेलिया पै तेथ ।
धाकेंचि मरतील समस्त । लंकानाथ तो किती ॥१०॥
रणी मारोनि रावण । सीता घेवोनि आपण ।
यावे विजयेंसीं गर्जोन । गुढीं उभवून स्वानंदे ॥११॥
पुढे ठेवोनिया सीता । श्रेष्ठ भेटी श्रीरघुनाथा ।
तेणे उल्लास समस्ता । कपिनाथा सुग्रीवा ॥१२॥
सीतेवीण रामापासी । जावोनि काय सांगावे त्यांसी ।
बहुत दिवस लागले शुद्धीसीं । लाज आम्हांसी भेटता ॥१३॥
भेटी घेता रितें हाती । पहिले रिते जाले जुत्पत्ती ।
तेचि आम्हा हुरो लाविती । कपिपति क्षोभेल ॥१४॥
राम आणि लक्ष्मण म्हणती । करंटी वानरांची शक्ती ।
ऐसी पावों उपहती । माझी विनंती नायकता ॥१५॥
जाहले मर्यादोल्लंघन । त्यावरी रितें जाऊन ।
तेव्हा सुग्रीव क्षोभोन जाण । करील अपमान तो ऐका ॥१६॥
काळे वदन खरारोहण । उपानहमाळांचें भूषण ।
गोमयसुमनीं अभिषिंचन । स्तुतिस्तवन फाल्गुनाचें ॥१७॥
आपला कालतिक्रम झालेला आहे, तेव्हा अपमान
करून घेण्यापेक्षा कार्यपूर्ती करून जाणे केव्हाही चांगले
तुम्हा वानरांसमस्तां । माझे लोटांगण आता ।
सीतेवांचोनि सर्वथा । भेटी रघुनाथा न जावे ॥१८॥
तेथे सहावा अपमान । याहूनि लंकेसी जाऊन ।
ससैन्य रावण निर्दाळून । सीता घेऊन शीघ्र यावे ॥१९॥
ऐसे बोलता अंगदासीं । अतिस्फुरण आले त्यांसी ।
रोमांच थरकती सर्वांगासीं । पुच्छ आकाशी तळपत ॥२०॥
रणआवेश अंगदातें । देखता आलिंगिलें हनुमंते ।
वीर शूर पुरूषार्थे । जांबुवंतें वंदिला ॥२१॥
वानर लागोनि पायांसी । शांत करिती युवरायासी ।
जांबुवंते अति युक्तीसी । अंगदासी समजाविलें ॥२२॥
त्यावर जांबवंताचे म्हणणे पडले की, श्रीराम व
सुग्रीवांच्या आज्ञेचा भंग करता येत नाही
अंगदाचें प्रतापवचन । जांबुवंतें आयकोन ।
त्यासी द्यावया समाधान । पूर्वप्रस्थान अनुवादे ॥२३॥
आम्हांसी धाडिता दक्षिणेसीं । श्रीराम सुग्रीवाज्ञा ऐसी ।
तुम्ही आणावें सीताशुद्धीसी । मर्यादेंसीं मासांतीं ॥२४॥
मारोनियां रावणासीं । शीघ्र आणावें सीतेसी ।
श्रीरामाज्ञा नाही ऐसी । नाही नेमेंसी राजाज्ञा ॥२५॥
रावण मारिता आज्ञेवीर । श्रीराम क्षोभेल आपण ।
सुग्रीव कोपेल दारूण । तेंही कारण अवधारी ॥२६॥
श्रीरामे वाहिलीसे आण । स्वहस्तें विंधोनियां बाण ।
रणी मारोनि रावण । सीता आपण सोडवूं ॥२७॥
तो आम्ही मारोनि रावण । सीता आणितां आपण ।
आम्ही भंगितां रामपण । तिघे जण क्षोभती ॥२८॥
मिथ्या करिता श्रीरामपण । सुग्रीव कोपेल दारूण ।
कोपा चढेल लक्ष्मण । श्रीराम पूर्ण क्षोभेल ॥२९॥
रावण जरीं मारू येता । तरी का हनुमंत सोडिता ।
निर्दळोनि लंकानाथा । सीता आणितां निमेषार्धे ॥३०॥
धन्य हनुमंताचे ज्ञान । श्रीराममर्यादा पाळून ।
यालागी न मारीच रावण । आला घेऊन शुद्धीसी ॥३१॥
ऐसा निश्चयो ऐकता । अंगदे वंदिलें जांबुवंता ।
वीर शूर विवेकी ज्ञाता । तुजपरता असेना ॥३२॥
जांबवंताचे सूचनेप्रमाणे सर्व वानर परत जाण्यास निघाले
जांबुवंताचे वचनमेळीं । शुद्धि सांगावया जनकबाळी ।
शीघ्र जावया रामाजवळी । पिटिली टाळी वानरी ॥३३॥
पुढे करोनि हनुमंत । अंगदादि वीर समस्त ।
रामनाम स्वये गर्जत । भुभुःकारत उठावले ॥३४॥
आधी वंदोनि श्रीरामासी । सवेंच वंदोनि लक्ष्मणासी ।
लोटांगण सुग्रीवासी । सीताशुद्धीसी सांगावया ॥३५॥
त्यजोनियां महेंद्रगिरी । उड्डाण केले पै वानरी ।
एकाहूनि एकवरी । वीर अंबरीं दाटले ॥३६॥
हस्तचित्रांचे आभाळ । जेंवी आच्छादी रविमंडळ ।
तैसे वानर सकळ । उतावीळ चालिले ॥३७॥
उड्डाण करिता वानरी । पर्वत खचती धरणीवरी ।
समूळ उपडोनि तरूवरीं । गगनांतरी परिभ्रमतीं ॥३८॥
मार्गात मधुवनाचा सुगंध आल्यावर वानरांची मधुपान करण्यासी इच्छा
करीत उल्लासें आल्हाद । कपिकुळें चाललीं विविध ।
पुढे मधुवनाचा गंध । आला सुगंध वानरा ॥३९॥
गंध येता नासापुटी । एक वानर लाळ घोटी ।
एक मटमटा देती मिठी । वानरकोटी तळमळिती ॥४०॥
हे तंव सुग्रीवाचे वन । यासी दधिमुख नित्य रक्षण ।
येथे रिघो शके कोण । काय आपण करावे ॥४१॥
सीताशुद्धीहोनि देख । आम्हा मधुवन अधिक ।
कृपा करी रघुकुळटिळक । एकमेक तळमळिती ॥४२॥
राम सर्वात्मा सर्वज्ञ । ऐसी वदती पुराणे ।
आम्हा दिधलिया मधुपान । आम्ही सर्वज्ञ सत्य मानूं ॥४३॥
जिभेनें घेतली लोळणी । थाया घेतला होठीं दोन्ही ।
मुख करताहे ग्लानी । मधुपानी श्रीरामा ॥४४॥
सुग्रीवाचे मधुवन । सुरा असुरां अगम्य स्थान ।
ये वनीचें मधुपान । केंवी आपण पाविजे ॥४५॥
मनासीं मधुपानी वणवण । चित्तासीं मधुपानी चिंतन ।
केल्यावीण मधुपान । पुढे मन ढळेना ॥४६॥
ऐसे वानर समस्त । मधुपानी अति आसक्त ।
कृपा करील रघुनाथ । तैंचि प्राप्त होय आम्हा ॥४७॥
राम सर्वांचे ह्रदयवासीं । वानरा बुद्धि दिधली कैसी ।
प्रार्थोनिया हनुमंतासी । अंगदापासी मागाव ॥४८॥
सुग्रीव कपिराजा प्रसिद्ध । तैसाचि युवराजा अंगद ।
हनुमंते मागतां मद्य । देईल आल्हादेंकरोनी ॥४९॥
त्याप्रमाणे जांबवंतादि वानरमंडळींची हनुमंताकडून अंगदास विनंती
जांबवंतादि वानरांसी । अवघे आले हनुमंतापासी ।
आम्हांसी मधु भक्षावयासी । अंगदापासी वन मागे ॥५०॥
हनुमंत म्हणे अंगदासी । कांही एक मागणे तुजपासी ।
तू तंव युवराज आम्हांसी । अति कृपेसीं मज देई ॥५१॥
अंगद म्हणे हनुमंता । तुझेनि बोल देईन जीविता ।
इतर अर्थाची कोण कथा । सांग पा आता काय देऊं ॥५२॥
वानर पीडले परदेशी । श्रमले येता अति वेगेंसीं ।
मागताती मधुपानासी । तुजपासी महाराजा ॥५३॥
विनंती ऐकताच अंगदाची तत्काळ संमती
माझ्या पित्याचे हे वन । सत्ता आहे मजअधीन ।
वनी रिघोनि वानरगण । करोत मधुपान यथेष्ट ॥५४॥
बाळवृद्धादि अकर्मवंत । त्यांसीं न मागतां राय देत ।
दीनदयाळबिरूदें पढत । तुम्ही समस्त कृतकार्य ॥५५॥
तुम्हांसही न मागतां । म्या अर्पावें निजजीविता ।
कायसी मधुवनाची कथा । हनुमंताचे निजबोले ॥५६॥
ऐक हनुमंता सावधान । वाहतो श्रीरामाची आण ।
वानरी ओलोडोनि वन । मधुपान करावे ॥५७॥
जांबवंतादि वीर प्रसिद्ध । आलिंगी कनकांगदी अंगद ।
हनुमंताचे वंदोनि पद । करावे विविध मधुपान ॥५८॥
अनुज्ञा मिळताच वानरांना हर्षोन्माद व अंगदास धन्यवाद
ऐकोनि अंगदाचें वचन । उल्लासले वानरगण ।
आक्रमोनियां ते वन । मधुपान मांडिलें ॥५९॥
अंगद वीर धीर महाशूर । राजकुमर अति उदार ।
जुत्पत्ती श्रेष्ठ सेनाधर । सहित वानर वानिती ॥६०॥
धन्य अंगदाची मती । धन्य अंगदाची स्थिती ।
अंगदाची उदार कीर्ती । स्वये वानिती वानर ॥६१॥
लाहोनि अंगदाआज्ञापन । वनी रिघोनि वानरगण ।
केले वनकरांसी ताडण । जानुअपानमहामारू ॥६२॥
वनरक्षकांना घालवून मनसोक्त मधुपान
नाही घेतले तोंडावरी । नाही मारिले बुक्यावरी ।
गांडगुडघ्याचे महामारीं । वनकर बाहेरी घातले ॥६३॥
जानुअपानमारासाठी । राखणे पळती बारा वाटीं ।
पळतां धाप लागली पोटी । सांगती गोष्टी दधिमुखा ॥६४॥
पळवोनियां वनकर । वन आलोडिती वानर ।
मधु प्राशिती अति मधुर । देती वारंवार महामिटक्या ॥६५॥
प्रत्येक एक एक वानर । मधु प्राशिती द्रोणमात्र ।
मदें डुल्लती कपींद्र । वन समग्र व्यापोनी ॥६६॥
किराणे करिती करूवरीं । एक उडती एकाचे शिरी ।
एक लपती शाखांतरीं । एक वृक्षाग्री नाचती ॥६७॥
एक निजती वृक्षमूळी । एक त्यांच्या पुच्छातळीं ।
घालिती मद्याची गुरळी । मदविव्हळीं उन्मत्त ॥६८॥
वानर तृप्त मद्यपानी । उर्वरित मद्य घेउनी ।
खेळती मद्याचीं शिंपणी । आक्रमूनीं येरयेरा ॥६९॥
येरयेरा पुच्छ हाणिती । येरयेरा पाठी लागती ।
एक पडती अडखळती । एक लोळती उन्मादें ॥७०॥
नंतर यथेच्छ क्रीडाविहार :
एक ते मधुपाना करिती । एक ते कोशिंबीरींसीं मद्य खाती ।
एक एकाचें मद्य हरिती । पात्र घेती हिसडोनी ॥७१॥
एक रडती एक पडती । एक ते ठायी ठायी अडखळती ।
एक ते मद्यानंदे नाचती । एक ते गाती रामकथा ॥७२॥
एक ते रागे रुसती । एक त्यांते बुझाविती ।
एक मद्यसुखें सुखावती । एक डुल्लती मदोन्मादें ॥७३॥
एक उन्मादका वृत्ती । अति दीर्घ हांका देती ।
एक ते गोड गोष्टी सांगती । विध्वंसिती वन एक ॥७४॥
वृक्ष मोडिती वानरे । उलंडिती मद्यमात्रें ।
फोडिती मद्यसाधकयंत्रें । वनचरें उन्मादें ॥७५॥
वनाधिपती दधिमुखाकडे वनरक्षकांचे गार्हाणे :
वानरी त्रासिले वनपाळ । दुःखे पळाले ते सकळ ।
दधिमुखापासीं केवळ । आले विव्हळ अति दुःखी ॥७६॥
आमचे वानरवीर समस्त । मधुवनातें विध्वंसित ।
आम्हांसी निवारिता तेथ । दुःखाभिभूत आम्हा केले ॥७७॥
लाता बुक्या सुबद्ध धाये । त्या घायांचें भय कापे ।
शिळा शाळ ताळ येता पाहे । झेलिलें जाय तळपोनी ॥७८॥
हाणिता नेटे जानु अपान । गुदें आली गा सुजोन ।
जळो तुझे मधुवन । गुदकंदन कोण सोसी ॥७९॥
गांडगुडघ्याचा आघात । पुच्छे रिघाली ढुंगांत ।
दधिमुखासी दुःख सांगत । सुजलीं दावित निजगुदे ॥८०॥
तू तंव आमचा गा नाथ । दुःख सांगितले समस्त ।
यावरी जो कार्यार्थ । कर्तव्यार्थ विचारीं ॥८१॥
दधिमुखाचा संताप व सैन्यासह आक्रमण :
ऐकोनि वानरांचे वचन । दधिमुख क्रोधायमान ।
वानरसैन्य आश्वासून । आले परतोन मधुवना ॥८२॥
अंगद हो का राजसुत । हनुमंत हो का अति आप्त ।
राजाज्ञा जे उल्लंघित । तेही समस्त दंडीन ॥८३॥
वालिसुग्रीवांचा पिता । ऋक्ष राजादारभ्यता ।
मी या वनाचा रक्षिता । कपी समस्ता कळलेसें ॥८४॥
त्याही मज न पुसतां । राजाज्ञाही न घेता ।
केली मधुवनासीं उद्धतता । त्यां समस्ता दंडीन ॥८५॥
ऐसे सांगोनि वनकरांसी । क्रोध आला दधिमुखासी ।
दंडिलें माझ्या सेवकांसी । मीही त्यांसी दंडीन ॥८६॥
ऐकोनि दधिमुखाचे बोल । वानरवीर वनपाळ ।
घेवोनि शिळा शाळ ताळ । सन्नद्ध सकळ चालिले ॥८७॥
गांडी सुजल्या गांडगुडघ्यांसी । तो राग वनकरांचे मानसी ।
घेवोनि आले दधिमुखासीं । वानरांसी त्राहाटिले ॥८८॥
जळस्थ स्थळस्थ वनस्थ । वानर सुग्रीवांसी भयभीत ।
अंगदापासी आले धांवत । दुरोनि दावित दधिमुखा ॥८९॥
मध्ये दधिमुख वीर । हाती प्रचंड शाळ तरूवर ।
भोंवता वानरांचा भार । अति दुर्धर लोटला ॥९०॥
जांबवंतासी समानबळी । दधिमुख जो आतुर्बळी ।
वृक्ष घेवोनि करतळी । करी रवंदळी वानरा ॥९१॥
दधिमुखाने फ़ेकलेल्या साल वृक्षाचाचा प्रत्याघात करून त्याचा पाडाव
सुग्रीव आज्ञाअति समर्थ । मधुवन केले हताहत ।
दधिमुख धाडिला दंडार्थ । कपि सांगत अंगदा ॥९२॥
दधिमुख अविचार । अंगद हनुमंतादि बळी वीर ।
याचा न घेता विचार । कोपे तरूवर सोडिला ॥९३॥
तमालवृक्ष येता वरी । अंगद उडोनि ते अवसरी ।
वृक्ष झेलिला वरिचे वरी । सवेंच मारी दधिमुखा ॥९४॥
अंगद कोपला महावीरू । मदोन्मत्त अति दुर्धरू ।
पित्याचा मातुळ नये मारू । हाही विचारू विसरला ॥९५॥
दधिमुख कपि वृद्धता । परम पूज्य अति श्रेष्ठता ।
हेंही नाठवे अंगदाचे चित्ता । क्रोधोन्मत्तत्ता मारिला ॥९६॥
सावध झाल्यावर सुग्रीवाकडे जाऊन गार्हाणे :
दधिमुखें हाणिता तरूवरीं । अंगदे झेलिला वामकरीं ।
दधिमुख हाणोनि सव्यकरीं । धरणीवरी पाडिला ॥९७॥
हात पाय अव्यवस्थ विकळ । भग्न मस्तक नेत्र विक्राळ ।
अशुद्धे जाला बंबाळ । मुख विक्राळ विचकिलें ॥९८॥
दधिमुख उचलोनि वानरी । टाकिला मधुवनाबाहेरी ।
उदक सिंपिजे वानरी । वारा वनकरीं घालिजे ॥९९॥
दधिमुख झाला सावध । सांगे वनकरा सकळा ।
सुग्रीवापासीं सांगों चला । आम्हांसी केला अपमान ॥१००॥
ऐसे सांगोनि वनकरांसी । दधिमुख उडाला आकाशी ।
निमिषे आला सुग्रीवापासीं । वनकरांसी समवेत ॥१०१॥
श्रीराम स्वामी आणि सौमित्र । उभे वानर जोडोनि कर ।
सुग्रीव बैसला कपिराजेंद्र । आज्ञा दुर्धर जयाची ॥१०२॥
आज्ञा उल्लंघिल्या अणुप्रमाण । दंड करी अति कठीण ।
नाक कान सरकडून । खरारोहण तत्काळ ॥१०३॥
दधिमुख रडत उकसाबुकसी । आडवा पडला सुग्रीवापासीं ।
वानरे दिधले अपमानासी । पारपत्यासी करी तया ॥१०४॥
सुग्रीव बोलिला वचन । तुज दिधले अभयदान ।
कोणे वानरे कैसा अपमान । विशद करून मज सांगे ॥१०५॥
ते ऐकून सुग्रीव सर्व वृत्तांत विचारतो :
दधिमुख दुःख सांगत । अंगदादि हनुमंत ।
मधुवनातें विध्वंसित । मधु भक्षित राजपेय ॥१०६॥
ऋक्षराजा तुजा पिता । तैंपासोनि वन रक्षिता ।
वनावरी माझी सत्ता । तुजही मागतां मी न देई ॥१०७॥
तुझी राजाज्ञा न घेता । आणि मजही न पुसातां ।
केले मधुवनविघाता । मद्यपानी उन्मत्त ॥१०८॥
स्वादु सुगंध राजपान । वानरी करी करिता भक्षण ।
राजाज्ञा करावया दंडण । कोपे धांवोन मी गेलों ॥१०९॥
अंगदे मज उपमर्दोन । वनी सांडिलें मूर्च्छापन्न ।
वनकरा आघात जानुअपानें । गुदें सुजवान सोडिले ॥११०॥
वनकर वीर असंख्यात । सघृत तेलें गुद शेकित ।
निंदापमाने अति गांजित । शरणागत तुज आलो ॥१११॥
तू स्वामी असता शिरी । आम्ही गांजिलों ऐसियापरी ।
आमचा होवोनि कैवारी । स्वये उद्धरी राजाज्ञा ॥११२॥
राजाज्ञेचें राहे बिक । आमचें निरसे निजदुःख ।
ऐसी उद्धतां लावी शीक । दधिमुख विनविता ॥११३॥
ते वृत्त ऐकून वानरांनी सीतेचा शोध केला
असावा असे लक्ष्मण व सुग्रीव यांनी ताडले
ऐकोनि दधिमुखाचें वचन । सुग्रीव आणि लक्ष्मण ।
दोघे वीर विचक्षण । कार्यकारणलक्षक ॥११४॥
क्षुधित तृषित परदेशी । वानर पीडिले उपवासी ।
साधिले सीताशुद्धीसी । वन भक्षासी तरी दिधले ॥११५॥
अंगद वीर विचारी वीरश्रेष्ठ । राजपुत्र अति वरिष्ठ ।
जाणोनि सीताशुद्धीचे कष्ट । मधु यथेष्ट पाजिलें ॥११६॥
साधिली सीताशुद्धि इत्यर्थ । तेणे वानरा अतिसामर्थ्य ।
मधुवनासी विध्वंसित । ऐसा निश्चितार्थ मानिला ॥११७॥
ज्याचे कार्य न साधे जाण । तो सदाचा हीनदीन ।
मुखींहूनि न निघे वचन । काळे वदन तयाचे ॥११८॥
कार्य न साधे जयासी । मुख दाखिवितां लाज तयासी ।
मुखीं उतरे तया मसी । सामर्थ्य त्यासी असेना ॥११९॥
सीताशुद्धि लाधली खरी । म्हणोनि मधुवनामाझारी ।
वानरी केली आपांपरी । मारामारी वनकरा ॥१२०॥
त्याशिवाय जांबवंतासारख्या विचारी
मंत्र्याकडून असा अत्याचार होणे नाही
जांबवंत मंत्री जेथे । अंगद वीर अत्यद्भुत ।
सीताशुद्धी केली हनुमंत । मज निश्चिते मानले ॥१२१॥
हनुमंते सिद्धी नेलें सकळ । निश्चये शोधिली जनकबाळ ।
तेणे विजयी वानर सकळ । बळे प्रबळ हनुमंत ॥१२२॥
हनुमंतावांचून । आणिका न साधे सीता चिद्रत्न ।
सीताशुद्धि साधोनि पूर्ण । मधुवन भक्षिलें ॥१२३॥
सीताशुद्धि जाली पूर्ण । सुग्रीव आणि लक्ष्मण ।
निश्चय करोनि आपण । कृतकल्याण पावले ॥१२४॥
हनुमंताला न विचारता आघात केल्याबद्दल त्यालाच दोष दिला
सुग्रीव म्हणे दधिमुखासीं । तू तंव परम मूर्ख होसी ।
न पुसतां हनुमंतासी । त्वा का त्यासी युद्ध केले ॥१२५॥
मद्यपानी नव्हे हनुमंत । आणि तो तुझा परम आप्त ।
त्यासी न पुसता वृत्तांत । युद्धकंदनार्थ का केला ॥१२६॥
सीताशुद्धि स्वये साधून । वना आले वानरगण ।
तिही केले मधुपान । सुखसंपन्न आम्ही तेणे ॥१२७॥
दधिमुख व अंगद यांचे परस्पर समाधान व श्रीरामदर्शनास प्रयाण
तुज जो दिधला अपमान । तो क्षमा करावा मजलागून ।
अंगदासी तू भेटोन । समाधान साधावें ॥१२८॥
सीताशुद्धि स्वये साधून । वना आले वानरगण ।
तेणे दधिमुख हरिखेजोन । केले नमन सुग्रीवा ॥१२९॥
दधिमुख वानर येऊन । अंगदासी घाली लोटांगण ।
माझा अपराध संपूर्ण । क्षमा आपण करावा ॥१३०॥
अंगद म्हणे उन्मादता । तेव्हा केली अपमानता ।
ते मज नाठवे गा आता । क्षमा तत्वता करावी ॥१३१॥
येरयेरा अभिवंदन । येरयेरा आलिंगन ।
अंगदे दधिमुखासी जाण । समाधान स्वानंदे ॥१३२॥
तुम्ही आलेति सीताशुद्धीसीं । परम सुख सुग्रीवासी ।
शीघ्र बोलाविलें तुम्हांसी । श्रीरामासी भेटावया ॥१३३॥
श्रीरामप्रेम वानरांत । जरी जाले मदोन्मत्त ।
तरी रामनाम स्मरत । विव्हळित मदभरें ॥१३४॥
एक मद्याचे उन्मत्तीं । रामनामे हांका देती ।
एक ते रामनामे डुल्लती । एक म्हणती रामनाम ॥१३५॥
एक मदमोहें अडखळती । एक रामनामे लडबडिती ।
एक अडखळोनि रामनाम स्मरती । एक उपरमती हरिनामें ॥१३६॥
एक मदमोहें नाचती । एक उन्मादें गीत गाती ।
गाता नाचतां राम स्मरती । विटाविती रामनामे ॥१३७॥
वानर देखोनि मदोन्मत्त । हनुमान रामकार्यी उद्यत ।
वंदावया श्रीरघुनाथ । शीघ्रवत निघाला ॥१३८॥
एकाजनार्दना शरण । हनुमंतासी रामदर्शन ।
पुढे अति गोड निरूपण । सावधान अवधारा ॥१३९॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
वानरमधुवनविध्वंसो नाम चतुर्विंशतितमोऽध्यायः ॥२४॥
॥ ओव्या १३९ ॥ श्लोक ३७ ॥ एवं संख्या १७६ ॥
