पितयाचे भाग्य पुत्रा
1768.
पितयाचे भाग्य पुत्रासि पै न ये | विरळा एखादा होय नांव राखे ॥१॥
मी तंब अज्ञान जालो तुमचे पोटी | तुझेनि आम्हा तुटी संसाराची ॥२॥
होणार ते जाले न चले कांही केले | विठ्ठले दुराविले जन्म मरणे ॥३॥
माझिये अदृष्टी ऐसेंचि लिहिले | जे मज निर्मियेले चतुरानने ॥४॥
या विठोबाचे पाय हृदयी धरावे| तेणे विसरावे भवदुःख ॥५॥
मी नेणे पूजाविधि नेणे क्रियासिद्धि | ऐसा अपराधी तारियेलो ॥६॥
अनुपम्य सुख देखिलिया चरणी | घातली लोळणि माझ्या चित्ते ॥७॥
बहुत देव माझ्या पाहियेले जीवे | केले सर्वभावे कुटुंबदास्य ॥८॥
इही माझे चित्त केले तडातोडी | नाही सुख घडी देखिली कांही ॥९॥
मग या पांडुरंगे माझी राखियेली लाज | हा माझा पूर्वज प्राणसता ॥१०॥
अंतरींचे गुज सांगितले मज | दिले प्रेमबीज नामनिधी ॥११॥
सुख या दुःखाची निवारिली बाधा | शरीरसंबंधा वेगळे केले ॥१२॥
आपुले म्हणोनि कृपेने न्याहाळिले | आवडी सांभाळिले मायबापे ॥१३॥
ऐसा मजलागी स्नेहाळु न विसंबे जीवें| म्या काय त्याचे व्हावे उतराई ॥१४॥
नामा म्हणे मज अनाथालागुनी | न विसंबे निर्वाणी पंढरीराव ॥१५॥
