पतित अनेक पावन तू एक
1769.
पतित अनेक पावन तू एक | जालासी सुरेख कवणाचेनी ॥१॥
पतित मी भला की पावन तू भला | सांग बा विठ्ठला मायबापा ॥२॥
परिसाचे महिमान कैसेंनी वाढते | निर्माण नसते लोहो जरी ॥३॥
कल्पतरूची कीर्ति कैसेनी वाढते | जरि कल्पना नसती याचकासी ॥४॥
प्रजेसी पोशिले शोभती राजेश्वर | तैसा हा विचार तुम्हा आम्हा ॥५॥
नामा म्हणे स्वामी नोव्हे ते आमुचे | तुज देवा कैचे क्रियाकर्म ॥६॥
