वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १०, देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ७९१ ते ८२०

तू विष्णु म्हणोन हे

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074547 · अभंग क्र. ७९४

794.
तू विष्णु म्हणोन हे जगचि केवळ ।
येर सकळीक मजशी सहोदर ।
तेणे कारण गोत्रेंसी ऐकोपजीवी आम्हा न खंडवे कोडे रया ।
माहेरावांचुनी आन काही नेणे ।
माहेर ते उपजवी तरंगाचे जीवन ।
तोय वरी सामावे वेगळाले असिजेल केवी रया ॥१॥
उदरी सिनार घरदारी सिनार सिनार दृश्य द्रष्टा ।
करी त्या मायबापाचेनि उद्वेगे ।
मी तो सांगोनिया आलो तुझिया पोटा रया ॥२॥
अंगे ब्रह्म झाला ते तुवा वो जाणितले ।
परी तो अविद्ये घायतळी सुदला ।
ते तू मजलागी नेणसीच माउलिये आपुठे पान्हाये वाडविले रया ॥३॥
तंवचि मी जालो परी उदर न भेदीत जननीये जोडले ना वाटी ।
चक्षु पक्ष निघाले मज तुझाचि वाहाणी म्हणोनी सामावलो तुझ्या पोटी रया ॥४॥
ऐशापरी तुम्हा समसरिसा जालो परी तो नामे वोळखीजे ।
मी तो बाळ की मी तो वृद्ध ऐसे अनन्यपणे लोण कीजे रया ॥५॥
चेवो तरी स्वप्न स्वप्न तरी चेवो माय पुता नेणे ऐसे माझे तुझे ।
आपुले आपण म्हणता लाजिजे नमो नमो तुज व्याली वांझे रया ॥६॥
आयुर्वित्त भव विभव जगी जीवा निढळी लिहिले ।
अलक्ष ते मज नेणतया अजंगमा लागुनी पुसोनी घातले मूळ सानु रया ॥७॥
दृष्टिभेणे रूपा नये काळा भेणे नामाची सोय सांडियेली ।
तुझ्या रूपी सर्व रूप स्वरूप होऊनिया दिठी उतरिलिया परी रया ॥८॥
आपुले वित्त आपणा देखतांचि शंकिजे त्या विभागाची केउती परी ।
बापरखुमादेविवरा विठ्ठला तू येक सचराचरी रया ॥९॥

अर्थ :
विष्णु या शब्दाचा अर्थ व्यापनशील असा आहे. म्हणून सगळे जग विणु आहे. 'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म' या अभिप्रायाने माऊली म्हणतात. हे भगवान तू विष्णु आहे. सर्वजग तुझ्या पासुन उत्पन्न झाले आहे. जगातील सर्व जीवमात्र माझे बंधु आहेत. या करीता एका गोत्रात असणे हे आमचे केव्हाही स्वाभाविकच आहे. यांच्याशी द्वैत बुद्धी करुन त्यांना टाकणेणे शक्य नाही. याकरता हे प्रभो आमचे माहेर जे तू त्या तुझ्यावांचून आम्ही दुसरे काहीच ओळखत नाही माहेर हेच आनंद उत्पत्र होण्याचे स्थान आहे. तेच जीवाचे जीवन आहे. जरी लोकदृष्ट्या पाण्यावरील तरंगाप्रमाणे आम्ही भित्र भिन्न दिसलो तरी पाणीरूपाने वेगळे कसे असू. अशा बोधाने पुन्हा मातेच्या उदरांत, घरात दारात दृश्य दृश्टया ह्या भेदस्थितीपासून मी वेगळा झालो. अनंत जन्माच्या पुण्यसंस्काराने असा निक्षय करून मी तुझ्या पोटी आलो. या बोधाने मी अंगाने ब्रह्मरूप झालो. ते फाक्त तुला ठाऊक आहे. परंतु बाकीच्या जीवाकडे पाहिले तर त्यांना तू अविद्येच्या वैषयीक सुखाखालीच दडपून टाकले आहेस. मला मात्र तसे केले नाहीस. उलट आपल्या 'आपुठे' म्हणजे अखंड प्रेमपान्हाने वाढविलेस. तेव्हाच मी अशा स्थितीला आलो. आणि ज्या प्रेमभक्तिने अशा स्थितीला आलो. त्या प्रेमभक्ति माऊलीचा मी उदर न भेदी म्हणजे तिचा नाश करीत नाही. पक्षी आपण जे अन्न संपादन करतो ते आपल्या पिलांना
वाटीत नाही काय ! पुढे त्या पक्षाला डोळे येऊन पंख फुटले म्हणजे स्वाभाविकच ते स्वतंत्र होतात अशा तुझ्या ह्या कृपेच्या प्रवाहांत मला लाभ झाला आहे. म्हणूनच तुझ्या पोटी म्हणजे तुझ्या स्वरूपांत मी सामावलो आहे. याप्रमाणे तुझ्या स्वरूपाशी माझे ऐक्य झाले खरे तरी पण शरीरपातापर्यंत व्यवहारांत मी बाळ, तरूण, वृद्ध अशा नावाने ओळखिला जाईन परंतु ऐक्यपणाचा बोध असल्यामुळे त्या व्यवहाराचे सुद्धा कौतुकच वाटते. लोकदृष्ट्या जागृति असली तरी विचारदृष्ट्या ते स्वप्नच आहे. आणि स्वप्न म्हटले तरी स्वप्नात जो ज्ञानाचा व्यवहार असतो ते ज्ञान म्हणजे जागृति म्हणजे स्वप्नांत ज्या पदार्थाचा व्यवहार होतो. ते पदार्थ व तो व्यवहार मिथ्या असला तरी त्यांचे ज्ञान म्हणून जे असते (प्रकाशक) ते सत्यच असते. अशा बोधाने मातृपुत्रभाव किंवा माझा तुझा असा द्वैतभाव मी जाणत नाही एवढेच काय तर मी आत्मस्वरूप आहे असे म्हणतांना सुद्धा अद्वैतस्थितीत लाज वाटते नमस्कार असो तुझ्या मायेला, अरे ती स्वरूपाने वांझ असता ती तुलाच व्याली तसेच जगत आयुष्य, वित्त, जन्म, ऐश्वर्य हे सर्व जगातील जीवाच्या कपाळी लिहुन ठेवले आहे. परंतु जड, मूर्ख जो मी त्या माझ्या कपाळीचे ते पुसून टाकल्यामुळे मी त्याच्यापासून वेगळा आहे. मुळापासूनच अशी स्थिती आहे. व या स्थितीमुळे काळाच्या दृष्टीभयाने नामरूपाला येण्याची सोय टाकून देऊन सर्वरूप जो तू त्या तुझ्या रूपाप्रमाणे होऊन या प्रपंचापासून दृष्टीउतरली. असे आपले रूप ऐश्वर्य आपण पाहात असता त्याविषयी जीवांचा निश्चय होत नाही. त्यांना शंका येते. मग त्या आत्मसुखाचा सुखोपभोग घेण्याचा प्रकार जीवाला कसा समजावा? माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठला चराचर जगतामध्ये स्वगत सजातीय विजातीय भेदशून्य असा तूम्ही एक आहात असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग