वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १०, देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ७९१ ते ८२०

देखोनी हांव बांधे ते

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074544 · अभंग क्र. ७९३

793.
देखोनी हांव बांधे ते तव नाही होये ।
आहे ते कही न जाय रे बापा ।
असे ते दिसो नये नाही ते घेवो पाहे ।
थोर काजेवीण विटंबिले कैसे रया ॥१॥
शिव शिव लटिकेचि शिणले ।
येणे लटिकेंनी बहु श्रमविले ।
साच ते लटिके लटिके ते साच ।
लिंगा हे खूण जाण रया ॥२॥
आपुली प्रतिष्ठा पूज्य जे होती ।
इही गुणी आम्हा उपहति बापा ।
मनाचा फाळका फाळुनी केला ।
बाउला तोचि तो खेळवू किती रया ॥३॥
आपुले युक्तीचे वाती वेऱ्ही गिवसीता ।
त्या पदार्थाचे पोटी लपती रया ।
ते सांडूनिया अभिप्रायाचे बळ ।
निजतत्त्वी ते केवी निवती रया ॥४॥
निज लाळा लिंपोनी जुन्या हस्ति ।
श्वान चघळुनि करितसे गोड रया ।
तैसा जातिविशेषे निरसे म्हणोनी ।
पुरवुनी करितसे कोड रया ॥५॥
हाता पायांचा निखळ स्त्रीपुरूषांचा एक मेळ ।
देह ऐसा याते म्हणती बापा आपण पै ।
जागा प्रतीति मानवपणे हे तव चिळसवाणे रया ॥६॥
मायबापे आडनांवे त्यांचिया वोसंगा ।
निघो म्हणो तरी आपुलिये ।
साउलिये का न बैसावे रया ॥७॥
प्रजाचे पोसिले पुढे पाइकाचे रक्षिले ।
इंद्रियांचे वोळगणे ते काळाचे खेळणे ।
जगी राय बोलजती आता ।
गोसावी कवणाते म्हणावे रया ॥८॥
मृगजळ तव मृगजळींच भरते ।
देखोनी धांवणे तव सीणणे ।
या परी झणी करिसी सदाशिवा ।
जगा प्रतीति पावउनी झकणे रया ॥९॥
आता असो हा बोलु तू एक गोसावी ।
साच येतुलेनी आम्हा उजरीकोटि स्वप्न एक चेईलिया ।
कैचे ज्ञानदेव म्हणे ऐसे करी रया ॥१०॥

अर्थ :
अरे जीवा, हे क्षणिक विषयसुख पाहून ते प्राप्त करून घेण्याकरिता तू विनाकारण हांव धरून खटपट करित आहेस. आणि त्या संसारसुखाचा विचार केला तर ते क्षणामध्ये नाहीसे होतात. नित्यआत्मसुख कधीही जात नाही. पण मायेचा असा विलक्षण स्वभाव आहे की जे सुख नित्य आहे. ते तू पहातच नाहीस. आणि जे मुळीच नाही असे संसारसुख घेण्याकरीता पाहातोस, अरे काही एक फल नसता विषयसुखाच्या प्राप्तीकरता तू आपली थोर विटंबना मात्र करून घेतलीस या जीवांचे कष्ट वर्णन करतांना अंगावर शहारे येऊन ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. शिव !शिव ! जीव फुकट भ्रमात पडले ! या लटक्या संसारसुखाने यांना फार कष्टी केले आहे. तुला जे विषयसुख सत्य वाटते. ते खोटे आहे. आणि ज्याचे तुला ज्ञान नाही. व जे खोटे आहे असे वाटते. ते परमात्मलिंगच म्हणजे परमात्म स्वरूपच सत्य आहे. ही खूण तू पक्की लक्षात ठेव. आपल्या प्रतिष्ठेने जे आपणाला श्रेष्ठ समजतात. त्या श्रेष्ठ समजण्यातच त्यांचा खरोखर नाश आहे. मनाचा एक मनरुपी तुकडा फाडून एक बाहुला केला. त्याला कितीवदिवस खेळवित बसावयाचे म्हणजे त्या मनाच्या मागे किती दिवस फिरत बसावे. आपल्या युक्तीचातुर्याने त्या परमात्मपदाला शोधू गेले असता पत्ता न लागता त्याच्या पोटांत जीव लपले जातात. म्हणजे केवळ आपल्या युक्तीने त्या पदाची प्राप्ती होत नाही. श्रुति प्रतिपादित अभिप्रायाचे सहाय्य टाकून ते स्वबुद्धीने आत्मतत्त्वाच्या ठिकाणी कसे समाधान पावतील? (वैषयीक सुखोपभोगांत जीव आत्मानंदच भोगीत असतो. पण मी आत्मानंद भोगीत आहे. हे त्यास माहीत नसल्यामुळे तो विषयाचा आनंद आहे असे समजतो. ) जुनी हाडे चघळीत असता आपल्या तोंडातील लाळेची गोडी घेऊन ती गोडी हाडांत आहे. असे ज्याप्रमाणे कुत्री समजतात. त्याप्रमाणे अज्ञानी जीव स्वात्मसुख भोगीत असता सुखशून्य असलेल्या निरनिराळ्या विषयामध्ये सुख आहे असे समजतात व तेच विषयाचे कोड़ पुरवित असतात. अरे फक्त स्त्री पुरूषांच्या हातापायांचा एक मेळ म्हणजे ऐक्य झाले असता त्यापासून उत्पन्न होणाऱ्याला देह असे म्हणतात आणि त्यावर आपलेपणाची असलेली प्रतीति जगांत दाखवितात ही गोष्ट अत्यंत किळस आणणारी आहे. असे पाहा की जीव आपल्या कर्मानि उत्पन्न होतो. आईबाप ही त्याला कुंभाराप्रमाणे निमित्त कारण आहेत. म्हणून त्यांना आईबाप हे नांव फुकट आहे. भ्रमाने त्यांच्या मांडीवर बसण्याचा प्रयत्न करावा तर आपली जी खोटी सावली तिच्या आश्रयावर का बसू नये. तसेच आई बापांनी त्यांची प्रजा म्हणून त्यांनी आपणास पोसिले. पुढे आपण आपले स्त्रीयाबाळांचे रक्षण केले त्याच प्रमाणे शरीर इंद्रियांचेही कोड केले. तरी हे सर्व काळाचे खेळणे आहे. अशी जगांत सगळ्याचा अभिप्राय आहे. आता स्वामी कोणाला म्हणावे मृगजळ जरी धावत जात आहे असे दिसले तरी त्यांची धांव मृगजळांतच जाऊन भरणार ती मृगजळाची धांव बघून पाणी पिण्याकरिता धांवणे म्हणजे श्रम करून घेणे होय. याप्रमाणे जगाची रीत पाहून तू कदाचित फसशील. आता या स्वस्वरूपी प्रपंचाच्या बाबी तुला किती सांगाव्या? या प्रपंचांत एक खरा स्वामी तू आहेस. जगाची उत्पत्ति व नाश आहे. असा तुझा बोध झाला म्हणजे आम्हास फार संतोष आहे. या तुझ्या बोधाने कोट्यवधी जन्ममरणरूपी स्वप्ने प्राप्त करून देणारे संचित तुझ्याबोधाने शिल्लक कसे राहील? माऊली ज्ञानदेव म्हणतात मला असे कर.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग