सर्वगत निर्धारिता आत
795.
सर्वगत निर्धारिता आत्मा एक चराचरी तेथे तव नाही दुजेयाची परी ।
चारी खाणी चारी वाणी चौऱ्यांसी लक्ष जीव योनी मी अपत्य तुमचे अवधारी ।
तुझिये भेटीलागी रोडेलो दातारा हे तनु होतसे संकीर्ण भारी ।
जवळीच असता भेटी का नेदिसी थोर शिणविलो वोरबारी रया ॥१॥
तुजवीण मी कष्टलो दातारा कष्टोनी क्षेदक्षीण जालो ।
संसारश्रम त्रिविधतमे मार्ग सिध्दचि चुकलो ।
उपजोनिया बुद्धि येऊ पाहे तुझे शुद्धी तव द्वैतसंगे भांबावलो रया ॥धृ॥
मागील कष्ट सांगता दुर्घट नको नको ते आठवण ।
सुखदुःखे प्राण पीडला गा बापा गुणत्रये ओझे जडपण ।
भव विभव निरय आपदा ऐसे ऐकिले आनेआन ।
तू हे जीव तरी भोगिता हे कवण । हे आकळिता वाटे विंदान रया ॥२॥
वेळावेळ भावाभाव बोलता अवचिता चोरटा काम उठी ।
तुज देखता अनादि वाटे पडे वधापरी धैर्य धांवणे न करिसी गोष्टी ।
तुझिये दृष्टि शरीर काळ फाडफाडू खातो कवण काकुलती तया ना तुज नुठी ।
ऐसे विपरीत नवल वाटे ये सृष्टी रया ॥३॥
ऐसा न कळता भरंवसा मी हिंडे दाही दिशा हे तव मन जालेसे पिसे ।
असोयी जाता अपायी पडिजे श्वास उच्छ्वास पाळती सरिसे ।
वय चित्तांचा अंत घेउनि नाडलेपण परत्र पथ नकळे भरवसे ।
कर्म वाटे आड गर्वे रिगता तव विघ्नचि उबैले अपैसे रया ॥४॥
ऐसी माया मोहाची भुलवणी घालुनी की बापा लाविले अविचार कामा ।
उपाधि वळसा नाथिला धिंवसा जड केला शुद्ध आत्मा ।
मी तू कवणाचे विंदान न कळेचि ऐसी नीत निगुती सीमा ।
तर्कबीज कैसे सांपडले वर्म मा हाचि भावो कल्पिला आम्हा रया ॥५॥
ऐसा वाउगाचि सोसु पुरला गा बापा परी तुज न पडसी ठाउका ।
साही दरुशणा अठरा पुराणा वेवादु नाही खुंटला ।
आपुलाला स्वमार्गु संपादिता केऊता जासी गावींचा गावी ।
विश्वास नाही चित्ता ये देही ऐसियासी कीजे कायी रया ॥६॥
ऐसा जन्मोनी का उगवलासी मायबापा कवण का सांडिली ऐसी ।
रंका काळाचेनि धाके सत्कमे अनेके विश्रांती नाही या जीवांसी ।
समर्थपणे वेगळे घातले तरी दैन्य दारिद्र्य का भोगवितासी ।
आपुले म्हणता न लाजसी देवा तरी सांग पा माव आहे कैसी रया ॥७॥
समुद्री जळ घेऊनि मेघ वरुषती मेदिनी ते का मागुते मिळे सागरी ।
आकाशा पासाव उत्पत्ति वायु हिंडे दशदिशी परी ते ठायींच्या ठायी राहणे झाले ।
जळीहूनि तरंग अनेक उमटती परी ते जळीचे जळी निमाले ।
स्वप्नसंगे परदेशा गेले तरी जागृती ठायी संचले रया ॥८॥
ऐसा तुजपासाव सगुण स्वरुप जन्मोलो गा देवा आता कैसेनि वेगळा निवडे ।
लवण पडिले जळी की कर्पूरासी नुरे काजळी तैसे भावार्थ प्रेम चोखडे ।
ज्ञानदेव म्हणे रुक्मिणीरमणा देई क्षेम वर्म न बोले फुडे ।
निवृत्तिप्रसादे खुंटला अनुवादु फिटले सकळही सांकडे रया ॥९॥
अर्थ :
परमात्मस्वरुपाविषयी विचार केला तर सर्व चराचर विश्वामध्ये आत्मा एकच आहे. परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी दुसरेपणाचा प्रकार नाही उद्भिजादि चारी खाणी व ब्रह्मचर्यादि चारी आश्रम, चौऱ्यांसी लक्ष योनी, जीव हे तुमच्या पासून झाले असल्यामुळे मी तुमचे अपत्य आहे. त्या तुझ्या भेटी करता मी अगदी कृश होऊन शरीरनाशाची वेळ आली आहे. अरे माझ्या जवळच तू असता मला भेट न देता प्रपंचाच्या दगदगीत का शिणवितोस. तुझ्या प्राप्तीवाचून मला फार कष्ट होतात. त्यामुळे मी अगदी क्षीण होऊन गेलो आहे. त्रिगुणात्मक संसाराच्या श्रमामुळे स्वतःसिद्ध आत्मस्वरुपाचा मार्ग चुकलो आहे. जन्माला येऊन तुझ्या स्वरुपसिद्धीच्या प्राप्तीकरिता बुद्धि प्रयत्न करित असता या द्वैताच्या संगतीने भांबावून गेलो. अनंत जन्मी मी दुर्घट कष्ट भोगले. त्याची आठवण सुद्धा करवत नाही. या सुखदुःखाने माझा प्राण अगदी पिडून गेला. गुणत्रयाचे फार ओझे झाले त्यात भवस्वर्गादि अनेक संकटे आहेत. असे ऐकले परंतु हे जीव तूंच असता हे सर्व संसार कष्ट कोण भोगतो. याचा निश्चय होत नाही. सर्व वेळ सर्वभावाने तुजविषयी विचार करित असता वाटमाऱ्याप्रमाणे हा चोरटा काम अंतःकरणांत लगेच उत्पन्न होऊन अनादि तुझ्या वाटेला लागलेल्याला पाहून त्वाचे वधाकरता प्रवृत्त होणाऱ्या या कामचोरापासून जीवाला सोडवावे म्हणून धावून येण्याची गोष्ट सुद्धा तू करित नाहीस. तुझ्या स्वरुपाविषयी विचार करणाऱ्या जीवांचे शरीर काळ फाडफांडून खात असता त्याच्या रक्षणाविषयी तुला दया का उत्पन्न होत नाही? असा काही चमत्कार या सृष्टिमध्ये दिसून येतो. या मायेचा चमत्कार न कळाल्यामुळे जीवाला तुझ्याविषयी भरंवसा नाही. म्हणून हे मन वेडे होऊन गेले. आणि त्याला कोठेही सोय न लागता त्याने धापा टाकीत कोणत्यातरी संकटात पडावे. वयाचा किंवा वित्त प्राप्तीचा कळस झाला तरी. त्यांना मोक्षमार्गाची वाट कळत नाही. उलट भलताच अभिमान घेऊन कर्माच्या वाटेला जावे तर तेथे आपोआप अनेक विघे उत्पन्न होतात. अशा रितीने. मायेच्या मोहाची भूल घालून अविचारी जीवांना तू कर्मामध्ये प्रवृत्त केलेस. या नासक्याउपाधीच्या भोवऱ्यात धैर्य जाऊन त्या शुद्ध आत्म्याला जड करुन टाकले. आणि मी व तू हे कोणाच्या उद्देशाने आहे. याविषयी निश्चित प्रकार काय आहे हे समजत नाही. तुझ्या स्वरुपाविषयी तर्काच्या सहाय्याने l विचार केला असता तुझी प्राप्ती कशी होईल. आणि हे तुझ्या प्राप्तीचे वर्म आहे. आणि हाच भाव आम्हांला उत्पन्न झाला. अशा अनंत प्रकाराने तुझ्या प्राप्तीचा उपाय केला तरी तो फुकट आहे. कारण त्याने तुझी प्राप्ती होत नाही. सहा शास्त्रे, व अठरा पुराणे ही अजून परस्परांत विचार करितात. परंतु त्याची समाप्ती झाली नाही. तू आपल्या बुद्धीने ठरविलेल्या मार्गाने गेलास तर परमात्मा संपादन करुन स्वकीय आत्मस्वरुपाच्या गांवी कसा जाशील? ज्याचे चित्तामध्ये विश्वास नाही. अशा पुरुषाला कोणी कोणता उपाय सांगावा मनुष्य देहांत जन्माला येऊन का कष्टी झालास? मायबाप जो श्रीहरि त्याची करुणा भाकावयाची का सोडलीस? परमात्म स्वरुपापुढे दीन असलेला असा जो काळ त्याच्या धाकाने अनेक सत्कर्माचे आचरण करण्यांस या जीवाला विश्रांती नाही. आपल्या स्वकीय आत्मपणाचे सामर्थ्य वेगळे करुन संसाराचे दैन्य दारिद्रय जीव का भोगीत आहे. हे देवा, या जीवाला आपले म्हणून त्याच्याकडून असे दुःख भोगवण्यांत तुला काही संकोच वाटत नाही काय? तेव्हा असे करण्यांत तुझा काय भाव आहे सांग पाहू. समुद्राचे जळ शोषण करुन मेघ पृथ्वीवर वर्षाव करितात. परत ते समुद्रांत मिळते. आकाशा पासून उत्पन्न झालेला वायु दशदिशेला हिडून पुन्हा आकाशांत लीन होतो जळावर अनेक तरंग उत्पन्न होऊन पुन्हा ते त्या जळांतच लय पावतात. स्वप्नामध्ये परदेशाला गेले असता पाठीमागून त्याची जागृत्तितच स्थिति असते. याच न्यायाने हे देवा ! तुझ्यापासून सगुणरुपाने उत्पन्न झालेला जो मी तो आता तुझ्या स्वरुपाहून वेगळा कसा निवडेन? मीठ पाण्यांत पडले असता. ते जसे निराळे राहात नाही. किंवा कापूर अग्नीत पडला असता तो जसा अग्नीरुप होऊन जातो. त्याची काजळीही शिल्लक राहात नाही. तसा माझा निर्मळ स्वच्छ प्रेमभाव आहे. म्हणून हे रुक्मिणीरमणा पाडुंरगा मला
आता एकदम आलिंगन दे. बाकीच्या तुझ्या गोष्टी मला काही नकोत. श्रीगुरु निवृत्तिरायांच्या प्रसादाने हा परमात्म स्वरुपाविषयीचा केलेला अनुवाद संपवून माझे सर्व संकट निवारण झाले असे माऊली सांगतात.
