आळंदीमाहात्म्य.
१५.
आळंदीमाहात्म्य.
११७.
पुण्यभूमी आळंकावती । प्रत्यक्ष नांदे कैलासपती ।
आणि सिद्ध साधकां वस्ती । ब्रह्मा अमरपती आदिकरुनी ॥१॥
ऐका अळंकापुरीची मात । स्वयें वर्णीत श्रीभगवंत ।
उपमेसि न पुरे निश्चित । वैकुंठ आदिकरुनी ॥२॥
येथे तिन्ही मूर्ति अवतार । धरुनि करिती जगाचा उद्धार ।
मुळ अदि माया साचार । दह्री अवतार मुक्ताबाई ॥३॥
या चौघांचे स्मरणी । महापापा होय धुणी ।
येऊनि मुक्ती लागती चरणी । ऐसे चक्रपाणी सांगत ॥४॥
नामया सांगे जगज्जीवन । या भूमीचें न करवें वर्णन ।
सेना घाली लोटांगण । वंदी चरण ज्ञानदेवाचें ॥५॥
११८.
धन्य अलंकापुर धन्य सिद्धेश्वर । धन्य ते तरुवर पशुपक्षी ॥१॥
धन्य इंद्रायणी धन्य भागीरथी । तेथें स्नान जे करिती धन्य जन्म ॥२॥
धन्य ते प्रयाग धन्य ते त्रिवेणी । वहाती येऊनि गुप्तरूपे ॥३॥
धन्य ते भूमी धन्य ते प्राणी । देखती नयनी ज्ञानदेवा ॥४॥
धन्य ते भाग्याचे होती अळंकापुरी । तयाचा निर्धारी धन्य वंश ॥५॥
धन्य दासानुदास अळंकापुरीचा । सेना न्हावी त्याचा रजःकण ॥६॥
११९.
नामयाच्या नारायणें घेतली आळी । या भूमीचें महिमान सांगे म्हणे वनमाळी ॥१॥
धन्य धन्य अलंकापुर धन्य धन्य सिद्धेश्वर । धन्य इंद्रायणि तीरीं राज्य करी ज्ञानेश्वर ॥२॥
या भूमीचें वर्णन करू न शके चतुरानन । महा क्षेत्र पुरातन पातकें नासती स्मरणे ॥३॥
सेना म्हणे जगज्जीवन सांगतसे जीवींची खूण । महा दोषा होय दहन ज्ञानदेव दरुशने ॥४॥
१२०.
नाम हें अमृत भक्तासी दिधले । ठेवणें ठेविले होते गुप्त ॥१॥
प्रत्यक्ष अवतार धरिला अलंकापुरी । मार्ग तो निर्धारी दाखविला ॥२॥
कृतयुगामाजी वरिष्ठ जाणता । नाम तो घेतां नारद मुनि ॥३॥
कलियुगामाजी न घडे साधन । जातील बुडोन महा डोहीं ॥४॥
रामकृष्ण हरी गोविंद गोपाळ । स्मरा वेळोवेळा सेना म्हणे ॥५॥
१२१.
धन्य महाराज अलंकापुरवासी । साष्टांग तयासी नमन माझें ॥१॥
या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे । उद्धरती तयाचे सकळ कुळें ॥२॥
इंद्रायणी स्नान करिती प्रदक्षिणा । तुटती यातना सकळ त्याच्या ॥३॥
सेना म्हणे त्याचे धन्य झालें जिणें । ज्ञानदेव दरुशने मुक्त होती ॥४॥
१२२.
वाचे उच्चारी जो ज्ञानदेवाशी । तयाच्या सुकृतासी नाही पार ॥१॥
पूर्वींचे सुकृत फळासि आले । वाचे उच्चारिले ज्ञानदेवा ॥२॥
या अलंकापुरीं आला जन्मांसि । पूर्वज तयासी मानिती धन्य ॥३॥
सेना म्हणे त्याने उद्धरिले कुळ । पूर्वज सकळ आशिर्वाद देती ॥४॥
१२३.
येउनी नरदेहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर । तयाचा संसार सुफळ झालागे माये ॥१॥
प्रत्यक्ष परब्रह्म येऊनी अवतारासी । तारिले जगासी नाममात्रें ॥२॥
जयाचे आंगणी पिंपळ सोनियाचा । सिद्ध साधकाचा मेळा तेथें ॥३॥
तयाचे स्मरणे जळती पातकें । सांगत पंढरीनाथ सेना म्हणे ॥४॥
१२४.
विष्णूचा अवतार । सखा माझा ज्ञानेश्वर ॥१॥
चला जाऊ अळंकापुरा । संतजनाच्या माहेरा ॥२॥
स्नान करिता इंद्रायणी । मुक्तां लागती चरणी ॥३॥
ज्ञानेश्वराच्या चरणी । सेना आला लोटांगणी ॥४॥
१२५.
गिरजेप्रती शंकर उपदेशिले । तो गुह्य मंत्र सप्त समुद्रापलीकडे ॥१॥
ऐसे निज गुज साराचेंही सार । उघडे दाविले साचार ज्ञानदेवे ॥२॥
हें सुखाचे सुख साधन । भक्तिज्ञानाचें अंजन । हेंचि परब्रह्म जीवन ॥३॥
हेंचि मुख निज राममंत्र सार । सुलभ साकार सेना ध्याये निरंतर ॥४॥
१२६.
ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारूं । उतरील पैल पारूं ज्ञानदेव ॥१॥
ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता । तोडील भवव्यथा ज्ञानदेव ॥२॥
ज्ञानदेव माझे सोयरे धायरे । जिवलग निर्धारे ज्ञानदेव ॥३॥
सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान । दाविली निजखूण ज्ञानदेव ॥४॥
१२७.
अळंकापुरवासिनी । ज्ञानाबाई मायबहिनी ॥१॥
लेकुराची चिंता । वागवावी कृपावंता ॥२॥
मी तो राहे यातीहीन । माझा राखा अभिमान ॥३॥
करूनि विनवणी । सेना लागतो चरणी ॥४॥
१२८.
श्रीज्ञानराजें केला उपकार । मार्ग हा निर्धार दाखविला ॥१॥
विटेवरी उभा वैकुंठनायक । आणि पुंडलिक चंद्रभागा ॥२॥
अविनाश पंढरी भूमीवरी पेंठ । प्रत्यक्ष वैकुंठ दाखविले ॥३॥
सेना म्हणे चला जाऊ तया ठाया । पांडुरंग सखया भेटावया ॥४॥
