श्री एकनाथ महाराज हर
1.
श्री एकनाथ महाराज हरिपाठ
हरीचिया दासा हरि दाही दिशा । भावे जैसा तैसा हरि एक ॥१॥
हरी मुखी गाता हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥२॥
जन्म घेणे लागे वासनेच्या संगे । तेचि झाली अंगें हरिरूप ॥३॥
हरिरूप झालें जाणीव हरपले । मीतूंपणा गेले हरीचे ठायी ॥४॥
हरिरूप ध्यानीं हरिरूप मनी । एका जनार्दनी हरि बोला ॥५॥
हरी मुखी गाता हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृ॥
2.
हरि बोला हरि बोला नातरी अबोला । व्यर्थ गलबला करू नका ॥१॥
नको अभिमान नको नको मान । सोडीं मीतूंपण तोचि सुखी ॥२॥
सुखी त्याणें व्हावे जगा निववावें । अज्ञानी लावावे सन्मार्गासी ॥३॥
मार्ग जया कळे भावभक्तिबळें । जगाचिये मेळे न दिसती ॥४॥
जनी वनी प्रत्यक्ष लोचनीं । एका जनार्दनी ओळखिलें ॥५॥
हरी मुखी गाता हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृ॥
3.
ओळखिला हरी धन्य तो संसारी । मोक्ष त्याचे घरी सिद्धीसहित ॥१॥
सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे । नेलें राजहंसें पाणी काय ॥२॥
काय तें करावे संदेहीं निर्गुण । ज्ञानाने सगुण ओस केलें ॥३॥
केलें कर्म झालें तेंचि भोगा आले । उपजले मेले ऐसे किती ॥४॥
एका जनार्दनी नाही यातायाती । सुखाची विश्रांती हरीसंगें ॥५॥
हरी मुखी गाता हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृ॥
4.
जे जें दृष्टी दिसे तें तें हरिरूप । पूजा ध्यान जप त्यासी नाही ॥१॥
वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्रीं देव । तयाविण ठाव रिता कोठे ॥२॥
वैष्णवांचें गुह्य मोक्षांचा एकांत । अनंतासी अंत पाहतां नाही ॥३॥
आदि मध्य अवघा हरि एक । एकाचे अनेक हरि करी ॥४॥
एकाकार झाले जीव दोन्ही तिन्ही । एका जनार्दनी ऐसे केलें ॥५॥
हरी मुखी गाता हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृ॥
5.
नामाविण मुख सर्पाचें तें बीळ । जिव्हा काळसर्प आहे ॥१॥
वाचा नव्हे लांब जळो त्याचे जिणें । यातना भोगणें यमपुरीं ॥२॥
हरीविण कोणी नाही सोडविता । पुत्र बंधु कांता संपत्तिचे ॥३॥
अंतकाळीं कोणी नाही बा सांगाती । साधूचे संगतीं हरी जोडे ॥४॥
कोटि कुळें तारी हरि अक्षरे दोन्ही । एका जनार्दनी पाठ केली ॥५॥
हरी मुखी गाता हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृ॥
6.
धन्य माय व्याली सुकृताचें फळ । फळ निर्फळ हरीविण ॥१॥
वेदांताचें बीज हरि हरि अक्षरे । पवित्र सोपारें हेंचि एक ॥२॥
योग याग व्रत नेम दानधर्म । नलगे साधन जपतां हरि ॥३॥
साधनाचे सार नाम मुखी गाता । हरि हरि म्हणतां कार्यसिद्धी ॥४॥
नित्य मुक्त तोचि एक ब्रह्मज्ञानी । एका जनार्दनी हरि बोला ॥५॥
हरी मुखी गाता हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृ॥
7.
बहुता सुकृतें नरदेह लाधला । भक्तीविण गेला अधोगती ॥१॥
पाप भाग्य कैसे न सरेचि कर्म । न कळेचि वर्म अरे मूढा ॥२॥
अनंत जन्मींचें सुकृत पदरी । त्याचे मुखी हरि पैठा होय ॥३॥
राव रंक हो का उंच नीच याती । भक्तीविण माती मुखी त्याच्या ॥४॥
एका जनार्दनी हरि हरि म्हणता । मुक्ती सायुज्यता पाठी लागे ॥५॥
हरी मुखी गाता हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृ॥
8.
हरिनामामृत सेवी सावकाश । मोक्ष त्याचे भूस दृष्टीपुढें ॥१॥
नित्य नामघोष जयाचे मंदिरी । तेचि काशीपुरी तीर्थक्षेत्र ॥२॥
वाराणसी तीर्थक्षेत्रा नाश आहे । अविनाशासी पाहे नाश कैचा ॥३॥
एका तासामाजीं कोटि वेळा सृष्टी । होती जाती दृष्टि पाहें तोचि ॥४॥
एका जनार्दनी ऐसे किती झालें । हरिनाम सेविले तोचि एक ॥५॥
हरी मुखी गाता हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृ॥
9.
भक्तीविण पशु कशासी वाढला । सटवीने नेला कैसा नाही ॥१॥
काय माय गेली होती भूतापासीं । हरि न ये मुखासी अरे मूढा ॥२॥
पातकें करिता पुढें आहे पुसता । काय उत्तर देता होशील तू ॥३॥
अनेक यातना यम करवील । कोण सोडवील तेथें तुजला ॥४॥
एका जनार्दनी सांगताहें तोंदें । आहा वाचा रडे बोलतांचि ॥५॥
हरी मुखी गाता हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृ॥
10.
स्वहिताकारणें संगती साधूची । भावे भक्ति हरीची भेटी तेणें ॥१॥
हरि तेथें संत संत तेथे हरी । ऐसे वेद चारी बोलताती ॥२॥
ब्रह्मा डोळसातें वेदार्थ ना कळे । तेथें हे आंधळे व्यर्थ होती ॥३॥
वेदार्थाचा गोंवा कन्याभिलाष । वेदें नाही ऐसे सांगितले ॥४॥
वेदांचीं ही बीजाक्षरें हरी दोनी । एका जनार्दनी हरि बोला ॥५॥
हरी मुखी गाता हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृ॥
11.
सत्पद ते ब्रह्म चित्पद तें माया । आनंदपदीं जया म्हणती हरी ॥१॥
सत्पद निर्गुण चित्पद सगुण । सगुण निर्गुण हरिपायीं ॥२॥
तत्सदिति ऐसे पैल वस्तूवरी । गीतेमाजी हरि बोलियेले ॥३॥
हरिपदप्राप्ती भोळ्या भाविकांसी । अभिमानियांसी नर्कवास ॥४॥
अस्ति भाति प्रिय ऐशीं पदे तिनी । एका जनार्दनी तेंचि झाले ॥५॥
हरी मुखी गाता हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृ॥
12.
नाकळे तें कळे कळे ते नाकळे । वळे तें ना वळें गुरुविणें ॥१॥
निर्गुण पावलें सगुणीं भजता । विकल्प धरिता जिव्हा झडे ॥२॥
बहुरूपी घरी संन्यासाचा वेष । पाहोन तयास धन देती ॥३॥
संन्याशाला नाही बहुरूपियाला । सगुणीं भजला तेथें पावे ॥४॥
अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी । एका जनार्दनी ओळखिलें ॥५॥
हरी मुखी गाता हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृ॥
13.
ओळखिला हरि सांठविला पोटीं । होता त्याची भेटी दुःख कैंचें ॥१॥
नर अथवा नारी हो का दुराचारी । मुखी गाता हरि पवित्र तो ॥२॥
पवित्र ते कुळ धन्य त्याची माय । हरि मुखे गाय नित्य नेमे ॥३॥
काम क्रोध लोभ जयाचे अंतरीं । नाही अधिकारी ऐसा येथे ॥४॥
वैष्णवांचें गुह्य काढिलें निवडुनी । एका जनार्दनी हरि बोला ॥५॥
हरी मुखी गाता हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृ॥
14.
हरि बोला देता हरि बोला घेतां । हांसतां खेळता हरि बोला ॥१॥
हरि बोला गाता हरि बोला खातां । सर्व कार्य करिता हरि बोला ॥२॥
हरि बोला एकांती हरि बोला लोकांतीं । देहत्यागांतीं हरि बोला ॥३॥
हरि बोला भांडतां हरि बोला कांडतां । उठता बैसता हरि बोला ॥४॥
हरि बोला जनी हरि बोला विजनी । एका जनार्दनी हरि बोला ॥५॥
हरी मुखी गाता हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृ॥
15.
एक तीन पांच मेळा पञ्चवीसांच । छत्तिस तत्त्वांचा मूळ हरि ॥१॥
कल्पना अविद्या तेणे झाला जीव । मायोपाधी शिव बोलिजेति ॥२॥
जीव शिव दोन्ही हरिरूपीं तरंग । सिंधु तो अभंग नेणें हरी ॥३॥
शुक्तीवरी रजत पाहतां डोळा दिसे । रज्जूवरी भासे मिथ्या सर्प ॥४॥
क्षेत्र\-क्षेत्रज्ञातें जाणताती ज्ञानी । एका जनार्दनी हरि बोला ॥५॥
हरी मुखी गाता हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृ॥
16.
कल्पनेपासूनी कल्पिला जो ठेवा । तेणें पडे गोंवा नेणे हरी ॥१॥
दिधल्या वांचूनि फळप्राप्ति कैंची । इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा ॥२॥
इच्छावे ते जवळी चरण हरीचे । चरण सर्व नारायण देतो तुज ॥३॥
न सुटे कल्पना अभिमानाची गांठी । घेतां जन्म कोटी हरि कैंचा ॥४॥
एका जनार्दनी सांपडली खूण । कल्पना अभिमान हरि झाला ॥५॥
हरी मुखी गाता हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृ॥
17.
काय पद्मनीचे षंढासी सोहळे । वांझेसी दोहाळे कैची होती ॥१॥
अंधापुढें दीप खरासी चंदन । सर्पासी दुधपान करू नये ॥२॥
क्रोधि अविश्वासी त्यासी बोध कैंचा । व्यर्थ आपुली वाचा शिणवूं नये ॥३॥
खळाची संगती उपयोगासी न ये । आपणा अपाय त्याचे संगे ॥४॥
वैष्णवीं कुपथ्य टाकिल वाळूनी । एका जनार्दनी तेचि भले ॥५॥
हरी मुखी गाता हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृ॥
18.
न जायेचि ताठा नित्य खटाटोप । मण्डुकीं वटवट तैसे ते गा ॥१॥
प्रेमावीण भजन नाकाविण मोती । अर्थाविण पोथी वाचुनी काय ॥२॥
कुंकवा नाही ठावे म्हणे मी आहेव । भावावीण देव कैसा पावे ॥३॥
अनुतापेवीण भाव कैसा राहे । अनुभवें पाहें शोधूनिया ॥४॥
पाहतां पाहणें गेले तें शोधूनी । एका जनार्दनी अनुभविलें ॥५॥
हरी मुखी गाता हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृ॥
19.
परिमळ गेलिया वोस फुल देठी । आयुष्या शेवटी देह तैसा ॥१॥
घडीघडी काळ वाट याची पाहे । अजून किती आहे अवकाश ॥२॥
हाचि अनुताप घेऊन सावध । कांहीं तरी बोध करी मना ॥३॥
एक तास उरला खट्वांग रायासी । भाग्यदशा कैसी प्राप्त झाली ॥४॥
सांपडला हरि तयाला साधनी । एका जनार्दनी हरि बोला ॥५॥
हरी मुखी गाता हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृ॥
20.
करा रे बापांनो साधन हरीचें । झणी करणीचें करू नका ॥१॥
जेणे बा न ये जन्म यमाची यातना । ऐशिया साधना करा कांहीं ॥२॥
साधनाचे सार मंत्रबीज हरी । आत्मतत्त्व धरी तोचि एक ॥३॥
कोटि कोटि यज्ञ नित्य ज्याचा नेम । एक हरि नाम जपतां घडे ॥४॥
एका जनार्दनी न घ्यावा संशय । निश्चयेंसी होय हरिरूप ॥५॥
हरी मुखी गाता हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृ॥
21.
बारा सोळा जणी हरीसी नेणती । म्हणोनी फिरती रात्रंदिवस ॥१॥
सहस्र मुखांचा वर्णिता भागला । हर्ष जया झाला तेणे सुखे ॥२॥
वेद जाणू गेला पुधें मौनावला । तें गुह्य तुजला प्राप्त कैंचें ॥३॥
पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा । दास सद्गुरूचा तोचि जाणे ॥४॥
जाणते नेणते हरीचे ठिकाणी । एका जनार्दनी हरि बोला ॥५॥
हरी मुखी गाता हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृ॥
22.
पिंडीं देहस्थिती ब्रह्मांडी पसारा । हरिविण सार व्यर्थ भ्रम ॥१॥
शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिलमुनी । हरिसी जाणोनि हरिच झाले ॥२॥
या रे या रे धरू हरिनाम तारूं । भवाचा सागरू भय नाही ॥३॥
साधुसंत गेले आनंदी राहिले । हरिनामें झाले कृतकृत्य ॥४॥
एका जनार्दनी मांडिले दुकान । देतो मोलावीण सर्व वस्तु ॥५॥
हरी मुखी गाता हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृ॥
23.
आवडीने भावे हरिनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥१॥
नको खेद करू कोणत्या गोष्टीचा । पति तो लक्ष्मीचा जाणतसे ॥२॥
सकळ जीवांचा करितो सांभाळ । तुज मोकलील ऐसे नाही ॥३॥
जैसी स्थिति आहे तैशापरी राहे । कौतुक तू पाहें संचिताचें ॥४॥
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा । हरिकृपें त्याचा नाश झाला ॥५॥
हरी मुखी गाता हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृ॥
24.
दुर्बळाची कन्या समर्थाने केली । अवदसा निमाली दरिद्राची ॥१॥
हरिकृपा होता भक्ता निघती दोंदें । नाचती स्वानंदे हरिरंगी ॥२॥
देव भक्त दोन्ही एकरूप झाले । मुळींच संचलें जैसे तैसें ॥३॥
पाजळली ज्योती कापुराची वाती । ओवाळिता आरती भेद नुरे ॥४॥
एका जनार्दनी कल्पेंची मुराला । तोचि झाला ब्रह्मरूप ॥५॥
हरी मुखी गाता हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृ॥
25.
मुद्रा ती पांचवी लावूनिया लक्ष । तो आत्मा प्रत्यक्ष हरि दिसे ॥१॥
कानी जे पेरिलें डोळा तें उगवलें । व्यापकें भारले तोचि हरि ॥२॥
कर्म-उपासना-ज्ञानमार्गीं झाले । हरिपाठी आले सर्व मार्ग ॥३॥
नित्य प्रेमभावे हरिपाठ गाय । हरिकृपा होय तयावरी ॥४॥
झाला हरिपाठ बोलणें येथूनी । एका जनार्दनी हरि बोला ॥५॥
हरी मुखी गाता हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृ॥
हरिपाठ समाप्त......
