मंगल मांगल्य बिरह्म
44.
मंगल मांगल्य बिरह्म ते सखोल । ब्रह्मरुपे खोल ब्रह्म भोगी ॥१॥
ते हे कृष्ण नाम वोळले त्या नंदा । आनंदे यशोदा गीत गात ॥२॥
विश्वाद्य वेदाद्य श्रुतीसी अभेद्य । ते ब्रह्मपणे वंद्य ब्रह्म भोगी ॥३॥
ॐकार मूर्धनि प्रणव प्रणम्य । वेदादि आगम आंगभूत ॥४॥
निराळा वैकुंठ निराकार धीट । निकट एकट ब्रह्मपणे ॥५॥
निवृत्ति परिवार गुरु गयनी अमर । गोरक्षी कंदर ब्रह्म माझे ॥६॥
अर्थ:
ते हे ब्रह्म सर्व मंगलाचे मांगल्य असुन योगी सखोल चिंतन करुन ह्याचे ब्रह्मपण भोगतात.तेच परब्रह्म कृष्ण नाम घेऊन नंदाच्या घरी आवतरले व त्यामुळे गीत गाऊन यशोदा आनंद व्यक्त करते.जे वेदांचे आद्य, जे विश्वाची सुरवात जे श्रुतीला अभेद्य असलेले ब्रह्म त्याच्याशी समरसुन योगी त्याचा भोग घेतात.ॐकारचे ध्यान सहस्त्रदळ चक्राचे अंतर्गत मूर्ध्नि स्थानी करतात.ॐकार स्वरुप होऊनच ॐकाराचे ध्यान करावे. व ते करण्यासाठी वेद किंवा इतर ग्रंथानी त्या ब्रह्मस्वरुपाचे वर्णन केले आहे त्याचे चिंतन करुन केले तर फलद्रूप होते. वेदांनी वर्णन केलेले हे अद्वैत ब्रह्म निराकार असुन ते एकटे आहे. निवृत्तिनाथ म्हणतात ज्या गुरुनी मला अमरत्व दिले त्यांनी व गोरक्षनाथांनी ज्या निगमस्थानी रहिवास केला तेथेच मी ही त्यांच्या सोबत राहिलो.
