सकळ सुखाचे जे सुख ।
569.
सकळ सुखाचे जे सुख । तेंचि सोलीव श्रीमुख ॥१॥
विठ्ठल विठठलीं शोभा । मिरवितसे स्वयंभा ॥२॥
मीतूंपणाचा शेवट तोचि मस्तकी मुगुट ॥३॥
अधिष्ठान जे निर्मळ । तेंचि लल्लट सोज्वळ ॥४॥
श्रुति विवेक ये विवेका । तेंचि श्रवण ऐका ॥५॥
जिव शिवएक ठसा । कुंडले सर्वांग डोळसा ॥६॥
जे का आदित्या तेज तेजाळें । तेंचि तया अंगी झाले डोळे ॥७॥
चितशक्तीचें जाणनेंपणा । तेंचि नयनींचे अंजन ॥८॥
शोभा शोभवी जे बिक । तेंचि मुखीचे नासिक ॥९॥
वदन म्हणिजे सुखसागर । तळपती हिरिया ऐसे अधर ॥१०॥
सच्चित्पर्दाची जे माळा । माळागुणें पडली गळा ॥११॥
कर्म कर्तव्य जे फळे । तेचि कर कटी सरळ ॥१२॥
कोहं कोहं मुस अटी । तेचि आटीव बहुवटीं ॥१३॥
कवणें व्यक्ती नये रुपा । हृदयी पदक पहा पा ॥१४॥
नाभीका पुर्णानंदी । तेचि नाभी तया दोंदी ॥१५॥
निःशेष सारुनी अंबर । तो कासे पीतांबर ॥१६॥
महासिद्धी ज्या वाजंटा । त्याची मेखळे जडल्या घंटा ॥१७॥
गती चालविती गती । तेचि समचरण शोभती ॥१८॥
अहं सांडोनि अहंकार । तोचि चरणीम तोडर ॥१९॥
अर्थाअर्थी जडली निकी । ते शोभती वाळे वाकी ॥२०॥
शंख चक्र पद्म गदा । चरी पुरुषार्थ आयुधा ॥२१॥
शून्यशून्य पायातळीं । तेचि विट हे शोभली ॥२२॥
दृश्य सारोनियां शोभा । समचरणी विठ्ठल उभा॥२३॥
चरणातळीं ऊर्ध्व रेखा । जाला जनार्दन एका ॥२४॥
