तव कृष्ण म्हणे बळिरा
159.
तव कृष्ण म्हणे बळिरामदेवा ।
आमुचाही वाटा काही ठेवा ।
ते म्हणती यावरी अवघा ।
तुमचाचि भाग निश्रिचतार्थे ॥१॥
कुळवई आणि राजा कंस ।
अर्थार्थी हे दिधले तुम्हास ।
कृष्णजी म्हणती हे नये चित्तास ।
यातहि वाटा पाहिजे ॥२॥
बरे म्हणोनिया बळिराम ।
यातहि घ्या हो निमेनिम ।
मग मिसळले जेवि निरसावया तम ।
चंद्रसूर्य पौर्णिमेचे ॥३॥
तेथे झाला हाहा:कार ।
घ्या घ्या शब्द उठिला थोर ।
कृष्ण नेटका झुंजार ।
आणि बळिरामहि महाबळी ॥४॥
करुनिया मल्लां महामारी ।
निर्दाळिले एका निमिषावरी ।
तव तो कुळवई लोटिला निशाचरी ।
कृष्णे सोंडेसीचि धरियला ॥५॥
आसडूनिया तो महीवरी ।
उपटूनि दात घेतले करी ।
ठोकिता तेणेचि मस्तकावरी ।
ठिकरिया केली गंडस्थळे ॥६॥
निळा म्हणे बळियाबळि ।
माजी ब्रम्हांडा एक वनमाळी ।
यापरी करुनिया रवंदळी ।
निर्दाळिले असुर ॥७॥
