कुवळई मर्दूनिया उन्म
160.
कुवळई मर्दूनिया उन्मत्त ।
उपटूनिया घेतले त्यांचे दात ।
बळिराम आणि कृष्णनाथ ।
आनंदे नाचत रणसौरे ॥१॥
दोघेहि बंधु अति सुंदर ।
लावण्यगुणे गुणगंभीर ।
हे देखोनिया महावीर ।
मुष्टीक चाणूर उठावले ॥२॥
ते रायाचे परम आप्त ।
आतुर्बळी बळ प्रताप ।
जया देखताचि आहाकंप ।
देवा दैत्या मनवा ॥३॥
दंडी मुडपी उरी शिरी ।
अदभुत बळाची उजरी ।
काळासम तुल्य ते निशाचरी ।
जेठिया वस्ताद मल्लाचे ॥४॥
तयाचिये दृष्टीपुढे ।
मेरुमांदार भासती खडे ।
मल्लविधेमाजी निधडे ।
वीर उन्नत शिघ्रकोपी ॥५॥
जयाचा सदा आडदरा ।
समुद्रवलयांकिता वीरा ।
धाके त्याचिया कंसापुरा ।
देती करभार सर्वही नृप ॥६॥
निळा म्हणे ते आग्रगण ।
जेठियांमाजी शिरोरत्न ।
भुजा दंडांते थोपटून ।
राहिले उठोन पुढे उभे ॥७॥
