जय गोविंदा परमानंदा
2004.
जय गोविंदा परमानंदा ऐक माझे बोल । निर्गुणरुपे असता तुझे कांहींच नव्हे मोल ।
मग तुं माया रुप धरणी अती जाहलासी सबळ । नसतें देवपणा अंगी आणुनी चाळविसी केवळ ॥१॥
ऐस लाघवी तू रामा । नको चाळवुं आह्मा ॥धृ.॥
नसतां तुज मज भेद देवा लटिकें जीवपण देसी । आपुले ठायी थोरपण आणुनी आमुची सेवा घेसी ।
नसती अविद्या पाठी लावुनी संसारी गोंविसे । नाना कर्मे केली म्हणोनी आम्हा का दंडिसी ॥२॥
माते भावे भजिजे ऐसा उपदेश करिसी । आपुल्या भक्ता तारीन म्हणोनी प्रतापें बोलसी ।
निंदक दुर्जन अभक्त त्यांते नरकी तू घालिसी । आपुल्या स्वार्थालागुनी दुसरीयातें का पीडिसी ॥३॥
आपुली महिमा वाढो म्हणोनि आम्हा भक्त केले । लक्ष चौर्यायंशी योनी देउनी संसारी गोविंले ।
भावे तुंते न भजों म्हणोनि आकस आरंभिले । तुज मज वैर देवा ऐसे करिता नव्हे भलें ॥४॥
ऐसे तुज मज वैर म्हणोनि गुरुसी शरण गेलों । देवभक्तपण कोण्या कर्मे मग पुसों लागलों ।
सदगुरु म्हणती सर्वही मायिक निश्चये बोलिलो । देव आणि भक्त एकचि गोष्टिसी पावलों ॥५॥
मग गृरुकृपें करुन तुझे गिळीन देवपण । तुझिया नेणो भक्तावरी घालीन पाषाण ।
जीव शिव दोन्ही मिळोनी मग मे सुखे राहीनक । तुज मज रुप ना रेखा त्यांते निर्धारीन ॥६॥
ऐसे भक्तबोल ऐकुनी देवा थोर उपजली चिंता । विवेकबळें करुनि माझे देवपण उडवील आता ।
यालागी भिणें भक्तजनांसी ऐक्य करुनी तत्त्वता । एका जनार्दनी दरुशन द्यावे लागेल त्वरिता ॥७॥
