अमित्य भुवनी भरले शे
743.
अमित्य भुवनी भरले शेखी जे उरले ।
ते रूप आपुले मज दावियले वो माय ॥१॥
आता मी नये आपुलिया आस ।
तुटले सायास भ्रांतीचे वो माय ॥२॥
मंजुळ मंजुळ वायो गती झळकती ।
तापत्रये निवृत्ति निर्वाळिले वो माय ॥३॥
वेडावले एकाएकी निजधाम रूपी ।
रखुमादेविवरू दीपी दिव्य तेज वो माय ॥४॥
अर्थ :
अमित्य म्हणजे अनंत निरतिशय आनंदरूप जे ब्रह्म ते चतुर्दश भुवनांत भरून पुन्हा उरले आहे. तेच ब्रह्म माझा आत्मा असून तो मला श्रीगुरू निवृत्तींनी दाखविला. आता आत्म ज्ञानोदयानंतर पुन्हा मी संसाराची आशा करणार नाही. कारण संसारभ्रांतीमुळे होणारे सायास सर्व निवृत्त झाले. आत्मसुखाच्या शांतीचा वारा शीतल झुळु, झुळु येऊ लागल्यामुळे तापत्रयापासून मी अगदी दूर झालो. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल म्हणजे परमात्मा त्या अद्वितीय स्वप्रकाश तेजामध्ये म्हणजे आनंदामध्ये मी अगदी वेडावून गेलो. असे माऊली सांगतात.
