वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ५. सुन्दरकाण्ड - अध्याय ४२ › २०. राक्षसांचा पराभव

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088228 · अभंग क्र. २०

20.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

सुंदरकांड

॥ अध्याय विसावा ॥
हनुमंताचे सीतेला आश्वासन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रावणाचा अपमान करून व लंका जाळून मारुती परतला

कोट्यानुकोटी वीर मर्दून । लंकाभुवना करोनि दहन ।
रावणाते अपमानून । कपि परतोन निघाला ॥१॥

त्यावेळी त्याच्या मनात चाललेले विचार :

वीर मर्दितां समस्त । सांपडला लंकानाथ ।
हनुमान न करी त्याचा घात । श्रीरघुनाथ क्षोभेल ॥२॥
रामे वाहिली असे आण । विंधोनियां निजबाण ।
रणी मारीन रावण । असत्य कोण करू शके ॥३॥
हांती सांपडला लंकानाथ । मारिता क्षोभेल रघुनाथ ।
यालागी न मारीच हनुमंत । जीवे जीत सोडिला ॥४॥
असत्य ठेवोनि स्वामीचे माथा । म्या मिरवावी वाढिवता ।
जळो ते श्लांघ्यता हनुमंता । म्हणोनी लंकानाथा न मारीच ॥५॥
अशोकवनी वनउपाडा । निधडियां वीरां करोनि रगडा ।
हनुमान लोटोनियां पुढा । इंद्रजित गाढा पळविला ॥६॥
रावणासी जीवे मारिता । क्षणही न लगे मज आता ।
मर्यादा नुल्लंघवे मज रघुनाथा । तेणे लंकानाथा न मारीच ॥७॥
बळे मारोनि जंबुमाळी । अखया उपडोनियां पौळी ।
राक्षसभवना करोनि होळी । कपि महाबळी परतला ॥८॥

त्याची उल्लसित वृत्ती :

वने उपवनें शोधिता । भाग्ये सांपडली सीता ।
शुद्धि सांगावया श्रीरघुनाथा । हनुमंता उल्लास ॥९॥
एकेच उड्डाणे श्रीरघुनाथा । चरणी ठेवावया माथा ।
शुद्धि सांगावया सीता । हनुमंता उल्लास ॥१०॥

सागराला त्रास होउ नये म्हणून पुच्छ लहान करून दाह शमन :

केव्हा देखेन रघुनाथा । केव्हा शुद्धि सांगेन सीता ।
ऐसी आवडी हनुमंता । उल्लासता परतला ॥११॥
जळत पुच्छ धरोनि वरी । विझवूं जाता पै सागरी ।
समुद्रें निवारिला लहरीं । ऐसे न करी हनुमंता ॥१२॥
पुच्छ बुचकाळितां सागरा । कढू सुटेल समुद्रनीरा ।
उकाडा होईल जळचरां । ऐसे कपींद्रा न करावे ॥१३॥
पित्या पवनातें प्रार्थूनीं । पुच्छाग्री पेटविला वज्राग्नी ।
तेणे कढेल समुद्रपाणी । मरतील श्रेणी जळजंतूंच्या ॥१४॥
पुच्छ पसरिल्या समुद्रतीरी । सिंधु म्हणे मी घालीन लहरी ।
विझवोनियां क्षणामाझारीं । युक्ती कपींद्रें मानिली ॥१५॥
धरिले होते रूप दारूण । पुच्छ वाढविलें गगन व्यापून ।
ते उग्रपण सांडोन । धरी सामान्य कपिरूप ॥१६॥
सामान्य रूप समुद्रतीरी । पुच्छ पसरितां लीळेंकरीं ।
क्षणार्धे विझविलें लहरीं । जाहली वानरी विश्रांति ॥१७॥

त्यावेळी आलेला घामाचा थेंब समुद्रात पडून तो मगरीच्या पोटात गेला :

स्वेद निपटोनि शरीरी । स्वये सांडितां सागरी ।
पडिला तो ग्रासिला मगरीं । तेणेंचि उदरी गर्भ तिसी ॥१८॥
मगरोदरीं गर्भसमाज । हनुमंताचा पुत्र स्वेदज ।
जन्म पावला मकरध्वज । बळसमाज कपीसम ॥१९॥
हनुमंते ऐसियापरी । पुच्छ विझवोनि सागरी ।
कथा चालिली पुढारीं । निजनिर्धारी अवधारा ॥२०॥

मारूतीचे पुच्छ पेटवून त्याला जाळला असे राक्षसी सीतेला सांगतात :

आगी लावोनि पुच्छासी । रावणे मारिले हनुमंतासी ।
राक्षसी सांगती सीतेपासी । तेणे तिसी अति चिंता ॥२१॥
करोनिया वनउपाडा । राक्षसांसी केला झगडा ।
मारोनि धुरा बुजोनि आगडा । आपणही पुढा निमाला ॥२२॥
धुरा मारोनि करोनि रण । आपणही रणी दिधला प्राण ।
हे वानराचें उन्मत्तपण । स्वामिकार्य न साधेचि ॥२३॥
वानर पालेखाइरा किती । मारू गेला लंकापती ।
तेणे जाळिला पुच्छी प्रदीप्ती । शुद्धि सीतापति न पवेचि ॥२४॥
आणिक एक मूर्खपण । का सांगितले आत्ममरण ।
आपणा मारविलें आपण । हे अभाग्यपण मज माझे ॥२५॥
रावणे मारिले हनुमंता । शुद्धि न पवेचि श्रीरघुनाथा ।
यासी म्या काय करावे आता । शोकें सीता संतप्त ॥२६॥
दुस्तर सागर शतयोजन । कोणा न येववे उड्डाण करून ।
शुद्धि न पवेचि रघुनंदन । अभाग्य पूर्ण हे माझे ॥२७॥

सीतेचे दुःख :

ऐकोनि हनुमंताचे मरण । अश्रुधारा स्त्रवती नयन ।
अति दुःखे आक्रंदोन । मूर्च्छापन्न जानकी ॥२८॥
हनुमंताचे मरणापुढा । पुत्रशोक तो बापुडा ।
आघात वाजला एवढा । आंत चरफडा तळमळी ॥२९॥
माझे आकांताचा सांगाती । तोही निमाला मारूती ।
आता कैसेनि भेटेल श्रीरघुपती । चिंतावर्ती जानकी ॥३०॥

लंका जाळून मारूती परत गेला अशी शुभ वार्ता सरमा सीतेला सांगते :

त्रिजटेची सखी परमा । हरिखें सांगों आली सरमा ।
मरण नाही वो प्लवंगमा । पराक्रमा ऐक त्याचे ॥३१॥
तोडितां कमलमृणालांस । सायास न पवेचि गजास ।
तेंवी कपीनें छेदोनि पाश । घेवोनि मीस राहिला ॥३२॥
पुच्छी पेटविता हुताशन । रावणाची दशवदनें ।
खांड मिशांतें जाळून । पाडिला अपमान लंकेशा ॥३३॥
तुझे वस्तीचें अशोकवन । ते न जाळीच हुताशन ।
येर लंकेचें केले दहन । भवने भवने शोधोनि ॥३४॥
पुच्छ पेटविल्यापाठी । सुभट वीर जगजेठी ।
राक्षस मारिले कोट्यनुकोटी । पुच्छासाठीं वानरे ॥३५॥
लंकेमाजी भवन भवन । पुच्छे केले पुरदहन ।
वानरा गाढी अंगवण । गेला गांजोन लंकेशा ॥३६॥
इतुके करोनिया कंदन । समुद्री पुच्छ विझवोन ।
तुझी निजशुद्धि घेवोन । गेला ठाकोन श्रीरामा ॥३७॥
हनुमंत जावोनिया तेथे । घेवोनि येईल श्रीरामाते ।
शीघ्र पावेल वो येथे । जाण निश्चये जानकीये ॥३८॥

सीतेला आनंद :

ऐकोनि सरमेचें वचन । सीता जाहली सुखसंपन्न ।
तीस देवोनि आलिंगन । दिधले भूषण निजमुद्रा ॥३९॥
सरमा म्हणे अहो माते । आम्ही तुझी आज्ञांकितें ।
कायसा सन्मान आमुतें । राक्षसी माते नको म्हणो ॥४०॥
सीता म्हणे तू आकांतसांगातिणी । आम्ही तुम्ही निर्वाणबहिणी ।
विकल्प न धरी वो साजणी । सरमा चरणी लागली ॥४१॥
ऐकोनि सरमेचें वचन । सीता पावली समाधान ।
येरीकडे हनुमंत आपण । अति उद्विग्न स्वये जाहला ॥४२॥

लंकेच्या भडकलेल्या आगीत सीताही भस्म झाली असा मारूतीचा समज :

पुच्छ समुद्री विझवून । घ्यावया श्रीरामदर्शन ।
आले हनुमंतासी स्फुरण । करावया उड्डाण सज्ज जाहला ॥४३॥
मागील पाहता आवांका । ज्वलनाकुळ देखिली लंका ।
कपीसी पडली आशंका । सीता निःशेखा भस्म जाहली ॥४४॥
अति चिंता हनुमंता । जाळोन स्वामींची कांता ।
काय शुद्धी सांगों रघुनाथा । केले अनर्था मर्कटत्वें ॥४५॥
लंका साटोपे जाळितां । न पाहेंचि स्वामिकार्यार्था ।
न पाहेंचि निजस्वार्था । केले अनर्था मर्कटत्वें ॥४६॥
मारिले वीर कोट्यनुकोटी । लंका जाळितां उठाउठी ।
जाळिली सीता गोरटी । ही बुद्धि खोटी पै माझी ॥४७॥
जो जो म्या केला पुरूषार्थ । तो तो जाहला मज निंद्यार्थ ।
जाळिली श्रीरामाची कांता । काय रघुनाथा मुख दावू ॥४८॥
दहनीं जाळिली सीता सती । जळो जळो माझी ख्याती ।
कीर्ति हे जाहली अपकीर्ति । केंवी रघुपतीस मुख दावूं ॥४९॥
तिची शुद्धि सांगों जाता । दहनीं जाळिली ती सीता ।
अपयश आले मज हनुमंता । केंवी रघुनाथा मुख दावूं ॥५०॥
पुच्छाग्नीच्या आवर्ती । लंका जाळिली सहितक्षिती ।
अदग्ध चार बोटे नुरती । सीता केउती वांचेल ॥५१॥
विचार न करिता मर्कटा । करोनिया मर्कटचेष्टा ।
बारा जणा श्रेष्ठश्रेष्ठां । केल्या बारा वाटा ते ऐका ॥५२॥
एकता सीतेचे मरण । श्रीराम सांडील निजप्राण ।
प्राण सांडील लक्ष्मण । भरत शत्रुघ्न निमतील ॥५३॥
निमतील तिघी माता । मरण नल नीळ जांबवंता ।
मरण सुग्रीवा कपिनाथा । अंगद तत्वता निमेल ॥५४॥
ऐसिऐशिया श्रेष्ठश्रेष्ठा । माझेनि ऐशा बारा वाटा ।
त्याहून श्रेष्ठा आणि कनिष्ठा । मरण बळकट माझेनि ॥५५॥
अयोध्येचे नारी नर । मरतील समग्र वानर ।
एवढ्या अपेशासी पात्र । सीता सुंदर जाळोनी ॥५६॥

क्रोधाचा प्रभाव व त्याची निंदा :

क्रोध केवळ पै मांग । क्रोधे अपवित्र पै सर्वांग ।
साधिल्या काया केला भंग । क्रोधे सांग नागविले ॥५७॥
शुद्धि साधिलियापाठीं । क्रोध संचरला पोटी ।
लंका जाळिली क्रोधदृष्टीं । सीता गोरटी जाळिली म्या ॥५८॥
क्रोध मांगडा अति चांडाळ । जळे निरसे मांगविटाळ ।
क्रोध त्याहून प्रबळ । नव्हे निर्मळ स्नानदानें ॥५९॥
क्रोधाऐसा महावैरी । जडला असता निजजिव्हारीं ।
जो ज्ञानाची मानी थोरी । तो संसारी अति मूर्ख ॥६०॥
क्रोध येऊ न देती दृष्टी । धन्य धन्य ते नरश्रेष्ठी ।
क्रोध आलियाही पोटी । ते विवेकदृष्टीं निर्दळिती ॥६१॥
ऐसिये दृष्टीचे नर । ते चैतन्याचें निजमंदिर ।
परब्रह्माचें भांडार । ब्रह्म साकार ते पुरूष ॥६२॥
भूतीं पाहता भगवद्‌भाव । कामक्रोधांसीं कैंचा ठाव ।
ऐसा ज्याचा निजसद्‌भाव । तोचि स्वयमेव परब्रह्म ॥६३॥
ऐसा समूळ विचार । न करींच मी पामर ।
क्रोधे नागविले साचार । सीता सुंदर जाळिली ॥६४॥
क्रोध आलिया तत्वता । अणुमात्र न करींच स्वार्था ।
करविलें कोटिकोटि अनर्था । जघन्यता जगनिंद्य ॥६५॥
आली मज अति निंद्यता । ऐसेनि श्रीरामासी भेटतां ।
प्रळयो होईल समस्ता । निमाली सीता ऐकोनी ॥६६॥

पुढे काय करावे त्याचा निश्चित विचार :

न वचोनियां श्रीरामापासीं । येथेंचि घ्यावे संन्यासग्रहणासी ।
तंव हाडवैर पडले राक्षसांसी । इहप्रदेशीं राहों न ये ॥६७॥
आता देवों आपुला प्राण । तरी मज सर्वथा न ये मरण ।
तेंही निजात्म लक्षण । आपणा आपण अनुवादे ॥६८॥
जाळूं न शके वैश्वानर । बुडवूं न शके मज सागर ।
भक्षूं न शकती मत्स्यमगर । वज्रशरीर पै माझे ॥६९॥
जाळूनि वज्रदेह मारूती । सिंह व्याघ्र वडवाजती ।
सर्वथा मजला न भक्षिती । मृत्यु हनुमंती असेना ॥७०॥
भेटवेना श्रीरघुनाथा । मरण नये मरों जाता ।
संन्यास न घेववें पै घेता । काय म्या आता करावे ॥७१॥
ऐसा हनुमंत आपण । सीता निमाली मानून ।
तेणे जाहला अति उद्विग्न । समाधान पावेना ॥७२॥
मग म्हणे श्रीरघुनाथा । पाव माझिया आकांता ।
काय करावे म्या आता । बुद्धिदाता होय मज ॥७३॥
ऐसी करिता विनंती । श्रीराम नांदे सर्वा भूतीं ।
तेचि काळी पै मारूती । अगाध युक्ती आठवली ॥७४॥

सीता भस्म होणारच नाही असा आत्मविश्वास :

श्रीराम एकपत्‍नीधारी । श्रीरामसेवा तपसामग्री ।
सत्य श्रीरामनाम जिव्हारी । वन्हि कैशापरी जाळील ॥७५॥
श्रीरामव्रतें सीता सती । श्रीरामाची अनन्य भक्ती ।
श्रीरामनामी अनन्य प्रीती । अग्नि कैसा जाळील ॥७६॥
रावणे आगी लावितां पुच्छी । पुच्छा न जाळवे अग्नीसी ।
तो केंवी जाळील सीतेंसी । विशेषेंसी श्रीरामप्रिया ॥७७॥
श्रीरामाची प्रियकांता । अग्नीसीं न जाळवे सर्वथा ।
अग्नि जाळो न शके सीता । श्रीरामसत्ताप्रतापें ॥७८॥
श्रीरामाचे निजकिंकर । पालेखाइरें मी वानर ।
मम पुच्छ न जाळी वैश्वानर । सीता चिन्मात्र केंवी जाळी ॥७९॥

सीता दग्ध झाल्यास अग्नीला दंड करीन :

जरी जाळिली वन्हीनें सीता । तरी मी त्यासी दंडीन आता ।
कोप आला हनुमंता । शेंडी माथा थरारिली ॥८०॥
करकरलिया दांतदाढा । वळला पुच्छाचा आंकोडा ।
वन्हि दंडावया पुढा । हनुमान गाढा खवळला ॥८१॥

वायूच्या आश्वासनाने मारूतीला स्वास्थ्य :

पिता पवन सांगे कानी । ज्येष्ठ बंधु तुझा वन्ही ।
त्यासी करू नये दंडनी । सीता जननी ते स्वस्थ असे ॥८२॥
अग्नीनें सीता अभिवंदूनी । स्वस्थ ठेविली अशोकवनी ।
ऐसे ऐकतांचि कानी । उल्लास मनी वानरा ॥८३॥
अभिवंदोनि हुताशन । घालोनि पित्यासी लोटांगण ।
घ्यावया सीतेचे दर्शन । केले उड्डाण वानरे ॥८४॥

पुनः लंकेत जाऊन सीतेचे दर्शन :

उड्डाण करोनि हनुमंता । स्वये लंकेमाजी येता ।
दग्धगजभग्नदंता । होय देखता पुरध्वंस ॥८५॥
विमानाकार पुरमंदिरे । जळोन पडली समग्रें ।
पक्ष्यदग्ध पै मयूरें । वैश्वानरें पुरदाहो ॥८६॥
पुच्छाग्निदग्ध लंकाभुवन । त्यामाजी अदग्ध अशोकवन ।
सीता देखानि सुखसंपन्न । केले लोटांगण वानरे ॥८७॥
घालोनिया लोटांगण । आवडी वंदिले चरण ।
सीताचरणक्षालण । केले कपीनें नयनाश्रूंनी ॥८८॥
वेगे येवोनि मारूती । मागे पुढे पाहे सीता सती ।
पाहे मागुती मागुती । पुनरावृत्तीं साक्षेपे ॥८९॥
नाही जळली पोळली । नाही लोम हुरपळली ।
सीता सुखरूप देखिली । पिटिली टाळी हनुमंते ॥९०॥
सीता देखोनि अक्षत । हनुमान आनंदें नाचत ।
माझा फळला पुरूषार्थ । रामकार्यार्थ साधला ॥९१॥
सीताशुद्धि लाभली येथ । जाले सीतामनोगत ।
साधिला श्रीरामकार्यार्थ । माझा पुरूषार्थ मज फळला ॥९२॥
सीतेचे चरणी ठेवोनि माथा । कपि म्हणे माते न करी चिंता ।
घेवोन येईन वो रघुनाथा । ही घे तत्वता भाक माझी ॥९३॥
वानर श्रीरामाचा आप्त । माझाही सखा हनुमंत ।
संकटीं भेटोनि वनाआंत । भवभयार्थ निरसिला ॥९४॥
राक्षस मारोनि समर्थ । लंका करोनि हताहत ।
गांजोनिया लंकानाथ । राम पुरूषार्थ प्रकटिला ॥९५॥

त्यामुळे सीतेला आनंद व तिची विश्रांती घेऊन जाण्याची सूचना :

ऐकता हनुमंताची गोष्टी । फलोत्कट जनकाची भेटी ।
ऐसी जाहली सुखसंतुष्टी । हनुमान दृष्टी देखोनि ॥९६॥
जो आकांतीं रक्षिता । तो हनुमंत माता पिता ।
हनुमान प्रिय श्रीरघुनाथा । वेदशास्त्रार्था मज पूज्य ॥९७॥
लंका जाळितां चौपासी । युद्ध करिता भागलासी ।
तुज द्यावया विश्रांतीसी । नाही मजपासी शेजबाज ॥९८॥
सेवा न घडे हनुमंता । ऐसी माझी अभाग्यता ।
निर्वातस्थळीं एकांता । विश्रांति त्वा आजि घ्यावी ॥९९॥
आजी घेवोनि विश्रांती । प्रात:काळी त्वा मारूती ।
भेटी जावे गा रघुपती । माझी विनंती अवधारी ॥१००॥

मारूतीचे एकमेव विश्रांतिस्थान श्रीरामचंद्र :

एकोन सीतेचे वचन । हनुमान जाहला हास्यवदन ।
ऐक माते सावधान । विश्रांतिस्थान पै माझे ॥१०१॥
जन्ममरणाची निवृत्ती । सकळ श्रमांची विश्रांती ।
त्या रामनामाच्या आवृत्ती । जाण निश्चिती जानकिये ॥१०२॥
युद्ध करिता रणावर्तीं । सबाह्य कवच श्रीराममूर्ती ।
एकाकी जाता दुर्गम पंथी । नाम सांगाती निर्भय ॥१०३॥
आसनी भोजनी शयनी । नित्यावर्ती गमनागमनीं ।
राम सांगाती जागृती स्वप्नीं । सत्य वाणी हे सीते ॥१०४॥
एकोनि हनुमंताची स्थिती । जीवे ओंवाळी सीता सती ।
सबाह्य विकले श्रीराम भक्ती । धन्य मारूती जन्म तुझा ॥१०५॥

ते ऐकून सीतेला आनंद :

ऐकोनि हनुमंताची युक्ती । अकृत्रिम श्रीरामभक्ती ।
तेणे सुखावें सीता सती । धन्य मारूती जन्म तुझा ॥१०६॥
सुखावोनी सीता सती । सवेंचि दचकली पै चित्ती ।
आता जाईल मारूती । केंवी मागुती देखेन ॥१०७॥
तुझे प्रयाण ऐकता । प्राण निघों पाहे आता ।
काय करू गा हनुमंता । आवरितां चित्त आवरेना ॥१०८॥

वानर समुद्र उल्लंघन कसे करतील अशी सीतेची शंका :

आणिक एक हनुमंता । संदेह वर्तताहे चित्ता ।
तोही सांगेन मी आता । सावधानता अवधारी ॥१०९॥
कोटि कोटि वानरभार । कैसेनि लंघिती सागर ।
केंवी पावती पैल पार । दशशिरा दंडावया ॥११०॥
समुद्रलंघनाप्रती । तिघां जणा आहे शक्ती ।
वैनतेय वायु मारूती । चौथियाची गति चालेना ॥१११॥
मिळोनिया नरवानर । केंवी लंघितील महासागर ।
हेचि मज चिंता थोर । सत्य साचार हनुमंता ॥११२॥
समुद्र लंघणें कार्यार्था । आले हनुमंता तुझे माथा ।
राक्षसदमनीं तुज दक्षता । लंकानाथा तुझा धाक ॥११३॥
नांव ऐकोनि हनुमंत । रावण उभ्या चळकापत ।
तुज इंद्रजित सदा धाकत । तुझा पुरूषार्थ अनुपम्य ॥११४॥

हनुमंताचे आश्वासन, रामांच्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास :

ऐकोनि सीतेंचे उत्तर । हनुमान म्हणे मी किंकर ।
श्रीरामप्रताप दुर्धर । ऐक साचार सांगेन ॥११५॥
श्रीरामभातीं दुर्धर शर । बाणी वाहोनि नरवानर ।
राम पाववील समुद्रपार । श्रीरामचंद्र प्रतापी ॥११६॥
वानरसेनेचिया हारी । श्रीराम बैसवोनि शराग्रीं ।
उतरोनियां समुद्री । लंकापरपारीं आणील ॥११७॥
राम लक्ष्मण वीर वरिष्ठ । धनुर्विद्या अति श्रेष्ठ ।
बाण वर्षोनि अति उद्‌भट । दशकंठ छेदील ॥११८॥
रणी पाडिता दशकंठ । इंद्रजिता कुंभकर्ण वरिष्ठ ।
प्रधान मारोनि समसगट । करील सपाट राक्षसा ॥११९॥
इतुके मारावया येथ । शीघ्र आणितों रघुनाथ ।
विलंबू न लगे वो निश्चित । वचन त्रिसत्य हे माझे ॥१२०॥
वाहतो श्रीरामाची आण । शिवतों तुझे श्रीचरण ।
शीघ्र आणीन रघुनंदन । निजप्रमाण हे माझे ॥१२१॥

सीतेला नमस्कार करून हनुमंताचे उड्डाण, सीतेला गद्‍गदून आले :

हनुमंते ऐसिये परी । आश्वासोनि सीता सुंदरी ।
सिंधु उडावया परपारीं । नमस्कारी सीतेते ॥१२२॥
कपीनें करिता नमस्कार । सीतेसी आला गहिंवर ।
तिसी विनंती करी वानर । शुद्धि निर्धार लक्षोनी ॥१२३॥

मारूतीचा आदेश श्रीरामचरणी लीनता ठेवावी :

श्रीराम ध्यानीं धरोनि आता । सांडावी सकळ चित्तचिंता ।
तेणे सत्य प्राप्ति श्रीरघुनाथा । स्वानंदता उल्लासें ॥१२४॥
ध्यानी धरोनि राघवा । चिंता सांडावी देहभावा ।
तेणे ब्रह्मत्व जीवी जीवा । तोचि विसांवा जीवशिवांचा ॥१२५॥
चित्तचित्ता चिंतनवृत्ती । सांडोनि स्मरावा श्रीरघुपती ।
हाचि विसांवा विश्रांती । जीवशीव होती परब्रह्म ॥१२६॥
जीवत्व नाठवे जीवा । शिवत्व नाठवे शिवा ।
नित्य श्रीराम स्मरावा । ते जीवशिवा विश्रांती ॥१२७॥
परब्रह्माचें ब्रह्मपण । राम स्मरतां आठवण ।
ऐसे श्रीरामस्मरण । विसांवा जाण जानकिये ॥१२८॥
ऐकोनि हनुमंताचे वचन । सीता जाहली सुखसंपन्न ।
एकाजनार्दना शरण । गोड निरूपण पुढे आहे ॥१२९॥
कपिकाकुत्स्थ आनंदभेटी । सीताशुद्धीची गोड गोष्टी ।
ऐकता परमानंद सृष्टी । कथाकसवटी अनुपम्य ॥१३०॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
हनूमत्सीताश्वासनं नाम विंशतितमोऽध्यायः ॥२०॥
॥ ओव्या १३० ॥ श्लोक २९ ॥ एवं संख्या १५९ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग