वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १०, देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ७९१ ते ८२०

भुक्ति मुक्ति कारणे

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074541 · अभंग क्र. ८१०

810.
भुक्ति मुक्ति कारणे न घाली तुज साकडी ।
हे तो ठायींचीच जोडी ।
कांही जोडिली असे तुज नेणता हे तुझेंची दळवाडे ।
ऐसे जाणोनी फुडे न बोले दातारा ॥१॥
सलिली तरंग तरंगी सलील ।
निवडूनिया कोण वेगळे करील ॥२॥
उपाधिभेदे भूमि झाली क्षिती ऐसे विचारिता चित्ती अनु न देखे ।
इतुलाले जीवपण तुज मज दातारा वेगळेंची नाही रे गोवळ्या ॥३॥
दर्पणाचे दुजेपण दर्पण जंववरी ते काय वेगळाल्या व्यापारी ठेवू येईल ।
नाम घेऊनी ठेले हेम अळंकारु ।
इतुलाले अंतरू तुज मज रया ॥४॥
वाहटुळीची धांव केवढा वेळु आकाशी ।
सहज स्वभावे निमे अपैसी ।
गगनावरी जाता नलगे पाल्हाळ ।
तैसे तुज मज सकळ ऐक्य रया ॥५॥
गगना वेगळा घटु केवी निपजे दातारा यापरी सर्वेश्वरा तू मी एक ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलु भोगिया ।
येरी असतु वावुगिया गोठी रया ॥६॥

अर्थ :
मला भुक्ति मुक्ति प्राप्त करुन द्या अशा तऱ्हेचे संकट मी तुम्हाला घालीत नाही. कारण मुक्ति हे माझे स्वरुप आहे. व भुक्ति म्हणजे भोग हा प्रारब्धाधीन आहे. म्हणून हे भगवंता तुला भुक्ति मुक्तिचे संकट घालून काय करावयाचे आहे. ? अज्ञानामुळे अनेक जन्माच्या ठिकाणी माझ्या हातून जी काही बरी वाईट कर्मे झाले असतील त्यांचा भोग देण्याकरिता 'तुझेंचि दळवाडे' म्हणजे देहादि विचित्र जगताची रचना तूंच केली आहेस. म्हणून त्याबद्दल मी तुझ्यापुढे काही बोलत नाही. ज्याप्रमाणे उदकावर तरंग किंवा तरंगांत उदक हे एकरुपच असते. त्याचे उदक व तरंग कसे दोन शब्दमात्र वेगळे उच्चारले जातात. ते दोन सत्यत्वाने वेगळे कोण करून दाखविणार? आकाराच्या उपाधिमुळे मृत्तिकाच भिंत झाली. अशा दृष्टीने चित्तांत विचार केला असता परमात्मस्वरुपाव्यतिरिक्त दुसरे काही दिसतच नाही. अशा त-हेने परमात्मा एक व जीव एक असा भेद तुझ्या माझ्यामध्ये उपाधिकृत आहे. त्यात वास्तविक वेगळेपणा मुळीच नाही दर्पणांत दिसणारा दुसरेपणा दर्पणाची उपाधि असेपर्यंत त्या दोन व्यक्ति वेगळाल्या आहेत. असे समजून त्यांना भिन्न, भिन्न व्यवहारामध्ये घालता येईल काय? भिन्न भिन्न नांवे घेऊन जसे अलंकार निराळे असतात, पण सोने एकच असते त्याप्रमाणे तुझ्या माझ्या स्वरुपांत ऐक्य असून जीव शीव नांवे मात्र निराळी आहेत रे बाबा. वाऱ्याची वाहुटळ किती वेळ आकाशांत वाहात असली तरी आपोआप जशी आकाशरुप होते. तिला आकाशरुप होण्यास वेळ किंवा त्रास पडत नाही. त्याप्रमाणे तुझ्या माझ्या स्वरुपात सहज ऐक्य आहे. व्यापक आकाशाचा आश्रय घेतल्याशिवाय जसा घट केव्हाही उत्पन्न होत नाही. त्याप्रमाणे हे सर्वेश्वरा कृष्णा तू आणि मी आत्मरुपाने एकच आहोत. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल तेच एक सर्व जगताचा भोक्ता आहे. जगताच्या भेदाच्या गोष्टी औपाधिक म्हणजे पोकळ आहेत. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग