रूप हे सावंळे भोगिता
130.
रूप हे सावंळे भोगिताती डोळे । उद्धवा सोहळे अक्रूरासी ॥१॥
पदरज वंदी ध्यान हे गोविंदी । उद्धव मुकुंदी तल्लीनता ॥२॥
विदु्र सुखाचा नाम स्मरे वाचा । श्रीकृष्ण तयाचा अंगीकारी ॥३॥
निवृत्तीचे ध्यान ज्ञानदेव खूण । सोपान आपण नामपाठे ॥४॥
अर्थ:
उध्दव व अक्रुराचे डोळे सगुण सावळ्या कृष्णरुपाचे सोहळे भोगत असतात.मथुरेत नेण्यासाठी आलेल्या अक्रुराने त्या गोकुळाच्या धुळीत उमटलेल्या कृष्णपदाचे पहिले दर्शन घेतले तसे करणारा तो पहिला मथुरावासी होता. त्याच मुकुंद नामात तो उध्दव ही निमग्न आहे. तो विदुरकाका सतत त्या कृष्णरुपाचा जप करत असल्याने श्रीकृष्ण भगवानानी त्याचा अंगीकार केला आहे.निवृत्तिनाथ म्हणतात, मी त्या श्रीकृष्ण ध्यानाने, ज्ञानदेव त्या आत्मरुपात त्याची खुण मिळवुन व सोपानदेवानी नामपाठ करुन त्याला आपलासा केला आहे.
