निर्जीव दगडांची काय
240.
निर्जीव दगडांची काय करिसी सेवा ।
तो तुज निर्देवा देईल काय ॥
कवणे गुणे भुली पडली गव्हारा ।
तीर्थाच्या माहेरा नोळखिसी ॥
अष्ठोत्तरशे तीर्थे जयाच्या चरणी ।
तो तुझ्या हृदयभुवनी आत्मारामु ॥
देव जवळी असता जासी आना तीर्था ।
मुकलासी आता म्हणे ज्ञानदेवो ॥
अर्थ :
अरे वेड्या हृदयरुपी मंदिरात परमात्मा वास करीत असताना त्याला विसरुन हा दगडच देव आहे. अशा निश्चयाने त्याची सेवा काय करीत बसला आहेस. परमात्म ज्ञानाचा विचार न करता तू जर देहच मी आहे असे मानू लागला तर निर्दैवी असलेल्या तुला दगड काय देणार. तुला काय भूल पडली हे काही कळत नाही. मुख तीर्थाचि माहेर असलेला जो परमात्मा त्याला तु का ओळखत नाहीस. एकशे आठ तीर्थ ज्याच्या चरणा जवळ आहेत असा परमात्मा तुझ्या हृदयातच आहे. असा जवळच परमात्मा असताना तु उगाच तीर्थभ्रमण करत राहिलास तर तु त्याला मुकशील असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
