ऐकोनिया वाणी पातली त
2191.
ऐकोनिया वाणी पातली ते रमा । बोलिली विश्रामा जीवाचिया ॥१॥
दुर्जनाचा भाव ऐसाचि वोखटा । दर्प त्याचा मोठा आवरेना ॥२॥
दुसर्याचे बरे ते कैसे सोशिती । बळे निखंदिती साटोपाने ॥३॥
दीपाचा प्रकाश सोशीना पतंग । जळताही अंग झेंप घाली ॥४॥
चंद्रोदया आधी फुटतील डोळे । ते काय कावळे पाहातील चंद्र ॥५॥
आधींच सावत्र संबंधी पापीण । राजाही आधीन जिच्या झाल्या ॥६॥
सिंहासनी याच्या मांडीये बैससी । हे ते कैसे सोसी निसंगळ ॥७॥
दैवहीन आम्ही देवचि कोपला । आपुला तो झाला परावा की ॥८॥
देवे द्यावे तेव्हा भोगावे सकळ । न चले कदा बळ दुसर्याचे ॥९॥
कासया तू बाळा स्फुंदसी दु:खाने । देवाहून कोण सखे आम्हा ॥१०॥
नामा म्हणे हित ऐकता मायेचे । चित त्या बाळाचे उठावले ॥११॥
