दुजेपणीचा भावो आम्हा
647.
दुजेपणीचा भावो आम्हा नाही ठावो ।
सर्वी सर्व देवो आकारला. ॥१॥
कैसे याचे करणे सांग आम्हा माय ।
कामधेनु होय कल्पनेची ॥२॥
नित्यसुखवेधे वेधली कामना ।
कृष्णी कृष्ण नयना एक तेजे ॥३॥
निवृत्ति साचार ज्ञानदेवी आचार ।
कृष्णचि परिवार क्षरलासे ॥४॥
अर्थ :
'आता आम्हाला द्वैत म्हणून माहित नाही. सर्वत्र दिसणारे नामरुपादि आकार हा देवच बनला आहे काय त्या परमात्म्याची लीला आहे. ते आम्हाला सांग. मला तर असे वाटते की. भक्त लोकांच्या कल्पनेची पूर्तता करणारा हा परमात्मा कामधेनूच आहे. असे त्याचे आश्चर्य पाहून त्या सुखरुप परमात्म्याचे ठिकाणी वासनेला वेध लावून गेला आहे. तो स्वयंप्रकाश कृष्णरुप परमात्माच डोळा झाल्यामुळे सर्व कृष्णरुपच दिसते. माझे ठिकाणी निवृत्तिरायांनी असा बोध । केल्यामुळे आमचा सर्व आचार विचार आणि परिवार कृष्णच बनला आहे. असा अनुभव आला. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
