एकी म्हणे ग्रह दुजी
646.
एकी म्हणे ग्रह दुजी म्हणे मोह ।
एकीने सोहं सांगितले ॥१॥
कोह वाचे वारी सोहं मते सारी ।
वैकुंठीची दरी उघडली ॥२॥
ककार भेदिला मकार शोधिला ।
ॐ कार निमाला तये स्थानी ॥३॥
ज्ञानदेवी ओहं सोहं गिळिले पै कोहं ।
नाही आम्हा मोह कल्पनेचा ॥४॥
अर्थ :
श्रीकृष्ण परमात्म्याविषयी गौळणी अनंत विकल्प करितात. एकीचा ग्रह असा की कृष्ण हा नंदाचा पोर आहे. दुसरी म्हणते सर्व जीवांना मोहून टाकणारा हा मोह आहे. एकीने सांगितले तो परमात्माच आहे. त्या परमात्म्याचे सोहं म्हणजे आत्मत्वाचे चितन करुन कोहं भाव व त्याच बरोबर सोहं हेही टाकून द्यावे. कारण भोळ्या भाविक जीवांना उपासने करिता हा दिसणारा कृष्ण नव्हे तर ही वैकुंठीची दरीच उघडी केली आहे. ककाराचा भेद केला मकार शोधला. अशा स्थानी ॐ' कार हेच श्रीकृष्णाचे प्रतिक आहे. वस्तुतः शुद्ध परमात्मा त्याच्याठिकाणी अह सोहं कोहं' वगैरे काही एक नाही. ते भाव असण्याचे आम्हाला कल्पनाही नाही असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
