॥ श्रीएकनाथमहाराजकृत
22.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
अरण्यकाण्ड
॥ अध्याय बाविसावा ॥
कबंध राक्षसाचा उद्धार
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
पुढे मार्ग क्रमीत असताना लक्ष्मणाला अपशकुन होऊ लागतातः
करोनि जतायूद्धरण । श्रीराम आणि लक्षमण ।
करावया सीतागवेषण । वनोपवन शोधिती ॥१॥
वन शोधिता लक्ष्मण । तंव देखता होय अपशकुन ।
तेणे भयें कंपायमान । सांगता होय श्रीरामा ॥२॥
लक्ष्मणस्तं महातेजाःसत्यवांश्छीलवाश्छुचिः ।
अब्रवित्प्रांजलिर्वाक्यं भ्रातर दीनचेतसम् ॥१॥
स्पंदते मे दृढं बाहुरुव्दिग्नमिव मे मनः ।
प्रायशश्चाप्यनिष्टानि निमित्तान्युपलक्षये ॥२॥
तत्मात्सज्जोभवार्य त्वं कुरुष्व वचनं मम ।
ममैव हि निमित्तानि सद्यःशंसन्ति संभ्रमम् ॥३॥
सौमित्र तेजस्वी महावीर । परनारी सहोदर ।
सत्यवादी अति पवित्र । नित्य एकाग्र श्रीरामभजनी ॥३॥
त्यायोनियां धनमान । रामा त्यजोनि श्रीरामभजन ।
ऐसा सौमित्र अति पावन । अशुभ चिन्ह अनुवादे ॥४॥
बाहु स्फुरती दुःखायमान । अशुभ लवती लोचन ।
तरी श्रीरामा होई सावधान । अति विघ्न दिसताहे ॥५॥
सव्य जाती पै चाष । कुशब्द बोलती वायस ।
दिग्दाहें कोदले आकाश । दिसे त्रास पशुपक्ष्यां ॥६॥
ऐसे देखोनिया चिन्ह । दोघे जाले सावधान ।
पुढे करावया गमन । तंव दुर्धर विघ्न ओढवले ॥७॥
वनस्य तस्य शब्दोऽभूव्दनमापूरयन्निव ।
तं शब्दं कांक्षमाणस्तु रामः खड्गी सहानुजः॥४॥
श्रीरामलक्ष्मणांसन्मुख । वनी जाली महाहाक ।
तेणे दुमदुमिले तिन्ही लोक । वनी वनौक गजबजिले ॥८॥
श्वापदें आक्रोशे आरडती । एक दिर्घ स्वरें गर्जती ।
एक मूर्च्छागत पडती । वृक्ष उन्मुळती समूळी ॥९॥
ऐसे देखोनि दोघे जण । धनुष्यी सज्जोनिया बाण ।
वनींचे निर्दाळावया विघ्न । सावधान चालिले ॥१०॥
मार्गात जवळपास कोणीतरी राक्षस असेल तर त्याचे पारिपत्य करुन पुढे जाण्याचा विचार :
शुद्ध करावे दंडकारण्य । हे माझी प्रतिज्ञा संपूर्ण ।
तरी आधी निरसोनि येथींचे विघ्न । मग गमन पुढे करु ॥११॥
ऐसे बोलोनि श्रीरघुनाथ । विघ्न निरसावया चालिला तेथ ।
तंव राक्षस अत्यद्भुत । त्या वनांत देखिला ॥१२॥
ददर्श समुहाकायं राक्षसं घोरदर्शनम् ।
विवृद्धमशिरोग्रीवं कबंधमुदरे मुखम् ॥५॥
घोरौ भुजौ विकुर्वाणमुभौ योगनमायतौ ।
आकर्षत विकर्षंतंमनेकान्मृगयूथपान् ।
भक्षयंतं महाघोरानुक्षसींहमृगव्दिजान् ॥६॥
तेवढ्यात दीर्घ शरीर, लांबच लांब हात, पोटात
मुख व तुटक्या पायांचा असा भयानक प्राणी दिसतो :
सकंठ मस्तकी नाही शिर । आकाशप्राय दीर्घ शरीर ।
उदरोदरीं मुख । दाढा अत्युग्र कराळ ॥१३॥
धगधगित दोन्ही नयन । अति क्रोधी निमग्न ।
आणि तळवटी भग्नचरण । बैसलें स्थान सोडीना ॥१४॥
त्याचे भीतिप्रद वर्णन :
अति सलंब दोन्ही हात । एकैक बाहु योजनांत ।
हात दश दिशा भोंवत । कवळोनि खात पशुपक्षी ॥१५॥
मत्तमांतंगाचें कळप । मुखामाजी होती गडप ।
सिंह व्याघ्र आस्वलें अमुप । मुखी निक्षेप दो हाती ॥१६॥
पक्षी उडतां योजनांत । धरोनि घाली मुखाआंत ।
पशु वनांतरी चरत । कवळोनि समस्त मुखी घाली ॥१७॥
गांवगांव उंच हात । अखंड गगनांत भोंवत ।
प्राणी त्याते न देखत । धरोनि मुखांत स्वये घाली ॥१८॥
कबंध दिसे जैसा पर्वत । गुप्त कर भोंवत गगनांत ।
प्राण्यांचें लक्ष नाही तेथ । धरोनि समस्त मुखी घाली ॥१९॥
मारावया राम लक्ष्मण । रावणे धाडिले आठ जण ।
ते राक्षस महाबळिये दारुण । दोघांसी धरोन मारावया ॥२०॥
पुढिले अति गूढ विविनीं । वाट धरोनि मारावया दोनी ।
आठही निघाले कबंधवनीं । तंव तेणे धरोनि भक्षिले ॥२१॥
कबंधे धरोनि आठही जण । स्वेच्छा केले त्यांचे भक्षण ।
मग पुढे धरावया राम लक्ष्मण । लक्ष लावोन राहिलासे ॥२२॥
शिरश्चरणरहित मध्य । यालागी नामे तो कबंध ।
देखोनि राम लक्ष्मण सन्निध । धरावया सिद्ध तो जाला ॥२३॥
कंबधेनातिकायेन समूढौ दीर्घबाहुना ।
भ्रातरौ वैरिणा प्राप्तौ कृशप्राणौ महाबलौ ॥७॥
वदतं कार्यमिह वा किमर्थं चागतौ युवाम् ।
इमं देशमनुप्रातौ क्षुधार्तस्येह तिष्ठतः ॥८॥
कबंधाच्या कक्षेत आल्याबरोबर राम लक्ष्मणांना ओढण्याचा त्याचा प्रयत्नः
त्या दोघांते लक्षोनी । कबंधें दोनी बाहु पसरोनी ।
दोही हाती धरिले दोनी । आवरोनी निजबळे ॥२४॥
त्यांचे करावया भक्षण । कबंध ओढी रघुनंदन लक्ष्मण ।
तंव श्रीराम ओढेना अणुप्रमाण । देखोनि आपण साशंक ॥२५॥
परंतु श्रीरामांना ओढता न आल्याने जिज्ञासा :
मज कबंधाची निजशक्ती । आता दोन्ही माणसे न ओढवती ।
तरी यांचे ठायी दुर्धर शक्ती । याची कुळवृत्ति पुसों पा ॥२६॥
तुम्ही कोणाचे पै कोण । आणि येथे यावया काय कारण ।
या ठाया जे आलेति जाण । मुख्य भक्षण ते माझे ॥२७॥
कबंधाचा पुनः आवळन्यास प्रारंभ :
तंव रामासी म्हणे लक्ष्मण । राक्षसें लाविले दृढ बंधन ।
बळे सुटका नव्हे जाण । काय आपण करावे ॥२८॥
राम म्हणे लागल्या दृढबंधन । तरी आपणा सोडवावे आपण ।
दुज्याची करी जो आस जाण । हीन दीन तो नपुंसक ॥२९॥
सौमित्रा ऐके सावचित्त । याचा पुसूंदे वृत्तात ।
मग याचा करीन घात । न लागता येथ क्षणमात्र ॥३०॥
कबंध म्हने जरी न सांगता वृत्तांत । तरी मी तुमचा करीन घात ।
मग हांसोनिया श्रीरघुनाथ । निजवृत्तांत सांगत ॥३१॥
श्रीराम स्वतःचा वृत्तांत कबंधाला सांगतात :
अरे मी दाशरथि रघुनंदन । रावणे केले सीता हरण ।
तिचे करावया गवेषण । दोघे जण येथे आलो ॥३२॥
तव दीर्घबाहु निमग्नवदन । विक्राळरुपी कैचा कोण ।
मार्ग रोधावया काय कारण । निजलक्ष्मण मज सांगे ॥३३॥
हेंचि माझे निजवृत्त । तू म्हणसील भक्षावें म्या येथ ।
बाहुबळें आकर्षित । दोघे मुखांत घालावया ॥३४॥
कबंध अति क्रोधानळी । दोघांते ओढी सबळ बळी ।
बाहु उखळूं पाहती समुळी । परी बंधूंची जाळी ओढेना ॥३५॥
तंव लक्ष्मण म्हणे श्रीरघुनाथा । हा तंव पेटला निजघाता ।
तरी यासी वधावें शीघ्रता । विलंब आता करु नये ॥३६॥
त्याचे बाहू कापण्याची लक्ष्मणाला आज्ञा :
श्रीराम सांगे आपण । यासी तंव नाहींत चरण ।
बाहुबळें हा सबळ पूर्ण । त्या आपण छेदाव्या ॥३७॥
आम्हा दोघाते धरोनि येथे । याचे यानें गोविले हात ।
तरी भुजा छेदोनि येथ । सावचित्त निजखर्गें ॥३८॥
दक्षिणो दक्षिणं बाहुमासक्तमसिना ततः ।
चिच्छेद रामो वेगेन सव्यं विरस्तु लक्ष्मणः ॥९॥
स पपात महाबाहुश्छिन्नबाहुर्महास्वनः ।
खं च गां च दिशश्वैव नादयज्जलदो यथा ॥१०॥
स निकृत्तौ भुजौ दृष्टवा शोनितौघपरिप्लुतः ।
दिनःपप्रच्छतौ वीरो कौ युवामिति दानवः ॥११॥
खर्ग काढोनिं सावचित्त । श्रीरामे छेदिला दक्षिण हस्त ।
आणि लक्ष्मणे त्याचि क्षणांत । वाम हस्त छेकिला ॥३९॥
भुजा छेदिल्या महा थोर । तंव वाहती रुधिराचे पूर ।
राक्षस अति आक्रंदे थोर । तेणे चराचर दमदमिलें ॥४०॥
नाद कोंदला अंतराळी । नाद कोंदला सप्त पाताळी ।
नादें पक्षी श्वापदें आंदोळी । बैसली टाळी दिग्गजा ॥४१॥
घाये राक्षस कंपायमान । तुम्ही दोघे काय राम लक्ष्मण ।
केले माझ्या भुजांचे छेदन । आणिकांसी जाण न तुटती ॥४२॥
अतर्क्य माझ्या भुजा जाण । लक्षूं जाणे श्रीराम लक्ष्मण ।
आणिका न करवे छेदन । मूर्च्छापन्न देखोनि ॥४३॥
आणिकां न कळे माझी गोष्टी । आणिक मज देखता दृष्टी ।
मूर्च्छापन्न पडती सृष्टी । ते उठाउठी मी भक्षीं ॥४४॥
माझ्या भुजांचे बळ संपूर्ण । ओढिता न ओढती दोघे जण ।
आणि बळे बाहूंचें केले छेदन । तरी राम लक्ष्मण तुम्ही दोघे ॥४५॥
तुमचा घाव लागता देख । दुःख नासूनि वाटे सुख ।
श्रीराम सौमित्र तुम्ही आवश्यक । अलोलिक निजशक्ति ॥४६॥
ऐसे ऐकोनि राक्षस वचन । श्रीराम सौमित्र सांगे आपण ।
आम्ही दोघे श्रीराम लक्ष्मण । सीतागवेषणे करु आलो ॥४७॥
त्वं तु को वा किमर्थ वा कबंधसद्दशो वने ।
आस्येनोरसि दीप्तेन भग्नजंघो विचेष्टसे ॥१२॥
लक्ष्मणाच्या प्रश्नावरुन कबंधाने आपला वृत्तांत सांगितला :
तंव लक्ष्मण पुसे राक्षसासी । तरी तू कोण येथे वनवासी ।
शिरश्चरणेंवीण कबंधेंसीं । येथे रहावयासी काय कारण ॥४८॥
कोथळ प्रचंड चरणेवीण । येथे कैसे आगमन ।
आणि उदरी क्रूर वदन । दीर्घ दर्शन विकराळ ॥४९॥
येथे तुझ्या मुखाहातीं । पशुपक्ष्यां जाली शांती ।
कवळोनि श्वापदें दोन्ही होती । ऐसा अति क्षुधार्थी तू कोअण ॥५०॥
एवमुक्तः कबंधस्तु लक्ष्मणेनोत्तरं वचः ।
उवाच वचनं प्रतिस्तदिदं वचनं स्मरन् ॥१३॥
श्रिया विराजितं पुत्रं दनोस्त्वं विद्धि लक्ष्मण ।
रुपमासीन्ममाचिन्त्यं त्रिषु लोकेषु विश्रुतम् ।
सोऽहं रुपमिदं कृत्वा लोकवित्रासनं महत्॥१४॥
ऐकोनि लक्ष्मणाचे वचन । राक्षस स्वये संतोषोन ।
मग आपुलें पूर्वविधान । स्वये सावधान सांगत ॥५१॥
कश्यपाची प्रियपत्नी । दिती अदिती आणि दनी ।
जे का रुपे श्रीसमानी । ते माझी जननी श्रीरामा ॥५२॥
कश्यपभार्या दनीचा पुत्र दनू स्थूलशिरा ऋषीच्या शापाने कबंध राक्षस झाला :
तरी त्या दनूचा पुत्र मी प्रिय पूर्णु । यालागी माते म्हणती दनु ।
रुपे मदनमोहनु । सबळे पूर्णू बळवंत ॥५३॥
रुपयौवनसंपत्ती । अंगीच्या बळाची उद्धती ।
नानावरदविकटवृत्ती । ऋषी वनांतीं भेडसावीं ॥५४॥
ततः स्थूलशिरा नाम महर्षिः कोपितो मया ।
स चिन्वन्विविधं वन्य रुपेणानेन धर्षितः ॥१५॥
तेनाहमुक्तः प्रेक्ष्यैवं घोरशापाभिधायिना ।
एवदेवं नृशंसं ते रुपमस्तु विगर्हितम् ॥१६॥
स मयाः याचितः क्रुद्धः शापस्यांतो भवेदिति ।
यदा छित्वा भुजौ रामस्त्वां दहेव्दिजने वने ।
तदा त्वं प्राप्यसे रुपं स्वमेव विपुलं शुभम् ॥१७॥
स्थूळशिरा महाऋषीसी । वनी वेंचिता वनफळांसी ।
मी अधोमुखें भेडसावीं त्यासी । तंव तेणे क्रोधावेशीं शापिलें ॥५५॥
विक्राळ मुखयोजन कर । चरणरहित स्थूळ शरीर ।
उदरामाजी निमग्न शिर । होसी अधोर राक्षस ॥५६॥
मग त्याचे धरोनि चरण । उश्शाप मागितला आपण ।
करिता सीतागवेषण । राम लक्ष्मण वना येती ॥५७॥
त्यांसीं तू धरिता भक्षणार्थी । ते दोघे दोन्ही बाहु छेदिती ।
तेव्हा तू पावसी उद्धारगती । ऐसी वरदोक्ति ऋषि वदला ॥५८॥
आणिक एक माझी उद्धती । ते मी सांगे तुम्हांप्रती ।
मज तुष्टला प्रजापती । तपोनुवृत्ती संतोषोनी ॥५९॥
अहं हि तप्सोग्रेण पितामहमतोषयम् ।
दीर्घमायुःस मे प्रादात्ततो मां बिभ्रामोऽस्पृशत् ॥१८॥
दीर्घमायुर्मया प्राप्तं कि मां शकःकरिष्यति ।
इत्येवं बुद्धिमास्थाय रणे शक्रमधर्षयम् ॥१९॥
तस्य बाहुप्रमुक्तेन वज्रेण शतपर्वणा ।
सक्थिनी च शिरश्चैव शरीरे संप्रवेशितम् ॥२०॥
ब्रह्मदेवाच्या वराने दीर्घायुष्य मिळविलेः
तपें पसन्न केला विधाता । ब्रह्मशाप निवारीं म्हणता ।
द्विजशापीं न चले सामर्थ्यता । म्हणे नान्यथा ऋषिभाषित ॥६०॥
न निवारवे ऋषिशापासी । मग मागितले दीर्घायुष्यासी ।
ब्रह्मयाने देवोनि त्या वरासी । अदृश्येसीं तो गेला ॥६१॥
व्हावया ब्रह्मशापप्राप्ती । गर्व वाटला माझे चित्ती ।
मी तंव चिरंजीव त्रिजगती । इंद्रादि किती मजपुढे ॥६२॥
त्या वराच्या उन्मत्तपणाने इंद्राशी केलेल्या युद्धात इंद्राने त्याला विद्रूप केला :
ऐसिया गर्वाची उद्धती । घ्यावया त्याची स्वर्गसंपत्ती ।
जाली इंद्रपदाची प्राप्ती । मज शचीपति कोपला ॥६३॥
मज आयुष्य आहे संपूर्ण । इंद्र मारावया मशक कोण ।
येणेंचि अति गर्वें जाण । युद्ध दारुण म्या केले ॥६४॥
तीक्ष्ण वज्र शतधारा । घाये हाणीतल्या पुरा ।
शरीर निमग्न केले शिरा । चरण धाराअ खंडिले ॥६५॥
घाये दुःखी जालो अत्यंत । इंद्रासी म्हणे मी न करी घात ।
तंव तो म्हणे तू चिरंजीवित । जीविता अंत घडेना ॥६६॥
ऐसे बोलता सुरपती । मज आली ब्रह्मशापप्राप्ती ।
क्षणामाजी पडली भ्रांती । अति उन्मत्ती राक्षस ॥६७॥
उदरोदरीं दिधले मुख । अति विक्राळ आणि विकट ।
दोनी हात योजन एक । अति अगाध अनिवार ॥६८॥
जे जे सापडे हातांत । पशु पक्षी प्राणी नित्य भक्षित ।
तरी क्षुधेसी नाही अंत । समसमित अति दुःखी ॥६९॥
नवल कैसे श्रीरघुनाथा । काय खाऊ हे चिंता ।
आणिक नाठवेचि सर्वथा । उदरवस्था अति दुःखी ॥७०॥
पोटाचिये चिंतेहातीं । जगासी पडली अति भ्रांती ।
हृदयी नाठवे श्रीरघुपती । ऐसा दुःखावर्त उदरार्थ ॥७१॥
वेदशास्त्री अति संपन्न । स्वये म्हणवीं मी सज्ञान ।
तरी शिश्र्नोदरपरायण । इतर जन ते शमक ॥७२॥
असो इतरांची काय कथा । माझी जे का दुःखावस्था ।
सावध ऐके श्रीरघुनाथा । मोक्षदाता तू माझा ॥७३॥
ममाप्यनेने रुपेण निर्वेदःसुमहान्प्रभो ।
मृत्पिण्डभूत एकस्थो जीवलोकविगर्हितः ॥२१॥
दीर्घौचमौ निकृत्तौमे युवाभ्यामायतौ भुजौ ।
राघवौ सन्मया दृष्टौ नास्ति धन्यतरो मया ॥२२॥
सत्यसंधौ तथावीरौ धार्मिकौ सत्यविक्रमौ ।
सहितौ भ्रातरौ दृष्ट्वा मुक्तोहं पापजीवितात् ॥२३॥
श्रीरामदर्शनाने त्याचा उद्धारकाळ समीप आला :
या देहाचे संगतीं । अति दुःखी मी रघुपती ।
मृत्पिंडप्राय नाही गती । निंद्य सर्वांर्थी सर्वस्वें ॥७४॥
यासी नाही गमनगती । नाही अंतरी शुद्धमती ।
बाह्य क्रिया जीवघाती । निंद्य सर्वार्थी सर्वस्वें ॥७५॥
मारोनि खावे जीवमात्र । न म्हणे ब्राह्मण क्षत्रिय शुद्र ।
ऐसा राक्षस मी अपवित्र । दुःखे दुर्धर अति दुःखी ॥७६॥
तरी शापभाग्यास्तव जाण । तुम्ही आलेती दोघे जण ।
तरी हे नव्हे सीतागवेषण । माझे उद्धरण करु आलां ॥७७॥
करिता माझे बाहुच्छेदन । छेदिला माझा देहाभिमान ।
घाये केले सावधान । सुखसंपन्न श्रीरामा ॥७८॥
तुम्ही दोघे पूर्ण पुरुष । सत्वनिष्ठ सद्विवेक ।
तुमचे चरण सुखदायक । सदा सात्विक तुमचेनि ॥७९॥
ऐसे तुम्ही धीर वीर । सत्स्वरुप महाशूर ।
तुम्ही निजधर्माचे माहेर । चिदचिन्मात्र तुम्ही दोघे ॥८०॥
तुम्हांसी देखतांचि दृष्टी । निमाल्या अविद्या पापें कोटी ।
सुखस्वरुपीं झाली भेटी । कृपाळु सृष्टी श्रीराम ॥८१॥
तुम्ही दोघे अलौकिक । तुमच्या चरणा लोळंगतां देख ।
दुःख छेदोनि दिधले सुख । परम पुरुष तुम्ही दोघे ॥८२॥
पापकारी अति निंदित । राक्षययोनीं अधःपात ।
त्या मज केले निर्मुक्त । ब्रह्मभूत तुम्ही दोघे ॥८३॥
कबंधाच्या विनंतीवरुन त्याचे दहन केले :
ऐसे बोलोनि आपण । कबंध घाली लोटांगण ।
माझे केलिया देहदहन । सांगेन संपूर्ण सीताशुद्धि ॥८४॥
सीताशुद्धि मी सांगेन । हे ऐकोनि श्रीरामवचन ।
त्यासी पुसे स्वये आपण । अति सावधान शुद्ध्यार्थी ॥८५॥
स त्वं सीता समाचक्ष्व येन वा यत्र वाहृताः ।
कुरु कल्याणमत्यर्थं यदि जानासि सत्वतः ॥२४॥
श्रीराम पुसे कबंधासी । सीताशुद्धि सांगेन म्हणसी ।
कोणी नेली कोने स्थळासी । कोने देशी ते सांगे ॥९६॥
बुद्धि करोनि सावधान । स्वस्थ करोनि निजमन ।
सीतेचे केउते गमन । स्थान मान मज सांगे ॥९७॥
एवमुक्तस्तु रामेण वाक्यं दनुरनुत्तमम् ।
इदं जगाद वचनं लक्ष्मणस्य च पश्यतः ॥२५॥
रावनेन हृता सीता रामपत्नी यशस्विनी ।
नाममात्रं तु जानामि न रुपं तस्य रक्षसः ॥२६॥
निवासंवा प्रभावंवा वयं तस्य न विद्महे ।
दिव्यमस्ति नमे ज्ञानं नाभिजानामि मैथिलीम् ॥२७॥
सीतेला रावणाने नेली हे कबंधाने रामांना सांगितले :
ऐसे ऐकोनि श्रीरामवचन । कबंध सागें आपण ।
ऐसे मज आहे ज्ञान । ते सावधान अवधारी ॥८८॥
मग लक्ष्मणासी उभे करोनी । कबंध सांगे गर्जोनी ।
श्रीरामाची धर्मपत्नी । गेला घेवोनी रावण ॥८९॥
त्याचे नांव म्या ऐकिलें कानी । परी तो देखिला नाही नयनी ।
अते केउता गेला गगनी । कोणे स्थानी मी नेणे ॥९०॥
त्याचा आवास ना निवास । कोने ठायी रहिवास ।
जनवास की वनवास । ते मी निःशेष जाणे ना ॥९१॥
विज्ञानं तु परिभ्रष्टं शापदोषेण राघव ।
स्वकृतेन मया प्राप्तं रुपं लोकविगर्हितम् ॥२८॥
कि तु यावन्न यात्यस्तंस्विता श्रांतवाहनः ।
तावन्मामवटे कृत्वा दह राम यथाविधे ॥२९॥
श्रीरामा माझे शुद्ध ज्ञान । ब्रह्मशापे जाले विच्छिन्न ।
न करिता राक्षसदेहाचे दहन । माझे मज ज्ञान प्रकटेना ॥९२॥
आच्छादावया निजज्ञान । श्रीरामा मुख्य देहबंधन ।
देहाभिमान केलिया दहन । ज्ञानविज्ञान प्रांजळ ॥९३॥
यालागी राक्षसीदेहदहन । दीर्घ गर्तेत खाणून ।
त्यामाजी शुष्क काष्ठे घालून । करावे दहन सौमित्रे ॥९४॥
अंतकाळ करी जो मित्र । तयाचे नाम गा सुमित्र ।
मी तंव तुमचे कृपापात्र । श्रीरामचंद्र कृपाळु ॥९५॥
लक्ष्मणा ऐके सावधान । या देहा नाही प्रेतपण ।
श्रीरामहस्तें अति पावन । कृपेनें दहन करी स्वामी ॥९६॥
केलिया राक्षसदेहदहन । सीताप्राप्तीचे विधान ।
मी यथार्थ सांगेन । सत्यवचन श्रीरामा ॥९७॥
ऐकोनि कबंधाचें वचन । संतोषला रघुनंदन ।
पाचारोनि लक्ष्मण । देहदहन करविलें ॥९८॥
चितामादीपयामास सा प्रजज्वाल सर्वतः ।
तच्छीरीरं कबंधस्य घृतपिण्डोपमं महत् ॥३०॥
स विधूय चितामाशु विधूमोऽगिरिवोत्थिततः ।
अरजे वससी विभ्रन्माल्यं दिव्यं महबलः ॥३१॥
उत्पपाताशु संहृष्टः सर्वप्रत्यंगभूषणः ।
विमाने भास्वरें निष्ठन्हंसयुक्ते यशस्करे ॥३२॥
कबंधाचें देहदहन । चितेमाजी करता जाण ।
तो निद्य देह त्यागून । जाला आपण दिव्यदेही ॥९९॥
दिव्यांबरपरिधान । अनर्घ्य भूषणे दिव्य चंदन ।
मांदार पारिजात सनातन । माळा परिधान मघमघित ॥१००॥
त्यजितां राक्षसदेहासी । दनुदानव उल्लासेंसी ।
श्रीरामा तुझी कृपा ऐसी । निमेषार्धेंसीं सुखी केले ॥१॥
तुझे देखिलिया श्रीचरण । चरणा शरण सायुज्य ॥२॥
त्यांत तुझे सांग संदर्शन । मज घडले संपूर्ण ।
म्हणोनि घालिता लोटांगण । आले विमान हंसयुक्त ॥३॥
धन्य द्विजाचा निजशाप । शापे केला निष्पाप ।
श्रीराम भेटला चित्स्वश्रूप । सुखरुप मी जालो ॥४॥
सुखरुप चराचर । सुखें भरले सागर ।
कबंधासी उत्साह थोर । श्रीरामचंद्र संतुष्टला ॥५॥
कबंध अति उल्लासोनि । बैसला हंसयुक्त विमानी ।
सीताप्राप्तीचे विधानीं । स्वये गर्जोनि सांगत ॥६॥
सोऽन्तरिक्षगतो वाक्यं कबन्धो राममब्रवीत् ।
शृणु राघव तत्वेन यथा सीतामवाप्स्यसि ॥३३॥
श्रूयतां राम वक्ष्यामि सुग्रिवो नाम वानरः ।
भ्रात्रा निरसतः क्रुद्धेन वालिना शक्रसूनुना ॥३४॥
दहन झाल्यावर विमानात बसून कबंध श्रीरामांना सुग्रीवाशी सख्य करण्यास सांगतोः
कबंध बैसोनि विमानी । श्रीरामा सांगे कळवळोनी ।
सीताशुद्धीचे विधानीं । सावधानीं अवधारी ॥७॥
ऐक श्रीरामा सत्योत्तर । सीता भेटावया अति सत्वर ।
सुग्रीवासी करी मित्र । वानर वीर महाबळीं ॥८॥
पालेखाइरे वानर । केवळ नव्हती वनचर ।
किंष्किंधेचा राज्यधर । सैन्य अपार जयाचे ॥९॥
सुग्रीवाचे चवघे प्रधान । राजनीतीं अति संपन्न ।
चहू पुरुषार्थी अति सज्ञान बळवाहन वळिष्ठ ॥११०॥
दोघांचे दुःख एकच असल्याने उभयता मैत्रीस योग्य :
समानशीळ योग्य मैत्री । येरयेरा नित्यसाहाकारी ।
तुम्हा दोघा समान सरी । तेही अवधारी श्रीरामा ॥११॥
तुझी भार्या रावणे हरण । सुग्रीवभार्या वाळिग्रहण ।
दोघांची अवस्था समसमान । दोघे दीन स्त्रीविरहें ॥१२॥
तुज राज्यत्यागे प्राप्त वन । त्यासी राज्यत्यागें ऋष्यमूळ स्थान ।
दोघाचें दुःख समसमान । अति दीन स्थिति गति ॥१३॥
तुम्ही नरपति सुग्रीव वीर । आणि वानरपति सुग्रीव वीर ।
त्यासी करावा अगत्य मित्राचार । सीतासुंदरीप्राप्तर्थीं ॥१४॥
हे तंव मानले श्रीरामा वचन । केउते सुग्रीवाचे स्थान ।
कोणे मार्गे करावे गमन । श्रीरघुनंदन पुसतसे ॥१५॥
स वानरवरः पंपामटतीव सुशंकितः ।
अभिषिक्तो बलौ कर्तुं कार्य ते हरिपुंगवः ॥३५॥
वानरेंद्रो महावीर्यस्तेजोवानमितप्रभः ।
दिशो विचेतुं तां सीतां त्वद्वियोगेन शोचतीम् ॥३६॥
भास्करस्यौरसः पुत्रो वालिना कृतकिल्बिषः ।
सन्निधायायुधं क्षिप्रमृष्यमूकालयं कपिम् ॥३७॥
पंपासरोवरावर सुग्रीवाची भेट व मैत्री होईल :
कबंध सागें श्रीरामाप्रती । येणेंचि मार्गे श्रीरघुपती ।
पंपासरोवराची ख्याती । अति विश्रांति तापसा ॥१६॥
देखिलिया पंपेचें दर्शन । दुःखी होती सुखसंपन्न ।
ते त्या वानराचें स्थान । स्वानंदे पूर्ण क्रीडती ॥१७॥
वालीचा वध झाल्यावर मैत्री होऊन सीतेचा शोध लागेल :
तुज सुग्रीवा जालिया भेट । दोहींच्या दुःखा होईल तुटीं ।
मेळवोनि वानरकोटी । सीता गोरटी शोधील ॥१८॥
वानर धाडोनी महाबळीं । त्रैलोक्य़ीं घेतील घरधांडोळी ।
ठायी घालोनि जनकबाळी । वानर तत्काळी येतील ॥१९॥
सीताविरहे तू आपण । गिंवसिसी गिरिकंदरें वन ।
तिची शुद्धि वानरगण । न लागता क्षण आणिती ॥१२०॥
स्त्रीविषयींचे सुबद्ध । वालिसुग्रीवां महाद्वंद्व ।
सहा सहा मासां करिती युद्ध । वीरां उन्माद वाटिव ॥२१॥
तुझेनि हातें वालिमरण । हे मज आहे ज्ञान पूर्ण ।
शीघ्र जावोनि आपण । वालिनिर्दळण करावे ॥२२॥
त्या दोघांच्या युद्धसंधीसीं । ठाकोनि जावे त्वरेंसीं ।
रणी निर्दाळावया वालीसीं । सुख सुग्रीवासी स्वानंदे ॥२३॥
जे वालीचें निर्दळण । तेंचि सुग्रीवा मित्रत्व पूर्ण ।
तेणे तू पावशील कल्याण । सत्य वचन श्रीरामा ॥२४॥
बंधुबंधुंमाजी वैर । पडावया मुख्य स्त्री साचार ।
स्त्रीसंग मुख्य दुर्धर । दुःखी नर स्त्रीसंगें ॥१५॥
सुग्रीव मित्राचें महिमान । पावसील सीतारत्न ।
किर्ति प्रकटेल अति पावन सत्य्वचन श्रीरामा ॥२६॥
ऐसे कबंधे सांगोनी । स्वये श्रीरामासी वंदोनी ।
आल्हादे विमानी बैसोनी । उर्ध्वगमनीं तो गेला ॥२७॥
एकाजनार्दना शरण । जाले कबंधोद्धरण ।
पुढे श्रीरामलक्ष्मण । पंपाप्रयाण स्वये करिती ॥२८॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
कबंधोद्धरणं नाम द्वाविंशतिमोऽध्यायः ॥२२॥
॥ ओव्या १२८ ॥ श्लोक ३७ ॥ एवं १६५ ॥
