मन विरक्त विषयी सर्व
171.
मन विरक्त विषयी सर्वदा ।
इंद्रिये गोविंदा समर्पिली ॥१॥
तेचि प्रायश्चित्त घेतले अंतरी ।
सबाह्याभ्यंतरी एकनिष्ठे ॥२॥
मंत्रज्ञान सदा श्रीरामचिंतन ।
सद्गुरूभजन सर्वकाळ ॥३॥
दश दाने दशकु परेसी समर्पू ।
गोदाने संकल्पू वासनेचा ॥४॥
पंचगव्य तेचि जण अर्ध-मात्रा ।
सोऽहं हे सशब्दा प्राशियेले ॥५॥
ज्ञानगंगे स्नान मनाचे वपन ।
वृत्ति ह्या निमग्न ब्रह्मरूपी ॥६॥
हेचि जण प्रायश्चित्त सदा सर्वकाळ ।
मन हे अढळ निश्चयाचे ॥७॥
बहेणि म्हणे ऐसे केले प्रायश्चित्त ।
शास्त्राचा संकेत शास्त्र जाणे ॥८॥
