का रे प्रेमे (पुंड्य
2995.
का रे प्रेमे (पुंड्या) मातलासी । उभे केले विठ्ठलासी ॥१॥
ऐसा कैसा रे तू धीट । मागे भिरकाविली वीट ॥धृपद॥
युगे झाली अठ्ठावीस । अजुनी न म्हणसी बैस ॥२॥
भाव देखोनि निकट । देवे सोडिले वैकुंठ ॥३॥
तुका म्हणे पुंडलिका । तूचि भक्त बळिया निका ॥४॥
अर्थ :
हे पुंडलिका अरे तू भक्तीप्रेमाच्या जोरावर एवढा कसा माजला आहेस आणि त्याच्या जोरावर तू विठ्ठलाला उभे का केले आहेस ? अरे पुंडलिका तू एवढा उध्दट कसा आहेस रे प्रत्यक्ष विठ्ठल तुला भेटण्यास आले तर तू त्यांच्यापुढे वीट भिरकावली व त्यावर त्यांना रात्रंदिवस उभे केले. अरे अठ्ठाविस युगे झाली तरी देखील अजूनही तू त्यांना बस असे म्हणत नाहीस. अरे तुझा भक्तीभाव पाहून देवाने वैकुंठ सोडले. तुकाराम महाराज म्हणतात, हे पुंडलिका तूच एक सर्वांमधे खरा आणि बलवान भक्त आहेस.
