वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १०, देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ७९१ ते ८२०

सर्व जीव तू जालासी आ

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074539 · अभंग क्र. ७९२

792.
सर्व जीव तू जालासी आपण तरी निरय आपदा भोगिता हे कवण ।
परमात्मया तुमचे अविनाश स्वरूप तरी येवढे का कष्टसाधन ।
तू अंतरी परब्रह्म सावळे म्हणोनी जगत्रय व्यापिलेंया ध्याने ।
म्हणोनी तुमचा पुत्र जालो स्वामिया जगाधीन का केले माझे जिणे रया ॥१॥
तू बाप म्हणता मी लाजिलो लाजोनी माघारा ठेलो ।
एकीकडे काळ एकीकडे संसार मध्येंची वाटे मी ठेलो ।
ऐसिया संनिधि तुजजवळी येवो पाहे तव तुझीया देवपणा भ्यालो ॥२॥
नादबिंदापासाव शरीर जन्मले असाध्य । करूनी वरी साक्ष देऊनि मदामांसामाजी वाढविले ।
कर्मदेह वेचुनी सत्य सुकृतालागी उपजविले तरी हे दैन्य दारिद्र्य का भोगविले ।
तुझिया बापपणा बोलु लागला तरी मज पुत्रसे वांया म्हणितले रया ॥३॥
आयुष्याची गणना करूनिया प्रमाण वरी मनुष्य देह ऐसे नाम ठेविले ।
ते आयुष्य का स्वामी दो ठायी वाटिले ।
अर्ध रात्रीचे अर्धदिवसाचे निरय सत्त्व वेचिले ।
पैल समर्थाचे बालक रंके गांजिले त्याचे थोरपण ते काय जाले राया ॥४॥
बांधोनी जन्म आम्हांकडे भोगविसी आपणया मायबाप म्हणविसी ।
विश्व प्रसवला या जगासी तरी आधारु आहे ऐसे अनुवादसी ।
जत्र जीव तत्र शिव हे तो नये माझीया मनासी ।
पैल कीटकिये भृंगिये जैसी जाले तैसे का न करिसी आम्हांसी रे ॥५॥
अल्पदोषांसाठी आम्हाते दंडिसी येवढे ।
कैचे मंत्रसाधन जे भक्ति करूनि निरसू तयासी ।
तुज देखता काळ शरीर फाडफाडू भक्षीता हे कणव का सांडिली ऐसी ।
जठर सीणसीणु फुरतील देवा वाया कष्टविसील आम्हांसी रे ॥६॥
दर्पणी पाहता येकचि दिसे तेथे अनुसारिखे काही न दिसे ।
रविबिंब उगवलिया किरणी प्रकाश आस्तु जालियावरी काही न दिसे ।
तैसे गुरूशिष्य संवाद सोहं बोध ऐक्य जाले अभ्यासे ।
याहूनि जाणसी ते करि वेळोवेळा आता सांगो मी ते कैसे रया ॥७॥
यमा जाचिता काही नुरे यालागी मुनी सेविती वनवासु ।
खवणीक खपणीक लुंचनीक वसैत भटभराडे धाके करिती आगम संन्यासु ।
योग साधावया वनवास सेविती करिती पवनअभ्यासु ।
इंद्रिये दंडुन परतोनी भृगस्थान न पवतीच खंडु पानरसु रया ॥८॥
जळींचा तरंगु जळी निमाला तो अनुठाया वेगळा नाही गेला ।
तैसा तुजमाजी दातारा मध्ये का हा प्रपंच वाढविला ।
तू देव आम्ही प्राकृत मनुष्य हा आगमु का गमला ।
मज पाहता हे अवघेचि लटिके जैसे असेल तैसे सांग पा उगला ॥९॥
लवण पाणीयासी की पाणी लवणासी ऐक्य जालियावीण निवडेना गुणासी ।
लोहो लागले परिसी ते उठिले कनकेंसी ।
बापरखुमादेविवरा विठ्ठला परियेसी ।
आजिपासून ये तरी तुझीच आण पुढती न घालीन निघे गर्भवासी रया ॥१०॥

अर्थ :
हे श्रीहरि जर सर्व जीव तुम्हीच झाला आहात तर नरकादि दुःखे कोण भोगतो? हे श्रीहरि, जीवरूप बनलेले तुमचे स्वरूप जर अविनाश आहे तर जीवाला तुमचे प्राप्ती करता येवढे साधनाचे कष्ट का ? हे परब्रहा सांवळ्या श्रीकृष्णा तू सर्वांच्या अंतरात राहून जगत्रय व्यापले आहेस. म्हणून तुमच्या रूपाने मी तुमचा अंश म्हणजे पुत्र झालो असे असता माझे जीवित पराधीन का केले ? यामुळे तू माझा बाप आहेस असे म्हणतांना लाज वाटून मी आपल्या स्वरूपाहून भित्र झालो, त्यामुळे एकीकडे काळ आणि दुसरीकडे संसार या दोन्हीच्या कचाट्यात अटकून पडलो. अशा स्थितीत तुमच्याकडे येण्याची इच्छा करितो. तो तुमचा मोठा देवपणा म्हणजे ऐश्वर्य पाहून भ्यालो. नादबिंदुपासून शरीर जन्मले. त्या शरीरा कडून भगवत्प्राप्ती वेदशास्त्राच्या साक्षीने असाध्य करून मद मांसामध्ये वाढविले. कमनि प्राप्त झालेले शरीर कष्ट सोसून सत्य सुकृत करण्यांकरिता उत्पन्न केले हे खरे पण दैन्य द्रारिद्र त्यांचे कडून का भोगविलें? या कारणाने तुमच्या बापपणाला व माझ्या पुत्रपणालाही दोष लागला नाही काय? आयुष्याची शंभर वर्षाची निश्चित गणना करून हा शंभर वर्षे जगणारा मनुष्य देह आहे असे नांव ठेवले असे असूनही त्या आयुष्यात अर्धरात्र आणि अर्धदिवस अशी वाटणी का केली? व शुद्धसत्त्वरूपी जीवाचा नाश का केलास? दुसरे असे की आपल्या सारख्या समर्थाचे बालक यत्किंचित दीन देहाने गांजून टाकावे. मग तुमचे थोरपण कुणीकडे गेले? आम्हाला देहामध्ये बांधून कष्ट भोगवितोस आणि आमचा मायबाप तू म्हणवितोस. आमचाच काय तर सगळ्या जगाला प्रसवून त्यास सर्व जगाचा आधार आपणच आहो असे सांगतोस ज्या ज्या ठिकाणी जीवत्व आहे. त्या त्या ठिकाणी शिव आहे. म्हणजे परमात्मा आहे. हे माझ्या मनाला पटत नाही. ज्याप्रमाणे किटकी ध्यानाने भुंगरूप होते. त्याप्रमाणे आम्हा जीवाला परमात्मरूप का करून टाकीत नाहीस? एक स्वरूपानुसंधान चुकले तर या दोषाकरिता आम्हास एवढी मोठी शिक्षा करतोस बरे यातून सुटण्याला असे काय मंत्र तंत्र भक्ति हे साधन आहे की त्याचे आराधन करून त्या दोषांचा नाश करून टाकतील. तुझ्या स्वरूपाचा विचार केला तर काय तुझे अविनाश स्वरूप, तुझे आम्ही पुत्र असतांना काळांनी आमची शरीरे तुझ्या समक्ष फाडून खावी तरी तुला आमची दया का येत नाही. वारंवार मातेच्या उदरांत जन्म घेऊन जीवाने दुःख भोगावे असा व्यर्थ शीण आम्हाला का देतोस? ववास्तविक विचार केला तर दर्पणांत आपुले रूप पाहता ते एकच दिसते त्याचे सारखे तेथे दुसरे कोणी नाही म्हणजे दुसरे दिसले तरी त्याला स्वतंत्र सत्ता नाही. सूर्य उगवला म्हणजे त्याची किरणे प्रकाशतात, आणि अस्त झाला म्हणजे ती दिसत नाहीत. त्याप्रमाणे गुरूशिष्याच्या संवादापासून सोहंबोधाच्या अभ्यासाने जीव ब्रह्मैक्य होते अशी स्थिती आहे. याहून काय निराळे तुला ठाऊक असेल ते तू कर वारंवार मी किती सांगावे. यमाच्या तडाक्यांत काही उरत नाही. याकरिता मुनी वनवास सेवन करितात. कोणी फिरतात. कोणी कफनी घालतात. कोणी हाताने केस उपटतात. कोणी भटकत फिरतात कोणी यमाच्या भयाने शास्त्रोक्त संन्यास करितात. योगसिद्धी करिता कोणी वनांत जाऊन प्राणायामाचा अभ्यास करितात. कोणी इंद्रियाचे दंडन करून त्यांना विषयापासून परतवितात. इतके करूनही भृगस्थान म्हणजे परमात्मपद प्राप्त होत नाही. व परमानंदाच्या रसांतही त्याला खंड पडतो म्हणजे त्यांना परमानंद प्राप्त होत नाही. (वास्तविक विचार केला तर अविद्येकडून परमात्म्याच्या ठिकाणी जीवभाव उत्पन्न होतो व विद्येचा उदय झाला परमात्म स्वरूपाच्या ठिकाणीच लय पावतो) जसा जळावर उत्पन्न झालेला तरंग जलाच्याच ठिकाणी लय पावतो. त्याप्रमाणे हे नारायणा, तुझ्या स्वरूपामध्ये तरंगाप्रमाणे आम्ही असून मध्ये हा प्रपंचाचा विस्तार का वाढविलास? म्हणजे तू देव आम्ही मनुष्य असा भेद का विस्तारिलास. मला तर असे वाटते की हे सर्व खोटे आहे. यातील खरा प्रकार काय आहे. ते सांग पाहू. मीठ पाण्यात किंवा पाणी मिठांत पडून ऐक्य झाल्यानंतर त्याचे वेगळे गुण उरत नाहीत. लोखंडाला परिस लागल्याबरोबर त्याचे सुवर्ण होते. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठला, आजपासून मला पुन्हा गर्भवासात घालू नका. व मीही गर्भवास घेणार नाही अशी तुझी शपथ वाहून सांगतो असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग