(भुपाळ्यांवरील अभंग)
3478.
(भुपाळ्यांवरील अभंग)
तुजसवे आम्ही अनुसरलो अबळा । नको अंगी कळा राहो हरी हीन देऊ ॥१॥
सासुरवासा भीतो जीव ओढे तुजिपाशी । आता दोहींविशी लज्जा राखे आमुची ॥धृपद॥
न कळता संग झाला सहज खेळता । प्रवर्तली चिंता मागिलांचियावरी ॥२॥
तुका म्हणे असता जसै तसै बरवे । वचन या भावे वेचूनिया विनटलो ॥३॥
अर्थ :
एका गोपी स्त्रीचे वर्णन महाराज येथे करतात ती गोपीका म्हणते हे हरी आम्ही तुझ्यावर अनुसरलो आहोत आम्ही अबला आहोत त्यामुळे तू आमच्या अंगी हीन दीन कळा येऊ देऊ नको. हे हरी सासुरवासाला आमचा जीव तर फार भितो परंतू आमचा जीव तुझ्याकडेही ओढ घेतोय त्यामुळे परमार्थामध्ये आणि संसारामध्ये तूच आमची लज्जा रक्षण कर. हे हरी नकळता अगदी सहजच खेळता खेळता तुझ्याशी आमचा संग झाला परंतू आता आम्हाला संसारातील आमचा मागच्या मंडळींचीही चिंता लागली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता ज्या स्थितीत आम्ही चांगले राहू त्याच स्थितीत आम्ही राहू म्हणजे आमचे हित ज्या वागण्याने होईल तसेच आम्ही आम्ही वागू आणि तेच शब्द लक्षात ठेवून आम्ही तुमच्या प्रेमात पडलो आहोत.
