मागुता हाचि जन्म पाव
4051.
मागुता हाचि जन्म पावसी । भोगिले सुख दुःख जाणसी । हे तो न घडे रे सायासी । का रे अंध होसी जाणोनिया ॥१॥
लक्ष चौर्यांशी न चुके फेरा । गर्भवासी यातना थोरा । येउनि पडसी संदेहपुरा । वोळसा थोर मायाजाळी ॥२॥
पशु काय पापपुण्य जाणती । उत्तम मध्यम भोग भोगिती । काही एक उपजता मरती । बहिरी अंध होती पागुळ मुकी ॥३॥
नरदेह निधान लागले हाती । उत्तम सार उत्तम गती । देवचि होइन म्हणती ते होती । तरि का चित्ती न धरावे ॥४॥
क्षण एक मन स्थिर करूनी । सावध होई डोळे उघडोनी । पाहे वेद बोलिले पुराणी । तुका विनवणी करीतसे ॥५॥
अर्थ :
अरे मनुष्या तुला वाटत असेल की पुढचा जन्म तुला पुन्हा मनुष्याचाच प्राप्त होईल आणि या जन्मी जसे सुख भोगले तसेच पुढेही भोगशील अशी जर तुझी समजूत असेल तर, कितीही प्रयत्न केले तरी तसे घडणार नाही सर्व काही माहित असून देखील अंध का होत आहेस ? चौ-याऐंशी लक्ष योनीचा फेरा कधीही चूकत नाही तेथे मोठया गर्भवासाच्या यातना भोगाव्या लागतात. मग तू पुन्हा जन्म घेऊन संशयाच्या पुरामध्ये पडशील आणि मायाजाळरुपी मोठया भोव-यात तू पुन्हा सापडशील. पशूंना पाप आणि पुण्य काय माहिती, उत्तम मध्यम हे भोग त्यांना भोगता येतात काय ? काही तर जन्म झाल्या झाल्याच मरतात आणि काही तर बहिरे अंध पागळे मुके होतात. नरदेहासारखे उत्तम निदान हाती लागले आहे ते उत्तम सार आणि उत्तम गती देणारे आहे. जर एखादयाने खर्या श्रध्दापूर्वक भक्तिभावाने म्हटले की मी देव होईल तर तो खरोखर देवाच्या पदवीला प्राप्त होतो, असे आहे तर मग चित्तामध्ये हरीला का न धारण करावे ? तुकाराम महाराज म्हणतात, अरे मनुष्या तू एक
