कान्होबा निवडी आपुली
292.
कान्होबा निवडी आपुली गोधने ॥धृ.॥पाच पाच पोळ्या तीन भाकरी | दीड कानवला एक पुरी |
आम्हा धाडिले वइल्या दुरी | आमची ठकवून खाल्ली शिदोरी ॥ कान्होबा.१॥
परियेसी शारंगधरा | तुझा बैल चुकला मोरा |सांगू गेलो तुझ्या घरा | पाठी लागला तुझा म्हातारा ॥ कान्होबा.२॥
परियेसी हृषीकेशी | गाईम्हशीचे दूध पिशी |वासरे प्याली म्हणून सांगशी | उद्या ताक नाही आम्हासी ॥ कान्होबा.३॥
कान्होबा ओढाळ तुझ्या गाई| होत्या नव्हत्या कळंबा ठायी|शिव्या देती तुझी आई ॥ कान्होबा.४॥
विष्णुदास नामा साहे | देवा तूचि बाप माये |अखंड माझे हृदयी राहे ॥ कान्होबा.५॥
