विश्वामित्र द्विजचिन
301.
विश्वामित्र द्विजचिन्ह । स्वप्नी प्रगटे आपण ॥1॥
देखोनिया द्विजवराते । नमियेले जोडुनी हाते ॥2॥
राव बोले उदारपणी । काय इच्छा आहे मनी ॥3॥
दयावंत धर्ममूर्ती । तुझी तिही लोकी कीर्ती ॥4॥
अंकुश कडिया लेखणी । राया वोपी माझ्या पाणी ॥5॥
उदारपणे देसी जरी । उदक घाली माझे करी ॥6॥
कृपा करुनी आम्हावरी । आले पाहिजे नगरी ॥7॥
येथे संकल्पावाचून । नाही होत माझे येण ॥8॥
राये घेऊन जीवन । ऋषिहस्तकी घालून ॥9॥
एक नवल देखे दृष्टी । काळपुरुष उभा पाठी ॥10॥
लोहदंड घेउनी करी । घालु पाहे त्याचे शिरी ॥11॥
तेणे झाला भयाभीत । राव स्वप्नात बरळत ॥12॥
राव बैसला उठोन । करी देवाचे स्मरण ॥13॥
तारामती पुसे राया । कांहो बरळलां स्वामिया ॥14॥
राज्यदान सुकृतकोटी । एक काळपुरुष पाठी ॥15॥
लोहदंड घेऊन करी । घालू पाहे माझे शिरी ॥16॥
येरु म्हणे या जीवनी । करा स्नानाते जाउनी ॥17॥
अग्निमुखी द्यावे दान । स्वप्नदोष नासती जाण ॥18॥
म्हणे प्रधान महाराजा । दान करा काही द्विजा ॥19॥
ऐसे बोलता वचन । आला विश्वामित्र जाण ॥20॥
राजा बोले कर जोडून । शयनी देखियेले स्वप्न ॥21॥
ह्याच स्वरुपा प्रमाण । ऐसा देखिला ब्राम्हण ॥22॥
सिंहासन समेदिनी । राया देगा मजलागोनी ॥23॥
आता मागे दक्षणेसी । म्हणे नामयाची दासी ॥24॥
