हरीजना प्राण विकली ह
3203.
हरीजना प्राण विकली हे काया । अंकिला मी तया घरी झालो ॥१॥
म्हणिये सत्वर करीन सांगता । घेईन मी देता शेष त्यांचे ॥धृपद॥
आस करूनिया राहेन अंगणी । उच्छीष्ठाची धणी घ्यावयासी ॥२॥
चालता ते मार्गी चरणीचे रज । उडती सहज घेईन आता ॥३॥
दुरि त्यांपासूनि न वजे दवडिता । तुका म्हणे लाता घेईन अंगे ॥४॥
अर्थ :
जेवढे काही हरीजन भक्त आहेत मी त्यांना माझे प्राण व शरीर विकले आहे व त्यांच्या घरी मी त्यांचा अंकीत दास म्हणून झालो आहे. हरीजन मला जे काही काम सांगतील जी काही आज्ञा देतील ती मी तत्परतेने पूर्ण करीन आणि त्यांचे उच्चिष्ट राहिलेले त्यांनी मला दिले तरच मी ते घेईन. त्यांचे उच्चिष्ट मला तृप्ती होईपर्यंत सेवन करण्यास मिळो अशी अपेक्षा धरुन मी त्यांच्या अंगणात राहीन. ते हरीजन जेथे कोठे ज्या मार्गाने चालत असतील त्या मार्गाने मी त्यांच्या मागेच चालेन कारण त्यांच्या चरणाचे रज उडतील व ते मी अगदी सहजरित्या माझ्या अंगावर सुखाने घेईन. तुकाराम महाराज म्हणतात, जरी हरीजनांनी मला लाथा मारुन दूर त्यांच्यापासून लावले तरी देखील मी त्यांच्यापासून दूर जाणार नाही त्यांच्या लाथा देखील माझ्या अंगावर मी सुखाने घेईन.
