आइत्या भाग्या धणी व्
3292.
आइत्या भाग्या धणी व्हावे । केणे घ्यावे न सरे ते ॥१॥
केणे आहे पंढरपुरी । उधारीचे लाभीक ॥धृपद॥
बाखराची करुनी रिती । भरा पोती सकळ ॥२॥
तुका म्हणे संतांपाडे । करा पुढे वाखती ॥३॥
अर्थ :
आयत्या भाग्याचा मालक व्हावे आणि जे धन कधीही न संपणारे आहे ते आपल्या पदरात घ्यावे. असे धन पंढरीमध्ये आहे ते उधार जरी घेतले तरी लाभच होईल. आपले देहरुपी पोते विविध विकारांनी भरले आहे ते मोकळे करा आणि भक्तीरुपी परमार्थाचा माल तुम्ही त्यात भरा. तुकाराम महाराज म्हणतात, पूर्वी संतांनी देखील पंढरीला जाऊन आपल्या देहरुपी पोत्यामध्ये भक्तीरुपी माल भरला आहे तुम्ही देखील त्यांच्यासारखे पंढरपूरला जा आणि आपल्या देहरुपी पोत्यामध्ये भक्तीरुपी माल भरुन घ्यावे.
