सिंदळीचे चित्त परपुर
3293.
सिंदळीचे चित्त परपुरुषावारी । पति चुरमुरी रात्रंदिवस ॥१॥
ऐसे ते वोंगळी जाय हो नरका । तिच्या दोषे देखा पती जाय ॥धृपद॥
आपण बुडती पती बुडविती । दोन्ही कुळे नेती अधःपाता ॥२॥
तुका म्हणे तिची न करावी संगती । होईल फजिती मागे पुढे ॥३॥
अर्थ :
व्याभिचारी स्त्रीचे चित्त नेहमी परपुरुषावर असते व या कारणामुळेच तिचा पती रात्रंदिवस स्वत:च्या मनाशी चुरचुर करत असतो. अशी ती ओंगळ स्त्री स्वत: तर नरकाला जाते परंतू तिचे दोष पाहून पाहून तिचा पती देखील नरकाला जातो. अशी व्याभिचारीणी स्त्री स्वत: बुडते पण पतीला घेऊन देखील बुडते आणि माहेर आणि सासर या दोन्ही कुळाला अध:पतनाला नेते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा व्याभिचारीणी स्त्रीची संगती नवऱ्याने करु नये कारण तिची संगती केली तर त्याची मागेपुढे फजितीच होईल.
