मग सांगे गुह्य गोष्ट
142.
मग सांगे गुह्य गोष्टी ।
मामा पाचारितो भेटी ।
इतुकेचि ऐकोनिया पोटी ।
कृष्णा आनंद न समाय ॥१॥
मग म्हणे बळिरामासी ।
जाऊ मामाचिये भेटीसी ।
कृप करुनिया अक्रूरासी ।
मूळ आम्हासी पाठविला ॥२॥
म्हणती बळिरामही चलावे ।
वोरसे मामासी भेटोनी यावे ।
आपणंसिही जिवे भावे ।
आर्त तयाचे अखंड ॥३॥
घेऊनि पांचशे गोवळ ।
समागमे आपुले दळ ।
निघते झाले उतावेळ ।
आले घरासी पुसावया ॥४॥
मग नंदयशोदेप्रती ।
उभयताहि नमस्कार करिती ।
मामासी भेटी जाऊ म्हणती ।
दयावी आज्ञा आशिर्वादे ॥५॥
ते म्हणती कंस व्देषी ।
महादृष्ट पापराशी ।
देखताचि घेरतील रे दोघासी ।
सर्वथा तेथे न जावे ॥६॥
निळा म्हणे ऐकोनि हरि ।
म्हणे न चिंतावे हे अंतरी ।
आम्हासी आप्त या संसारी ।
कोण मामाहुनी जिवलग ॥७॥
