लटिके दोष जरी संतांस
398.
लटिके दोष जरी संतांसी आरोपी ।
जाणावा तो पापी कुष्टी होय ॥१॥
तयाचिया कुष्टा नाहीच निवृत्ति ।
चंद्र-सूर्य फिरती जोवरी पाहे ॥२॥
नसतीचि संतांची छळना जो करी ।
जाणावा तो वैरी श्रीहरीचा ॥३॥
देखवेना डोळा उत्कृष्ट हे पाहे ।
रचितो उपाय नानापरी ॥४॥
निंदा वाद भेद वाढवी मत्सर ।
सदा करकर संतांसवे ॥५॥
बहेणि म्हणे ऐसे अभक्तांचे गुण ।
सहजचि जाण उमटती ॥६॥
