ऐसे वासुनी मुख अमूप
63.
ऐसे वासुनी मुख अमूप ।
अघासुर पसरलासे सर्प ।
गाई गोवळे आपोआप ।
जाती वदनामाजी त्याच्या ॥१॥
पुढे चालता मार्ग न दिसे ।
अंध:कारी पडिले ऐसे ।
मागे फिरावे तव तो श्वासे ।
ओढूनि नेतसे पैलीकडे ॥२॥
मग म्हणती येर येरासी ।
प्रात:काळींचि झाली निशी ।
गडदे पडिले न दिसे शशी ।
ग्रह तारांगणे ना भानु ॥३॥
पडिलो दरकुटिमाझारी ।
किंवा धुई दाटली भारी ।
अथवा मेहुडे आले वरी ।
कांवांहिंचि न दिसे न तर्क ॥४॥
जाभाडी मेळविंता आघासुर ।
परि मागे राहिला सारंगधर ।
म्हणोनिया तो झाला स्थिर ।
तयाहि सगट गिळावया ॥५॥
तव दिवस घटिका चारी ।
आला चढोनिया वरी ।
गाई गोवळे भिन्न अंधारी ।
पडिली अघासुरा पोटी ॥६॥
निळा म्हणे यावरी आता ।
जागृत झालिया कृष्णनाथा ।
पुढे कैशी वर्तली कथा ।
ते परिसावी सात्विकी ॥७॥
