॥ श्रीएकनाथमहाराजकृत
12.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय बारावा ॥
सीतेला श्रीरामांचे दर्शन
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
रामलक्ष्मणांना शरबंदी पडलेले पाहून इंद्रजिताची वल्गना :
शरबंधनी बांधोनि रघुनाथ । इंद्रजित अतिशये श्लाघत ।
तेचि अर्थींचा श्लोकार्थ । स्वये वदत ते ऐका ॥१॥
इन्द्रजित्वात्मनः कर्म तौ शयानौ निरिक्ष्य च ।
उवाच परमप्रीतो हर्षयन्सर्वनैर्ऋतान् ॥१॥
दूषणस्य च हन्तारौ खारस्य च महाबलौ ।
सादितौ मामकैर्बाणैर्भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥२॥
नैतौ मोक्षयितुं शक्यो चैतस्मादिषुबन्धानात् ।
सर्वैरपि समागम्य सर्पसंघैः सुरासुरैः ॥३॥
यत्कृते चिन्तयानस्य शोकार्तस्य पितुर्मम ।
अयं मूलमनर्थस्य सर्वेषा निहतो मया ॥४॥
शरबंधीं राम लक्ष्मण । दिर्घशयन अचेतन ।
पडिले देखोनि दोघे जण । इंद्रजिते आपण वाल्गिजे ॥२॥
जिही मारिले खर दुषण । त्रिशिर्याचा घेतला प्राण ।
चौदा सहस्र राक्षसगण । विंधोनि बाण निवटिले ॥३॥
एकला श्रीराम पदाती । तेणे एवढी केली ख्याती ।
हे ऐकोनि लंकापती । अहोरातीं चळीं कांपे ॥४॥
श्रीरामाच्या प्रतापाभेण । सदा वोसणावे रावण ।
ते दोघे राम लक्ष्मण । शरबंधीं पूर्ण म्या पाडिले ॥५॥
अठ्ठ्यांशी सहस्र ऋषिगण । शिव शक्र चतुरानन ।
मिळाल्या सुरासुर पूर्ण । शरबंधन सोडवेना ॥६॥
माझ्या शरबंधापासून । सोडवूं शके येथे कोण ।
शरबधीं राम लक्ष्मण । दोघे जण संपूर्ण मारिले ॥७॥
इंद्रजित वीर जगजेठी । शरबंधाचे परिपाटी ।
वानरवीर कोट्यनुकोटी । रणपरिपाटीं पाडिले ॥८॥
ज्यासी धाके लंकानाथ । ज्याचेनि लंकेसी आकांत ।
तो म्या मारिला रघुनाथ । वानरेंसहित सौमित्र ॥९॥
राक्षसवैराचें दृढ मूळ । राम लक्ष्मण वीर प्रबळ ।
प्राणांत भेदोनि शरजाळ । केले निर्मूळ वैराचें ॥१०॥
राहिली रणाची आटाआटी । सरल्या युद्धाचिया गोष्टी ।
राम लक्ष्मण वीर जगजेठी । शरसंकटीं पाडिलें ॥११॥
विजयघोषयुक्त इंद्रजिताचा लंकेत प्रवेश :
वानरस्मुदायसमवेत । रणी जिकिला रघुनाथ ।
रणी विजयी इंद्रजित । निघे नगरांत आल्हादे ॥१२॥
निजविजयाच्या भेरी । निशाणे त्राहटिल्या मोहरी ।
वीर गर्जती जयजयकारीं । प्रवेश नगरी आल्हादे ॥१३॥
निजविजयाच्या गजरीं । शृंगारिली लंकापुरी ।
गुढिया मखरे घरोघरी । डोलती अंबरीं पताका ॥१४॥
सडे चौक रंगमाळा । अति आल्हाद राक्षसकळा ।
इंद्रजित जेत्याचा सोहळा । पहावया डोळा आल्हाद ॥१५॥
स इन्द्रजिन्महामायः सर्वसैन्यसमन्वितः ।
प्रविवेश पुरी लंकां जीमूतमिव भास्करः ॥५॥
तत्र रावणमासीनमभिवाद्य कृतांजलिः ।
आचचक्षे प्रियं पित्रे निहतौ रामलक्ष्मणौ ॥६॥
उत्पपात ततो हृष्टः पुत्रं च परिषस्वजे ।
रावणो रक्षसां मध्ये श्रुत्वा शत्रू निपातितौ ॥७॥
मूर्घ्नि चैनमुपाजिघ्रन्पप्रच्छ प्रीतमानसः ।
प्रहसंस्तु ततस्तस्मै पित्रे वृत्तं न्यवेदयत् ॥८॥
सहर्षवेगानुगतांतरात्मा श्रुत्वा गिरस्तस्य महारथस्य ।
जहौ ज्वरं दाशरथेः समुत्थं प्रहष्टवाचाभिननंद पुत्रम् ॥९॥
महाकपटी इंद्रजित । सकळसैन्यासमवेत ।
स्वये प्रवेशे लंकेआंत । जेंवी भास्वत महाअभ्रीं ॥१६॥
विजयवाद्यांच्या गजरीं । छत्रे पल्लवछत्रें शिरी ।
विजयमान युग्मचामरीं । लंकापुरीं प्रवेशे ॥१७॥
सिंहासनी दशानन । त्यासी करोनि अभिवंदन ।
सखे बंधु सुहृज्ञन । प्रिय प्रधान आलिंगी ॥१८॥
इंद्रजिताचे हर्षयुक्त स्वागत :
सभे समस्तांदेखतां । बैसवोनि लंकानाथा ।
विजयसंग्रामाची कथा । होय सांगता इंद्रजित ॥१९॥
करोनि शरबंधविंदान । प्रथम पाडिला रघुनंदन ।
सवेंचि पाडिला लक्ष्मण । वानरगण एक एक ॥२०॥
अंगद सुग्रीव जांबवंत । रणी पाडिला हनुमंत ।
वानरवीर अति समर्थ । मारिले समस्त शरबंधें ॥२१॥
ऐकोनि इंद्रजिताचे वचन । गर्जे रावण आल्हादोन ।
हरिखें करोनि उत्प्लवन । दे आलिंगन पुत्रातें ॥२२॥
वीस भुजीं आलिंगितां । धणी न पुरे लंकानाथा ।
पुनःपुन्हां मुख चुंबितां ।अवग्राही माथा आल्हादे ॥२३॥
अनर्घ्य रत्नांचा अभिषेक । निजपुत्रासी करी दशमुख ।
रणी विजयाचा हरिख । परम सुख लंकेशा ॥२४॥
श्रीरामयुद्धाच्या आधी । रावणा होती क्षयव्याधी ।
इंद्रजिताने ती त्रिशुद्धी । आधिव्याधी छेदिली ॥२५॥
रणी मारिले राम लक्ष्मण । ऐकोनि इंद्रजिताचे वचन ।
निसूर जाला रावण । शत्रू संपूर्ण निमाले ॥२६॥
राम लक्ष्मण सहवानरीं । रणी मारलियावरी ।
वैरी मज नाही संसारी । निश्चय करी रावण ॥२७॥
शरबंधी राम सौमित्र । पडिले देखोनि वानरवीर ।
रक्षावया श्रीरामचंद्र । कपिकुंजर पावले ॥२८॥
तस्मिन्प्रविष्टे लंकायां कृतार्थे रावणात्मजे ।
ररक्षुःपरिवार्याथ राघवौ प्लवगर्षभाः ॥१०॥
हनुमानंगदो नीलः सुषेण; कुमुदो नलः ।
गजो गवाक्षः पनसः सानुप्रस्थो महाहरिः ॥११॥
जांबवान्ऋषभः सुंदो रंभः शतबलिः पृथुः ।
व्यूढानीकाश्च यत्ताश्च दुमानादाय सर्वतः ॥१२॥
इंद्रजित विजयगजरा । प्रवेशला लंकापुरा ।
शरबंधीं श्रीरामचंद्रा । रक्षण वानरा अति यत्ने ॥२९॥
शरबंधीं राम सौमित्र । संरक्षणीं वानरवीर ।
पावले पै थोर थोर । परम शूर वाढिवा ॥३०॥
हनुमंत अंगद आणि नीळ । सुषेण कुमुद आणि नळ ।
सानुप्रस्थ वीर प्रबळ । रणकल्लोळ शतबळी ॥३१॥
गज गवाक्ष पनस रंभ । जांबवंत ऋषभ शरभ ।
पृथु वानर स्वये सप्रुभ । सैन्यसमारंभ सज्ज केला ॥३२॥
राम पाडिला शरपंजरीं । भोंवत्या वानरांच्या हारी ।
द्रुमपाणी महवीरीं । सैन्यसंभारीं रक्षण रामा ॥३३॥
राम सौमित्र शरपंजरीं । विकळ देखिले वानरी ।
यालागी मिळोनि महावीरी । शिळशिखरीं सन्नद्ध ॥३४॥
वानरवीर श्रेष्ठ श्रेष्ठ । रामरक्षणीं अति सन्निष्ठ ।
वारया वाहों न शके वाट । व्यूह दुर्घट तिही केला ॥३५॥
रामलक्ष्मणयोर्द्दष्ट्वा शरीरे सायकैश्चिते ।
वानरेंद्रस्य संजातं सुग्रीवस्य महद्भयम् ॥१३॥
तमुवाच परित्रस्तं वानरेंद्रं बिभीषणः ।
सबाष्पवदनं दीनं क्रोधव्याकुललोचनम् ॥१४॥
अलं त्रासेन सुग्रीव बाष्पवेगो निगृह्यताम् ।
एवं प्रायाणि युद्धानि विजयो नास्ति नैष्ठिकः॥१५॥
सभाग्यशेषतास्माकं यदि वीर भविष्यति ।
मोहादेतौ विमुच्येते भ्रातरौ रामलक्ष्मणौ॥१६॥
रामलक्ष्मण निश्चेष्ट पडल्याने सुग्रीवावर परिणाम :
शरबंधी राम सौमित्र । बाणे भेदिली गात्रेंगात्र ।
तिता ठाव नाही तिळमात्र । पडिले वीर निचेष्टित ॥३६॥
ऐसे देखोनि दोघांसी । भय त्रास सुग्रीवासी ।
अश्रू स्रवती लोचनांसी । उकसांबुकसीं स्फुंदत ॥३७॥
शरबंधाच्या बंधनीं । मुख्य धुरा निमाल्या दोनी ।
गुह्य बिभीषणा सांगोनी । तळमळोनी विलपत ॥३८॥
सिद्धि न पवेचि कार्यार्थ । व्यर्थ गेला माझा पुरुषार्थ ।
रणी निमाला श्रीरघुनाथ । विलपत अति दुःखे ॥३९॥
भाक दिधली श्रीरामचरणीं । सीता आणीन बंदीपासोनी ।
राम निमाला शरबंधनीं । श्रीरामऋणीं मी उरलों ॥४०॥
श्रीराम गेला परलोकासी । सवे नेलें लक्ष्मणासी ।
ऋण फेडावें कोणापासीं । अति दुःखेंसीं विलपत ॥४१॥
रणी मारोनि लंकेशासी । सोडवून आणिल्या सीतेसी ।
ते पुसेल श्रीरामासी । मुख तीपासीं काय दावूं ॥४२॥
रडत पडत अति निर्दैव । म्हणाल नपुंसक सुग्रीव ।
राम अंतरला जीवींचा जीव । प्रताप दावूं कोणासी ॥४३॥
माझ्या अंगी अति पुरुषार्थ । क्षणे निर्दाळीन लंकानाथ ।
रणी उपटीन इंद्रजित । तरी रघुनाथ न भेटे ॥४४॥
रणी निमाला श्रीरघुनाथ । ऐसा मानोनि इत्यर्थ ।
श्रीरामदुःखें दुःखाभिभूत । सुग्रीव प्राणांत करु पाहे ॥४५॥
श्रीरामामागें राहणें । ते तंव मज निंद्य जिणें ।
रामविरहें प्राण देणे । या कारणे उद्यत ॥४६॥
त्यासी बिभीषण संबोखित । नाही निमाला रघुनाथ ।
समूळ न घेता वृत्तांत । व्यर्थ प्राणांत का करिसी ॥४७॥
चाल पाहो शरबंधांत । श्रीराम निमाला की जित ।
समूळ घेवोनि इत्यर्थ । मग कार्यार्थ विचारुं ॥४८॥
एवमुक्त्वा ततस्तस्य जलक्लिन्नेन पाणिना ।
सुग्रीवस्य शुभे नेत्रे प्रममार्ज बिभीषणः ॥१७॥
विमृज्य वदनं तस्य कपिराजस्य धीमतः ।
अब्रवीत्कालसंप्राप्तमसंभ्रांतमिदं वचः ॥१८॥
तत्मादुत्सृज्य वैक्लव्यं सर्वकार्यविनाशनम् ।
हितं रामपुरोगाणां सैन्यानामुचिंतय ॥१९॥
अथवा रक्ष्यतां रामौ यावत्संज्ञाविपर्ययः ।
लब्धसंज्ञौ हि काकुत्स्थौ भयं नौ व्यपनेष्यतः ॥२०॥
बिभीषणाचे सुग्रीवास आश्वासन :
सुग्रीवासी संबोखून । जलहस्तें बिभीषण ।
त्याचे नेत्र परिमार्जून । हितवचन अनुवादे ॥४९॥
तू तंव राजा वानरनाथ । तुज देखोनिया रडत पडत ।
इंद्रजित येवोनि त्वरीत । करील घात सर्वांचा ॥५०॥
श्रीरामाच्या हितकार्यार्था । प्रवर्तावें गा तत्वता ।
येवो न द्यावी विकळता । संरक्षिता श्रीरामा ॥५१॥
श्रीराम होईल सावधान । त्रिसत्य सत्य माझे वचन ।
विकल्प न धरावा आपण । ऋषिभाषण वाल्मीकी ॥५२॥
सेना सैनिक प्रधान । मेळवोनि वानरगण ।
श्रीराम रक्षावा आपण । सावधान जंव होय ॥५३॥
श्रीराम-महिमा वर्णन :
सावध जाल्या रघुनाथ । करील रावणाचा घात ।
इंद्रजित-कुंभकर्णासमवेत । रणी प्राणांत राक्षसा ॥५४॥
राक्षसांची जाती व्यक्ती । उरो नेदी रघुपती ।
सकळ भयाची समाप्ती । जाण निश्चिती श्रीरामे ॥५५॥
सुग्रीव आणि बिभीषण । ऐकोनि दोहींचें अनुवादन ।
अंगद झाला हास्यवदन । श्रीराममहिमान अलक्ष्य ॥५६॥
श्रीरामनामाच्या स्मरणी । जन्ममरणां संमूळ पळणी ।
तो राम पडला शरबंधनीं । सत्य मानी तो मूर्ख ॥५७॥
शस्त्रघात लागल्या स्वप्नीं । तेणे जागृती न मरे कोणी ।
तेंवी राक्षसशरबंधनीं । श्रीराम रणी केवी पडे ॥५८॥
राम काळाचा कृतांत । राम जन्ममरणातीत ।
राम परब्रह्म सदोदित । त्यासी रणघात केंवी घडे ॥५९॥
श्रीराम जगाचें जीवन । राम सर्वांगे चैतन्यघन ।
राम शस्त्राचें तिखटपण । त्यासी लागली बाण हे कदा न घडे ॥६०॥
राम अवतारी ब्रह्म पूर्ण । त्यासी नाही जन्ममरण ।
त्याचे अंगी लागोनि बाण । पावला निधन ते मिथ्या ॥६१॥
राम चैतन्यविग्रही । राम देहींच विदेही ।
श्रीरामासी द्वंद्वबाधा नाही । पडिला घायीं ते मिथ्या ॥६२॥
करिता रामनाम स्मरण । मरणासीं ये अलोट मरण ।
त्या श्रीरामा लागोनि बाण । निमाला पूर्ण ते मिथ्या ॥६३॥
शरबंधनी रघुनंदन । चित्स्वरुपें सावधान ।
राम बंधनीं निर्बंधन । हे मुख्य लक्ष्मण रामाचे ॥६४॥
राम शरबंधनी बंधातीत । तरी का पडोन राहिला येथ ।
त्याही अर्थीचा वृत्तांत । सावचित्त अवधारा ॥६५॥
हनुमंत आणि अंगदाचा संवाद :
शिववरदाचे वरद बाण । मिथ्या न करी रघुनंदन ।
स्वये साहोनि शरबंधन । शिववरदान प्रतिपाळी ॥६६॥
ऐसी श्रीरामाची मूळकथा । अंगदी सांगे आल्हादता ।
तेणे उल्हास हनुमंता । सप्रेमता आलिंगी ॥६७॥
परम प्रीती पाठी थापटी । श्रीरामस्वरुपकसवटी ।
अंगदाची गोड गोष्टी । सकळा पोटी आल्हाद ॥६८॥
श्रीरामासी नाही मरणावस्था । श्रीरामी नाही विकळता ।
कोण पाड इंद्रजिता । मज हनुमंता असतांही ॥६९॥
ऐकोनि हनुमंतउत्तर । उल्लासले स्वये वानर ।
अवघे करिती जयजयकार । हर्षे निर्भर सुग्रीव ॥७०॥
येरीकडे स्वये रावण । सीता वश करावया आपण ।
रणी निमाले राम लक्ष्मण । साक्षेपे श्रवण स्वये करवी ॥७१॥
राक्षस्यस्त्रिजटा चापि शासनात्तमुपस्थिताः ।
ता उवाच ततो हृष्टो राक्षसी राक्षसेश्वरः ॥२१॥
हताविंद्रजिताख्यातौ वैदेह्या रामलक्ष्मणौ ।
पुष्पकं तां समारोप्य दर्शयध्वं रणे हतौ ॥२२॥
यस्याश्रयादवष्टब्धा सीता मां नोपतिष्ठते ।
सोऽस्या भर्ता सह भ्रात्रा निहतो रणमूर्धनि ॥२३॥
रावण सीतेला विमानातून रामलक्ष्मणांची स्थिती दाखवितो :
त्रिजटा वृद्ध राक्षसी । साक्षेपे पाचारोनि तिसी ।
रावण सांगे तियेसी । अति उल्लासीं गर्जोनी ॥७२॥
इंद्रजिताने करोनि रण । रणी मारिले राम लक्ष्मण ।
ऐसे सीतेसी सांगोनि आपण । करवी दर्शन दोहींचे ॥७३॥
सीता पुष्पकी वाहोनि जाण । तिसी दाखवीं रणांगण ।
जेथे पडले राम लक्ष्मण । विंधोन बाण शरबंधीं ॥७४॥
श्रीरामबळे तत्वता । मज दृष्टी नाणी सीता ।
त्या मारिले रघुनाथा । सहित भ्राता सौमित्र ॥७५॥
रणी मारिले रघुकुळटिळका । सीते सांडोनि संमूळ शंका ।
उल्लासे वरी लंकानाथा । सकळ सुखा पावसी ॥७६॥
विमानं पुष्पकं शनैरारोपयन्शुभम् ।
रावणः कारयन्लंकां पताकाध्वजमालिनीम् ॥२४॥
घोषयामास च तदा स्वपुर्यां राक्षसेश्वरः ।
हताविंद्रजितां संख्ये तावुभौ रामलक्ष्मणौ ॥२५॥
विमानेन तु सा सीता तदा त्रिजटया सह ।
ददर्श वानराणां तु सर्वसैन्यं निपतितम् ॥२६॥
ततः सीता ददर्शोभौ शयनौ शरतल्पगौ ।
लक्ष्मणं चैव रामं च विसंज्ञौ शरपीडितौ ॥२७॥
तौ दृष्ट्वा भ्रातरौ तत्र शोकबाष्प समाकुला ।
वेपंती दुःखिता सीता करुणं विललाप ह ॥२८॥
सीता वाहोनि विमानी । त्रिजटा निघाली घेवोनी ।
तंव रावण लंकाभुवनी । गुढिया उभवोनि हरिखेजे ॥७७॥
इंद्रजिताने विंधोनि बाण । रणी पाडिले राम लक्ष्मण ।
भेरी त्राहाटिल्या निशाण । गडगर्जन लंकेसी ॥७८॥
राम मारिला निशाचरीं । अनुवादती नरनारी ।
वानरांच्या मारिल्या हारी । बहु बाणाग्री विंधोनी ॥७९॥
वानरांचे निवासस्थान । देखिले चालता विमान ।
रणी पडिले राम लक्ष्मण । रणांगण देखिले ॥८०॥
श्रीराम सुरक्षित असल्याची सीतेची खात्री :
श्रीराम आणि सौमित्र । पाडिले क्षितितळी महावीर ।
बाणी भेदलें गात्रेंगात्र । प्रवाहे रुधिर सर्वांगी ॥८१॥
देखोनि श्रीरामदर्शन । सीता हरिखली संपूर्ण ।
धन्य धन्य रावणच्छळण । श्रीरामनिधान देखिले ॥८२॥
रावणाचा कृतोपकार । हा मज आजि घडला थोर ।
स्वये भेटविला श्रीरामचंद्र । दशशिर कृपाळु ॥८३॥
विमानींहून आपण । हरिखें घाली लोटांगण ।
देखता श्रीराम लक्ष्मण । सुख संपूर्ण सीतेसी ॥८४॥
देखोनि श्रीरामावस्था । अवघे मिथ्या मानी सीता ।
राक्षसमाव हे तत्वता । मृत्यु रघुनाथा असेना ॥८५॥
ऐकता रामनामगजर । मृत्यु पळे अति सत्वर ।
न येववे रामनामासमोर । श्रीरामचंद्र न मारवे ॥८६॥
राम काळाचा आकळिता । त्यासी नाही मरणावस्था ।
रणी मारिले रघुनाथा । मिथ्या वार्ता मायिक ॥८७॥
श्रीराम शस्त्राची निजशक्ती । श्रीराम गतीची निजगती ।
श्रीराम जगदात्मा त्रिजगती । शस्त्रसंपातासी अलिप्त ॥८८॥
शस्त्रे छेदिता आकाशासी । शस्त्रे वृथा जाती आपैसीं ।
तैसीच गति श्रीरामासी । शस्त्रघातासीं अलिप्त ॥८९॥
श्रीराम निजांगें आपण । सकळ शस्त्रांचें तिखटपण ।
त्याच्या अंगी रुपले बाण । वृथा विंदान मायिक ॥९०॥
श्रीरामाच्या स्वस्वरुपासीं । ठाव नाही जन्ममृत्यूंसी ।
त्या मारिले श्रीरामासी । वृथा राक्षसी अनुवाद ॥९१॥
निजनिश्चयें तत्वता । मरण नाही श्रीरघुनाथा ।
येणे निश्चये असता सीता । न बाधे व्यथा अणुमात्र ॥९२॥
बाह्यदर्शनी सीतेचा विलाप :
श्रीराम शिव सीता शक्ती । येरयेरांच्या जाणती गती ।
तेही लोकरक्षणार्थीं । असे विलापती ते ऐका ॥९३॥
माझ्या सर्वांगी शुभलक्षण । मज न यावे वैधव्यपण ।
रणी मारिल्या रघुनंदन । अवलक्षण लक्षणे ॥९४॥
हाती पद्म पायी पद्म । टाळुमस्तकीं सौभाग्यपद्म ।
रणी मारिल्या श्रीराम । पद्में अपद्म मज माझी ॥९५॥
निजलक्षणें सीता सती । स्वये असे अनुवादती ।
अति दुःखे विलपती । श्रीरघुपतिवियोगें ॥९६॥
सौभाग्यवती तू संपूर्ण । वसिष्ठाचे आशीर्वचन ।
मिथ्या जाले त्याचे ज्ञान । रघुनंदन निमाल्या ॥९७॥
मजसी श्रीरामा अभिषिंचन । ऐसे अगस्तीचें वचन ।
त्याचेंही मिथ्या झाले ज्ञान । रघुनंदन निमाल्या ॥९८॥
अनसूया पतिव्रता पूर्ण । निजसौभाग्य अर्पीं आपण ।
तिचेंही उडालें सतीपण । रघुनंदन निमाल्या ॥९९॥
अरुधती श्रेष्ठ नारी । तिणें मज दिधली गळसरी ।
श्रीराम निमालियावरी । तिचीही थोरी अति मिथ्या ॥१००॥
विश्वामित्र वरद परम । नित्य सीतासौभाग्यसंभ्रम ।
त्याचाही मिथ्या वचनधर्म । रणी श्रीराम निमाल्या ॥१॥
हा राम हा लक्ष्मण । दीर्घ स्वरें करी रुदन ।
दिव्यास्त्र असता पूर्ण । सर्वांगी बाण वेधले कैसे ॥२॥
सर्वांगी खडतरोनि बाण । क्षिती लोळती राम लक्ष्मण ।
सीता आक्रंदे करोनि रुदन । काय आपण अनुवादे ॥३॥
रणी निमाल्या राम लक्ष्मण । निःशंक मज गांजील रावण ।
मीही आतांच सांडीन प्राण । कांस संपूर्ण घातली ॥४॥
घालोनिया वज्रासन । अर्धोन्मीलित करोनि नयन ।
सबाह्य श्रीराम चिंतून । त्यजावया प्राण उदित ॥५॥
सीतेचे त्रिजटेकडून सांत्वन :
तंव त्रिजटा म्हणे सीतेसी । तू काय जालीस परम पिसी ।
स्वस्थ असता श्रीरामासी । तू का त्याजिसी निजप्राण ॥६॥
परिदेवयतीं सीतां राक्षसी त्रिजटाब्रवीत् ।
मा विषादं कृथा देवि भर्तायं तव जीवति ॥२९॥
कारणानि तु वक्ष्यामि महांति सदृशानिच ।
नैतौ शक्यौ रणे जेतूमपि सर्वैः सुरासुरै ॥३०॥
इदं विमानं वैदेहि पुष्पकं नाम नामतः ।
दिव्यं न धारयेत्वां हि यदि रामो हतो भवेत् ॥३१॥
त्यज शोकं च दैन्यं च दुःखं च जनकात्मजे ।
रामलक्ष्मणयोरर्थे नैतौ शूरौ विजवितौ ॥३२॥
ऐकोनि सीतेचे रुदन । देखोनि प्राणांत निर्वाण ।
त्रिजटा बोले आपण । सीते सावधान अवधारी ॥७॥
नाही निमाले राम लक्ष्मण । हे माझे सत्य भाषण ।
शरबंधीं सावधान । दोघे जण निजबोधें ॥८॥
दिव्यास्त्रे असतीं त्यांपाशीं । केंवी सांपडती शरबंधासीं ।
त्याही समूळ कारणांसी । ऐक तुजपासी सांगेन ॥९॥
इंद्रजिते करोनि अभिचार । प्रसन्न करोनि श्रीशंकर ।
शिववरदाचे सर्पशर । अति अनिवार मागीतले ॥११०॥
शिववरद सम्यक । जाता श्रीरामासंमुख ।
तो तुझे छेदील मस्तक । अंधारी लागे अतर्क्य शरबंध ॥११॥
माझ्या वरदबाणांस्तव आपण । शरबंधी पडती दोघे जण ।
तुज संमुख गेलिया जाण । घेतील प्राण निमेषार्धे ॥१२॥
शरबंधीम् राम सौमित्र । सावधानत्वें निधडे शर ।
संमुख आल्या निशाचर । छेदिती शिर निमेषार्धे ॥१३॥
ऐसिया शिववरदाभेण । कदा संमुख न ये रावण ।
इंद्रजित स्वये नये आपण । राक्षसगण न येती ॥१४॥
सत्प प्रहर जाल्यापाठीं । सुटती शरबंधाच्या गांठी ।
दोघे उठती कडकडाटीं । राम जगजेठी अनिवार्य ॥१५॥
आणीक आहे गुह्य गोष्टी । गरुड येईल श्रीरामभेटी ।
शरसर्प पळती उठाउठी । दोघे जगजेठी निर्मुक्त ॥१६॥
असत्य न वदे माझे वदन । पूर्वी विटाळलें नाही जाण ।
पुढे न बोले असत्य वचन । सत्य भाषण हे माझे ॥१७॥
त्रिजटेने सांगितलेली विशिष्ट खूण :
सीतासतीचे संगती । त्रिजटेसी ज्ञानस्फुर्ती ।
दृष्टी देखिल्या रघुपती । विज्ञानस्थिति ठसावे ॥१८॥
आणिक प्रत्यक्ष दृष्टांत । विधवास्पर्शे विमान पतित ।
हे तंव घडले नाही येथ । तू सौभाग्यवती श्रीरामे ॥१९॥
निमाला असता रघुनाथ । तरी हे विमान होते पतित ।
तू सौभाग्यभाग्यवंत । स्वस्थ रघुनाथ शरबंधीं ॥१२०॥
ज्यासी स्वभावे विमान प्राप्त । तो त्रैलोक्यी होय समर्थ ।
ते विमान देत लंकानाथ । तू सौभाग्यवंत भाग्याची ॥२१॥
दाटून प्राप्त होय विमान । या भाग्याचें निजमहिमान ।
येथे गणूं शके कोण । तू भाग्यपूर्ण श्रीरामे ॥२२॥
शरपंजरीं श्रीराम स्वस्थ । सत्य मानून वचनार्थ ।
शोक दैन्य दुःखार्थ । सांडीं समस्त जानकीये ॥२३॥
संरक्षणाचे अनुवृत्ती । त्रिजटेसी सीतासंगती ।
तेणे पावली ज्ञानस्फूर्ती । धन्य संगती संतांची ॥२४॥
त्रिजटा केवळ सत्वमूर्ती । नाही असत्याची अनुवृत्ती ।
तेणे फळली संतसंगती । ज्ञानस्थिती अनुवदे ॥२५॥
श्रुत्वा च वचनं तस्याः सीता सुरसुतोपमा ।
कृतांजलिरुवाचेमामेवमस्त्विति मैथिली ॥३३॥
विमानं पुष्पकं तच्च सन्निवर्त्य मनोजवम् ।
दीना त्रिजटया सीता लंका भूयः प्रवेशिता ॥३४॥
ततस्त्रिजटया सार्द्धं पुष्पकादवतीर्य सा ।
अशोकवनिकामेव राक्षसीभिः प्रवेशिता ॥३५॥
स्वस्थ श्रीराम लक्ष्मण । ऐकोनि त्रिजटेचे वचन ।
सीता जाहली सुप्रसन्न । स्वानंदे पूर्ण अनुवादे ॥२६॥
विशिष्ट खूण ऐकून सीतेची प्रतिक्रिया :
जे अनुवादलीसी साजणी । तथास्तु हो तुझी वाणी ।
ऐसे सीता अनुवदोनी । श्रीरामदर्शनीं सादर ॥२७॥
परतवितां विमान । श्रीरामाचे दूर दर्शन ।
सीता पाहे सावधान । प्रत्यंगी मन न्यासूनी ॥२८॥
ठाणमाणगुणलक्षण । सबाह्य श्रीरामलक्ष्मण ।
सीता निरखी आपण । सावधान पतिरुपीं ॥२९॥
सबाह्य श्रीराम मूर्च्छापन्नं अंतरी स्वये सावधान ।
बाह्य अर्धोन्मीलित नयन । देखणा पूर्ण सर्वांगें ॥१३०॥
बाह्य श्रीरामा शरबंधन । अंतरी बंधमोक्षविहीन ।
बाह्य रुधिरोक्षित मलक्लिन्न । अंतरी निर्मळ निर्गुणत्वें ॥३१॥
बाह्य विकळता रघुपती । अंतरी सावध सर्वा भूतीं ।
बाह्य पडता दिसतो क्षिती । गुणतीतीं विश्रांत ॥३२॥
लक्षितां श्रीरामठाणमाण । वेदशास्त्रा पडे मौन ।
माजी हरपे गगन गहन । त्याचेंही महिमान कोण वर्णी ॥३३॥
सीतेची प्रसन्नताः
ऐसे देखोनि रघुनाथा । आपअपणा विसरे सीता ।
सबाह्य कोंदली स्वरुपता । पतिपरमार्था देखोनी ॥३४॥
छळू जाता स्वये रावण । छळणीं श्रीराम सुप्रसन्न ।
देखोनि जिजात्मदर्शन । सुखसंपन्न मज केले ॥३५॥
रावण म्हणो नये कपटी । जेणे श्रीरामेसी करोनि भेटी ।
निवविलें सुख सीतुष्टीं । उपकार कोटी मज त्याचा ॥३६॥
स्वप्नीं नायके श्रीरामगोष्टी । तो प्रत्यक्ष दाविला दृष्टी ।
रावण म्हणो नये कपटी । सुखसंतुष्टी निवविलें ॥३७॥
यापरी दावोनि रणांगण । भेटवोनि श्रीराम लक्ष्मण ।
त्रिजटा परतली आपण । घेवोनि विमान सीतेसी ॥३८॥
शोक नाहीम् सीतेच्या मनी । यालागी पावली अशोकस्थानीं ।
सुखसंपन्न निजबंधनीं । श्रीरामपत्नी सुखरुप ॥३९॥
उल्लंघोनि लंकाभुवन । ठाकोनि आली अशोकवन ।
तेथे खेचोनि विमान । ठेवी आपण सीतेसी ॥१४०॥
छळण करिता रावण । छळणीं सीता सुप्रसन्न ।
एका जनार्दना शरण । रामायण अति रम्य ॥४१॥
श्रीरामा करिता शरबंधन । राम शरबंधीं सुप्रसन्न ।
एका जनार्दना शरण । रामायण अति रम्य ॥४२॥
रावणे करिता अति बंधन । श्रीराम सीता सुप्रसन्न ।
एका जनार्दना शरण । रामायण अति रम्य ॥४३॥
श्रीरामसीतादर्शन । देखता दोघे सुप्रसन्न ।
एका जनार्दना शरण । रामायण अति रम्य ॥१४४॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
जानकीश्रीरामदर्शनं नाम द्वादशोऽध्यायः ॥१२॥
ओंव्या १४४ ॥ श्लोक ॥३५॥ एवं ॥१७९॥
