॥ श्रीएकनाथमहाराजकृत
13.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय तेरावा ॥
श्रीरामांची शरबंधनातून मुक्तता
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
सीता अशोकवनात परत्ल्यावर श्रीराम शरबंधानातून शुद्धीवर
आले व लक्ष्मणाची अचेतन स्थिती पाहून विलाप करु लागले :
सीता नेलिया अशोकवना । मागे शरबंधीं रघुनंदना ।
पावोनि लब्धचेतना । आपअपणा अवलोकी ॥१॥
अथ दीर्घेण कालेन संज्ञां लेभे नरोत्तमः ।
प्रत्यवेक्षत मात्मानं शोणितेन परिप्लुतम् ॥१॥
अदीनो दीनया वाचा रामः परमसत्ववान् ।
अभ्यभाषत दीनात्मा हरिभिः परिवारितः ॥२॥
लक्ष्मणं पतितं दृष्ट्वा दुःखशोकसमान्वितः ।
विललाप ततो रामो मंदभश्रूण्यवर्जयन् ॥३॥
कि नु मे सीतया कार्यं लब्धया जीवितेन वा।
शयानं योऽद्य पश्यामि लक्ष्मणं शुभलक्षणम्॥४॥
यत्र क्वचिल्लभेद्भार्यां पुत्रान्मित्रांश्च बांधवान् ।
न लक्ष्मणसमो भ्राता सचिवः सांपरायिकः ॥५॥
शरबंधनी रघुनंदन । स्वये होवोनि सावधान ।
निजांगीं खडतरले बाण । रुधिरें क्लिन्न भूमिशायी ॥२॥
सवेंचि पाहे लक्ष्मण । तंव यासी न देखे प्राण ।
सज्ञान घेवोनि अज्ञान । मिथ्या रुदन स्वये दावी ॥३॥
नाही लक्ष्मणा जीवघात । ऐसे जाणोनि श्रीरघुनाथ ।
पहावया वानरवृत्तांत । आक्रंदत अति दुःखे ॥४॥
वाचा विकळ भ्रष्टस्वर । ऐकता देखती वानर ।
रणी पडला सखा सौमित्र । तेणे रघुवीर विलपत ॥५॥
रावण इंद्रजित कुंभकर्ण । मारिल्या मज सुख कोण ।
सखा न भेटे लक्ष्मण । सांडिन प्राण यालागी ॥६॥
कितीही विजय मिळविले तरी लक्ष्मणाची सर नाहीः
करुनि राक्षसकंदन । घेतलिया लंकाभुवन ।
सखा न भेटे लक्ष्मण । सांडीन प्राण त्यालागीं ॥७॥
स्त्रिया सीतेऐशा जाण । असंख्य मिळती संपूर्ण ।
तैसा न मिळे सखा लक्ष्मण । सांडीन प्राण त्यालागीं ॥८॥
स्त्रिया मेळविल्या मिळती । पुत्र पौत्र होय संतती ।
सख्या लक्ष्मणाची प्राप्ती । त्रिजगती दुर्लभ ॥९॥
प्रवेशल्या अयोध्येसी । भरतशत्रुघ्नकौसल्येसी ।
केंवी मुख दाखवू सुमित्रेसी । त्यजीन प्राणांसी यालागी ॥१०॥
वना आलो दोघे जण । पुसती केउता तो लक्ष्मण ।
तेव्हा माझे काळे वदन । त्यजीन प्राण यालागी ॥११॥
लक्ष्मणावांचून आपण । सर्वथा न करी फळभक्षण ।
त्यावीण न घे मी जीवन । त्यजीन प्राण यालागी ॥१२॥
लक्ष्मणावांचून आपण । पदमात्र न करी गमन ।
त्यालागीं त्यजीन मी प्राण । सत्य भाषण हे माझे ॥१३॥
दुःख आठवलें दारुण । नयनी आले अश्रु पूर्ण ।
आपल्या कर्माचें दुषण । स्वये आपण अनुवादे ॥१४॥
अयंमिथ्या प्रलापो मे हत्वा युद्धे दशाननम् ।
यन्मया न कृतो राजा राक्षसानां बिभिषणः ॥६॥
बिभीषणाचा विलाप :
रणी मारोनि रावण । राक्षसराजा बिभीषण ।
माझेनि न करवेचि जाण । शेकलें ऋण मज त्याचे ॥१५॥
परम माझे मज दूषण । लंका बिभीषणा दिधली दान ।
ते मी नव्हेंचि उत्तीर्ण । शेकलें ऋण मज त्याचे ॥१६॥
भरतासीं पत्र देता जाण । तेणे रणी विंधोनि रावण ।
राजा करील बिभीषण । ऋण उत्तीर्ण त्याचेनि ॥१७॥
आमची ऐकून मरणावस्था । भरत शत्रुघ्न तिघीं माता ।
प्राण देतील तत्वता । उत्तीर्णता नव्हे तेणे ॥१८॥
अंतकाळींचे जे ऋण । वंदून बिभीषणाचे चरण ।
त्यासी देवोनि धनुष्यबाण । ऋणउत्तीर्ण मी होईन ॥१९॥
दिव्यास्त्रेंसीं धनुष्यबाण । माझे पावल्या बिभीषण ।
त्रैलोक्यी पूज्य होईल पूर्ण । निजवरदान हे माझे ॥२०॥
ऐकोनि श्रीरामवचन । बिभीषण मूर्च्छापत्र ।
स्वये दीर्घ करी रुदन । अभाग्य पूर्ण मज माझे ॥२१॥
बुद्धि सांगे रघुनंदन । आम्हा दोघांचा गेल्या प्राण ।
गजरें येवोनि रावण । करील कंदन वानरा ॥२२॥
मजसंमुख करोनि रण । वानर मारतील रक्षोगण ।
मागे तुम्हांसी न यावे मरण । शिघ्र गमन तुम्ही करा ॥२३॥
जुत्पती वीर वानरगण । त्यांसी माझे लोटांगण ।
सवेग न येता रावण । शीघ्र गमन तुम्ही करा ॥२४॥
मजपुढे करोनि रण । वीर मारिले रक्षोगण ।
जालेती सर्वस्वें उत्तीणें । शीघ्र गमन करावे ॥२५॥
अस्मिन्महूर्ते सुग्रीव प्रतियातुमिहार्हसि ।
सत्वहीनं हि मां राजा रावणोऽभिद्रविष्यति ॥७॥
अंगदं तु पुरस्कृत्य ससैन्यं ससुहद्रणम् ।
सागरं तर सुग्रीवा पुनस्तेनैव सेतुना ॥८॥
श्रीरामांचा सुग्रीवास ससैन्य परतण्याचा आदेश :
सुग्रीवा बुद्धि ऐक पा खरी । येचि समयींचे अवसरी ।
जंव पडली आहे अंधारी । सहपरिवारी निघावे ॥२६॥
वानरवीर सुहृज्जन । सैन्य सेनानी कपिगण ।
एकवटोनि आपण । करावे गमन किष्किंधे ॥२७॥
वानरवीरांसमवेत । सुग्रीवराजा जीवे जीत ।
ऐकोनि येऊनि लंकानाथ । करावया घात वानरा ॥२८॥
वानरराजा तू कपिपती । तुजवीण वानर न चालती ।
तुवा निघावे शिघ्रगतीं । किष्किंधेप्रति नेमस्त ॥२९॥
अंगदे आणिले मुकुटासी । तो राग पोटी रावणासी ।
पुढे घालोनिया त्यासी । सकळ सैन्येंसीं निघावें ॥३०॥
करोनि आलो सेतुबंधन । तेणे मार्गे गा आपण ।
शीघ्र करावे गमन । किष्किंधाभुवन ठाकोनी ॥३१॥
ऐकोनि श्रीरामवचन । सुग्रीव न ढळे अणुप्रमाण ।
पुढती बोले रघुनंदन । शीघ्र गमन करी बापा ॥३२॥
यत्तु कार्यंवयस्येन सुहृदा वा परं मम ।
कृतं सुग्रीव सत्सर्वं भवता धर्मभीरुणा ॥९॥
मित्रकार्यं कृतमिदं भवद्भिर्वानरर्षभाः ।
अनुज्ञाता मया सर्वे यथेष्ट गंतुमहर्थ ॥१०॥
शुश्रुवुस्तस्य ये सर्वे वानराःपरिदेवितम् ।
ते सर्वे चक्रुरश्रुणि नेत्रैः कृषेतरेक्षणाः ॥११॥
आमचें तुमचे सख्यत्व परम । त्या सख्यत्वाचें कृतकर्म ।
तुवा संपादिलें सुगम । आत्माराम मी जाणे ॥३३॥
मित्रकार्यी तू विख्यात । संपादिला मित्रकार्यार्थ ।
सुखी केला हा रघुनाथ । परम आप्त तुम्ही मज ॥३४॥
असंख्य मेळवोनियां दळ । महावीर कपि प्रबळ ।
सेतु बांधोनि तत्काळ । आलेति सकळ मत्कार्या ॥३५॥
सखया सुग्रीवा परियेसीं । वानर कष्टलें परदेशी ।
यांसी नेवोनि स्वगृहांसी । स्त्रीपुत्रांसीं भेटवी ॥३६॥
तुवांही किष्किंधाभुवनीं । तारा रुमा दोन्ही पत्नी ।
सुक भोगावे अनुदिनी । सिंहासनी स्वानंदे ॥३७॥
अंगद युवराजा जाण । वीर शूर सुभट पूर्ण ।
त्याचेही लळे पाळून । सुखी संपूर्ण करावे ॥३८॥
माझिया कार्यालागी जाण । वानरी वेंचिले प्राण ।
समस्ता माझे लोटांगण । शीघ्र गमन करावे ॥३९॥
तुम्ही शीघ्र न करिता गमन । येथे येवोनि दशानन ।
करील वानरा रणकंदन । दुःख दारुण ते मज ॥४०॥
मज न बाधी दुःखावस्था । परी सुग्रीवाची परम चिंता ।
दुःख न होता कपी समस्ता । शिघ्रगमनता निघावें ॥४१॥
लक्ष्मणाच्या दुःखावस्था । मी प्राण त्यागीन आता ।
प्राण त्यागील स्वये सीता । यालागी शीघ्रता तुम्ही जावे ॥४२॥
ऐसे श्रीरामाचे विलपन । ऐकोनिया वानरगण ।
अश्रुपूर्ण जाले नयन । रुदन स्फुंदोन ते करीती ॥४३॥
रामांच्या आदेशावर सुग्रीवाची प्रतिक्रिया :
ऐकोनि श्रीरामवचन । सुग्रीव बोलिला गर्जोन ।
सांडोनिया रामचरण । मागे आपण सरुंना ॥४४॥
निकट आल्या प्राणांत । ओढवलिया कल्पांत ।
नाही सांडणे रघुनाथ । निश्चितार्थ हा माझा ॥४५॥
कैंचें राज्य कैचें छत्र । कैचे कलत्र कैंचें पुत्र ।
सखा सांडोनि श्रीरामचंद्र । अणुमात्र ढळूंना ॥४६॥
सांडोनिया रघुनंदन । आठवी स्त्रियादि भोग भवन ।
तेव्हांचि त्याचे काळे वदन । आकल्प पतन तयासी ॥४७॥
बिभीषणस्तु रामस्य दृष्टा गात्रं शरैश्चितम् ।
लक्ष्मणस्यच धर्मात्मा बभूव व्यथितस्तदा ॥१२॥
जलक्लिन्नेन हस्तेन तयोर्नेत्रे विमृज्य च ।
शोकसंपीडितमना रुरोद विललाप ह ॥१३॥
बिभीषणाच्या जलसिंचनाने राकलक्ष्मणांना सुद्धी :
सर्वांगी खोचिनियां बाण । रणी पडले राम लक्ष्मण ।
ते देखोनिया बिभीषण । करी रुदन अति दुःख ॥४८॥
बैसोनिया सुग्रीवापासीं । बिभीषण रडे आक्रोशी ।
कपटें छळोनि राक्षसी । रणी रामासी पाडिलें ॥४९॥
खोंचले देखोनिया बाण । जळहस्ते बिभीषण ।
श्रीराम आणि लक्ष्मण । करी स्पर्शन सर्वांगी ॥५०॥
बिभीषणहस्तींचें उदक । तेणे निवारेल देहदुःख ।
श्रीरामलक्ष्मण नावेक । पावले सुख शरबंधीं ॥५१॥
बिभीषणहस्तोदकगुण । दोघे झाले सावधान ।
परी सर्वांगी विकळपण । अर्ध क्षण बैसवेना ॥५२॥
सुग्रीव आणि बिभीषण । दोघे देखोनि अति उद्विग्न ।
ते काळी अंगद आपण । बोले गर्जोन ते ऐका ॥५३॥
श्रीराम आणि लक्ष्मण । सुग्रीवादि वानरगण ।
सुख पावती संपूर्ण । ते मी करीन अवधारा ॥५४॥
अथाब्रवीद्वानरेंद्रः सुग्रीवः पुत्रमंगदम् ।
सुषेणं श्वशुरं पार्श्वे समाहूयेदमब्रवीत् ॥१४॥
सहशूरैर्हरिगणैर्लब्धसंज्ञावविक्लवौ ।
उभौ प्राययतः क्षिप्रं किष्किंधां रामलक्ष्मणौ ॥१५॥
अंगदास सुग्रीवाचा आदेश :
सुग्रीव सांगे अंगदासी । पाचारोनि सुषेण शुरासी ।
सकळसैन्य समुदायेंसीं । न्यावे किष्किंधेसीं राम सौमित्र ॥५५॥
ऐकोनि सुग्रीवाची युक्ती । अंगदे अति विनयवृत्तीं ।
सुग्रीवादि सकळ जुत्पती । केली विनती अभिवंद्य ॥५६॥
सुग्रीव राजा कपिपती । घेवोनि सौमित्र सीतापती ।
न वचता किष्किंधेप्रती । वानर न ढळती ससैन्य ॥५७॥
स्वामी तुज सुग्रीवेंवीण । वेगळे न होती वानरगण ।
घेवोनि राम लक्ष्मण । जावे आपण किष्किंधेसीं ॥५८॥
अहं तु रावणं हत्वा सपुत्रं सहबांधवम् ।
मैथिलीमानयिष्यामि सक्रो नष्टमिव श्रियम् ॥१६॥
सर्वे गच्छंतु विश्वासाद्वज्रांगो मारुतात्मजः ।
अनेनाहं सहायेन हानिष्ये राक्षसाधिपम् ॥१७॥
अंगदाचे पतिवचन :
सुग्रीव सुषेण गुप्तती समस्त । नळनीळादि जांबवंत ।
अंगद लोटांगणें विनवीत । निजपुरुषार्थ लक्षोनी ॥५९॥
लब्धसंज्ञ राम लक्ष्मण । दोघे जाले सावधान ।
येथोनि यांसी नाही मरण । विकळ पूर्ण सर्वांगी ॥६०॥
जंव विकळ राम लक्ष्मण । तंव सुग्रीवादि वानरगण ।
समस्तांहीं होवोनि सावधान न्यावे । दोघे जण किष्किंधे ॥६१॥
मागे मी एकला आपण । मारीन इंद्रजित कुंभकर्ण ।
रणी निर्दाळीन रावण । सपुत्रप्रधानसैन्यासीं ॥६२॥
माझेनि विश्वासे समस्त । सुखी जावे सुनिश्चित ।
एक ठेवावा हनुमंत । रणसाह्यार्थ मजलागी ॥६३॥
याचेनि रणसाह्यपणीं । करीन रावणाची धूळधाणी ।
मारीन राक्षसांच्या श्रेणी । सीता जननी सोडवीन ॥६४॥
करोनिया समुद्रमथन । इंद्रे श्री काढिली शोधून ।
तेंवी राक्षस दमून । सीता चिद्रत्न आणीन ॥६५॥
लंका बिभीषणा दिधली दान । जे का श्रीरामवाचाऋण ।
ते मी होईन उत्तीर्ण । बिभीषण येथे ठेवा ॥६६॥
रणी मारोनि रावणासी । स्वये सोडवीन सीतेसी ।
राज्य देईन बिभीषणासी । रामऋणासीं उतराई ॥६७॥
अंगदाचे वचन ऐकून सुग्रीवास आनंद व प्रतिक्रिया :
इतुके करोनि । सीता घालोनि शिबिकेसीं ।
गर्जत येईल किष्किंधेसीं । सत्य वचनासी मानावे ॥६८॥
ऐकोनि अंगद अनुवादन । सूखावला सुग्रीव आपण ।
हरिखें चुंबोनियां वदन । संतोषोन स्वये डोले ॥६९॥
धन्य अंगदां तुझी वचनावळी । धन्य अंगदा तुझी शैली ।
वीर शूर आतुर्बळी । वानरकुळीं अंगद ॥७०॥
जैसा बोलिलासी तैशी शक्ती । तैसी करु शकसी ख्य़ाती ।
निधडा वीर तू त्रिजगती । वानू किती गुण तुझे ॥७१॥
तू एकला करिसी रण । आम्ही घेवोनि राम लक्ष्मण ।
किष्किंधे जाता पै पळोन । अतिजघन्य पै आम्हा ॥७२॥
नगरी हांसिजे वानरी । स्वर्गी हांसिजे सुरवरी ।
हांसिजेल ऋषीश्वरी । चराचरी अतिनिंद्य ॥७३॥
इंद्रजित आलिया कुंभकर्ण । ससैन्य आलिया रावण ।
मागे सरणें नाही जाण । केले निर्वाण सुग्रीवे ॥७४॥
हनुमंताला हर्ष :
ऐकोनि अंगदाची मात । हरिखला हनुमंत ।
आला स्वानंदे गर्जत । राक्षसांतकृतकारी ॥७५॥
अंगद माझा निजसखा । मी अंगदाचा पाठीराखा ।
मारावया दशमुखा । विचार इतुका कायसा ॥७६॥
जांबवंत सुग्रीव बिभीषण । नळनीळादी वानरगण ।
श्रीरामाचे शरणबंधन । निर्बंधन केंवी होय ॥७७॥
नारदमुमींचे आगमन व श्रीरामांस वंदन :
ऐसा करिता विचार । तंव तपस्तेजाचा डोंगर ।
आला नारद मुनीश्वर । करीत गजर नामाचा ॥७८॥
नारदाची निजाअवडी । श्रीराम मारील राक्षसकोडी ।
डोळेभरी पाहीन गोडी । कडोविकडी नाचत ॥७९॥
शस्त्रास्त्री वीर वानरगणी । श्रीराम भिडेल झोंटढराणीं ।
त्याही युद्धाची घेईन धणी । शेंडी थरकोनी थडथडित ॥८०॥
पाताळी युद्ध न पडे दृष्टी । नारद पाये पृथ्वी पिटी ।
नसतां मृत्युलोकी रणगोष्टीं । तै त्या उठी पोटशूळ ॥८१॥
स्वर्गी नाही रक्षकल्लोळ । नारदा कपाळशूळ ।
लंकाभुवनीं रणगोंधळ । केला सुकाळ श्रीरामे ॥८२॥
संग्रामपीक आले प्रबळ । पाडिले शरबंधनाचे टोळ ।
नारद उडवील तत्काळ । रणसुकाळ पहावया ॥८३॥
पहावया श्रीरामरणगोडी । नारदासी परम आवडी ।
फेडावया शरबंधसांकडी । अति तांतडी तो आला ॥८४॥
श्रीरामाचा निजबाण । ज्या लागे तो ब्रह्म पूर्ण ।
ऐसे पहावया निर्वाणरण । आवडी गहन नारदासी ॥८५॥
एतस्मिन्नेव काले तु महायोगबलन्वितः ।
आजगाम महातेजा देवर्षिर्नारदस्तथा ॥१८॥
राघवस्य समीपे तु निपपात सखीकृतः ।
कृत्वा प्रदक्षिणं रामंतेषां मध्ये वनौकसाम् ॥१९॥
अभितुष्टाव काकुत्स्थं स्मारयन्पूर्वजन्म च ।
राम राम महाबाहो शृणुष्व वदतां वर ॥२०॥
दिव्यं लक्ष्मणसंयोगं किमात्मानं न बुध्यसे ।
भवान्नारायणः श्रीमान्सर्वलोकनमस्कृतः ॥२१॥
नारदाचे श्रीरामपराक्रमवर्णन व विनंती :
श्रीराम देखोनि शरबंधनीं । नारद येवोनि तेच क्षणी ।
प्रदक्षिणा लोटांगणी । लागला चरणी रामाच्या ॥८६॥
अगाध नारदाचे महिमान । तपस्तेजें देदीप्यमान ।
मानूनि श्रीरामभक्त पूर्ण । वानरगण स्वये वंदिले म॥८७॥
मी एक श्रेष्ठ महामुनी । वानर वनचर हीन भजनीं ।
ऐसे नारद कदा न मानी । घाली लोटांगण समसाम्य ॥८८॥
जोचि भाव श्रीरामचंद्री । तोचि भाव वानरांवरी ।
प्रदक्षिणा नमस्कार करी । भिन्नत्व न धरी अणुमात्र ॥८९॥
ऐसी साधूंची शुद्ध शैली । नारदीं नांदे सुखसमेळी ।
तो येवोनि श्रीरामाजवळी । सांगे समूळी मूळकथा ॥९०॥
तुझे स्वरुप द्वंद्वविहीन । मिथ्या मानिसी शरबंधन ।
होवोनियां सावधान । करी कंदन राक्षसा ॥९१॥
तुझे होताहे निर्वाणरण । पाहू आलो मी आपण ।
घेवोनिया धनुष्यबाण । करी कंदन राक्षसा ॥९२॥
ऐसे सांगता नारदमुनी । श्रीराम नुठी शरबंधनीं ।
मुख्य स्वरुप प्रबोधोनी । अनुवादे वाणी ते ऐका ॥९३॥
तू तंव सर्वभूती सबाह्य पूर्ण । पूर्णपणें निजनिर्गुण ।
निर्गुणत्वें तूंचि सगुण । निजलक्ष्मण निधारीं ॥९४॥
मत्स्यरुपें अवसरोन । शंखासुराते सर्दून ।
स्वये केले वेदोद्धरण । तू आदिकारण श्रीरामा ॥९५॥
कृर्मरुपें तू आपण । पृष्ठभागीं धरा धरोन ।
करोनिया समुद्रमंथन । काढिलीं पूर्ण चौदा रत्ने ॥९६॥
वराहरुपें तूचि जाण । निमन्न धरा उद्धरोन ।
हिरण्याक्ष निर्दाळून । जालासी आपण स्वये वराह ॥९७॥
प्रल्हादकैवारालागीं जाण । अचेतन खांब फोडून ।
हिरण्यकशिपा विदारुन । जालासी आपण नृसिंह रामा ॥९८॥
का उपेंद्ररुपें आपण । दानप्रसगें बळीचें छळण ।
शेखी जालासी बळीचे अधीन । म्हणती वामन द्वारपाळ ॥९९॥
परशुराम तू ब्रह्मक्षत्रीं । गो ब्राह्मणांचा कैवारी ।
सहस्रार्जुनासी करिसी बोहरी । धरा निःक्षत्री त्रिसप्तकें ॥१००॥
तो तू सातवा अवतार । प्रत्यक्षाकारें श्रीरामचंद्र ।
मिथ्या शरबंध शरपंजर । उठी सत्वर रिपुदळणीं ॥१॥
ऐसे नारदे सांगता आपण । शिववरदाचे वरदबाण ।
मिथ्या न करी श्रीरघुनंदन । ऋषि पूर्ण जाणो सरला ॥२॥
तू तंव साक्षात नारायण । शेषशायी श्रीजनार्दन ।
तू तंव जगाचा जीवन । गरुडवाहन श्रीरामा ॥३॥
गरुड तुझा निजसेवक । हाथ जोडोनि उभा संमुख ।
शरबंध छेदावया देख । त्यासी आवश्यक स्मरावें ॥४॥
श्रीरामाचे नारदास उत्तर :
श्रीराम म्हणे नारदाप्रती । गरुडस्वामी मी रघुपती ।
शरबंधाचे निवृत्ती । सेवका काकुळती केंवी करु ॥५॥
माझा स्वामी श्रीशंकर । निवारील शरपंजर ।
ऐसे ऐकता उत्तर । शिव सत्वर धांविन्नला ॥६॥
शंकराच्या आज्ञेने गरुडाचे आगमन :
शिव सांगे गरुडासी । तू तंव महा मूर्ख होसी ।
शरबंध लागला श्रीरामासी । शीघ्र त्यापासी तू जाय ॥७॥
माझ्या वरदाचे वरद बाण । स्वये छेदीना रघुनंदन ।
तुंवा जावोनि आपण । शरबंधन छेदावे ॥८॥
माझ्या वरदाचे सर्पशर । तिही बाधिला श्रीरामचंद्र ।
तुवा जाणोनि सत्वर । नागशर छेदावें ॥९॥
ऐकोनि शिवाचे उत्तर । गरुडासीं उल्लास थोर ।
वंदावया श्रीरामचंद्र । अति सत्वर चालिला ॥११०॥
एतस्मिन्नन्तरे वायुर्मेघाश्चासन्सविद्युतः ।
पर्यस्तं सागरे तोयं कंपंतश्च महीधराः ॥२२॥
महता पक्षवातेन सर्वे तीररुहा द्रुमाः ।
बहवः पातिता भग्नाः समूला लवणांभसि ॥२३॥
ततो मुहूर्ताद्ररुडं वैनतेयं महाबलम् ।
वानरा ददृशुः सर्वे ज्वलंतमिव पावकम् ॥२४॥
तमागतमभिप्रेक्ष्य नागास्ते विप्रदुदुवुः ।
यैस्तु तौ पुरुषौ बद्धौ शरभूतैर्महाबलैः ॥२५॥
ततःसुपर्णः काकुत्स्थौ दृष्ट्वा प्रत्यभिवाद्य च ।
विममर्श च पाणिभ्यां मुखे चंद्र्समप्रभे ॥२६॥
गरुडाच्या पक्षघाताच्या आवाजाने सर्पांचे पलायन :
गरुडे करिता उड्डाण । उभयपक्षांचा पवन ।
पर्वतवृक्ष उन्मळोन । पडतीं आण अमुद्रीं ॥११॥
खचोनि पडती गिरिकडे । पक्षी किलकिलती बापुडे ।
समुद्रजळ गगना उडे । अति झडाडें पक्षांच्या ॥१२॥
पक्षवात तो मेघ निर्वाहे । उसळलें जळ वर्षताहे ।
सुवर्णपक्ष विद्युत्प्राये । झळकताहे आकाशी ॥१३॥
तेजोराशि दैदीप्यमान । कपि देखती गरुडागमन ।
न लागता अर्धक्षण । आले उड्डाण शरबंधा ॥१४॥
येता गरुडाचें उड्डाण । सर्पोद्भुत शरबंधन ।
पळोनि जाले शिवभुषण । गरुडाभेणें अतिधाकें ॥१५॥
गरुडभयाने सर्पांचे शंकराच्या शरीरावर आरोहण :
वेगळे पाहता आपण । गरुड करील पै विदारण ।
सर्प जाले शिवभूषण । निजमरण चुकवावया ॥१६॥
शिवाचिया अंगावरी । बाहुभूषणें उरी शिरी ।
लपती सर्पांचिया हारी । देखोनि सर्पारी अति धाके ॥१७॥
रामलक्ष्मण संपूर्ण सावध, गरुडाचे रामांना वंदन व क्षमायाचना :
शरबंधनी सर्पबंधन । ते सर्प जातांचि पळोन ।
श्रीराम आणि लक्ष्मण । सावधान स्वये जाले ॥१८॥
सावध होता रघुनंदन । गरुड घाली लोटांगण ।
मी तंव अपराधी दारुण । क्षमा संपूर्ण मज कीजे ॥१९॥
पुढती नमन लोटांगण । पुढती करी प्रदक्षिण ।
मी तंव अपराधी दारुण । क्षमा संपूर्ण मज कीजे ॥१२०॥
मज लगल्या शरबंधन । तुवा सांडिलें उपेक्षून ।
ऐसे श्रीरामा तू न म्हण । शठ पूर्ण मज न मानी ॥२१॥
शरबंधाचिये संकटी । म्या नाही ऐकिले जगजेठी ।
शिवे सांगताचिं गोष्टी । उठाउठी मी आलो ॥२२॥
मज येतांचि पै जाण । फिटले सर्प शरबंधन ।
माझेनि दोघा मुक्तपण । सेवा संपूर्ण हे माझी ॥२३॥
मी तंव घरगुती आप्त । दोघांही केले शरनिर्मुक्त ।
हेचि सेवा सुनिश्चित । श्रीरघुनाथसुखार्थीं ॥२४॥
सर्पबंधनाचा प्रताप :
सर्पशरबंध दारुण । आल्या सुरासुरगण ।
मिळालिया सिद्ध चारण । शरबंधन सुटेना ॥२५॥
ब्रह्म शक्र कुबेर वरुण । आल्या कोतिकोटि सुरगण ।
सर्पोद्भुत शरबंधन । सर्वथा जाण सुटेना ॥२६॥
अठ्यायशीं सहस्र ऋषिपंक्ती । आल्या तपस्वी तेजोमूर्ती ।
सर्पशरबंधनिवृत्ती । त्यांच्या निजशक्तीं न करवे ॥२७॥
सर्पशरबंध अति कठिण । ब्रह्मादिका अगम्य जाण ।
त्यांचे केले म्या निवारण । सेवा संपूर्ण श्रीरामी ॥२८॥
असता दिव्यास्त्रें संपूर्ण । दोघा दुर्गम शरबंन ।
ते म्या निवारिलें जाण । सेवा संपूर्ण हे माझी ॥२९॥
तुमच्या अंगी रुतले बाण । त्यांचे बुजवावे वण ।
करिता गरुडे परिमार्जन । लज्जायमान स्वये जाला ॥१३०॥
सर्पबंधनाचा रामलक्ष्मणावर काहीच परिणाम नाही :
श्रीराम आणि लक्ष्मण । अंगी रुपले नाहींत बाण ।
अंगसीं पडला नाही वण । परिमार्जन ते काय ॥३१॥
शरबंधी सर्प शिवभूषण । करिती श्रीरामस्तवन ।
शरबंधीं रघुनंदन । सुखसंपन्न स्वानंदे ॥३२॥
शरबंधीं सर्प सतत । शोधितसत्व समस्त ।
भाग्ये उठिला रघुनाथ । नित्यमुक्त श्रीराम ॥३३॥
शरबंधीं सुखसंपन्न । सर्प करिती मधुर स्तवन ।
लक्ष्मण तोचि शेष शयन । रघुनंदन सुखशायी ॥३४॥
गरुडे सोडविले सर्पबंधन । हे तो माझे मिथ्या वचन ।
श्रीराम नित्यमुक्त चिद्धन । लज्जायमान वैनतेय ॥३५॥
शरबंधीं राम सुखसंपन्न । सरसर्प करिती रामस्तवन ।
अगाध श्रीराममहिमान । मी केंवी दीन आकळीं ॥३६॥
श्रीरामप्रताप निजजिवाडें । सेवा कीजे चंद्रचूडें ।
तेथे मी काय बापुडे । श्रीरामापुढें सामर्थ्ये ॥३७॥
शरबंध करावया निर्मुक । अतिशयेंसीं मी समर्थ ।
ऐसा गर्वें होता फुंजत । तोही गर्वहत श्रीरामे ॥३८॥
श्रीरामसामर्थ्य चोखडे । कळिकाळ न पाहे तयाकडे ।
येथे मी कायसे बापुडे । पाया पडे अनुतापे ॥३९॥
रावणं च रणे हत्वा सीतां त्वमुपलप्स्यसे ।
इत्येवमुक्त्वा वचनं संपूर्णः शीघ्रविक्रमः ॥२७॥
रामंच निरुजं कृत्वा मध्ये तेषां वनौकसाम् ।
प्रदक्षिणं तुतं कृत्वा परिष्वज्याभिवाद्य च ॥२८॥
जगामाकाशमाविश्य गरुडः पवनो यथा ।
नीरुजौ राघवो दृष्ट्वा ते तु वानरयूथपाः ॥२९॥
प्रहृष्टाः ससृजुर्नादान्सक्षसानां भयावहान् ।
ततो भेरीः समाजघ्नुर्मृदंगांश्चाप्यवादयन् ॥३०॥
दध्मुः शंखान्संप्रहृष्टाः क्ष्वेलंत्यपि यथापुरम् ॥३१॥
गरुडाचे रामास वंदन व प्रयाण :
ते काळी गरुडे आपण । प्रदक्षिणा लोटांगण ।
हरिखें वंदोनि वानरगण । प्रेमसंपूर्ण श्रीरामी ॥१४०॥
वानर पूर्ण श्रीरामभक्त । गरुडे जाणोनि निश्चित ।
कपिकुळासमवेत । श्रीरघुनाथ अभिवंदी ॥४१॥
पुढती पुढती प्रदक्षिणा । पुढती पुढती लोटांगणा ।
हर्षे वंदी वानरगणा । करावया गमना पूसत ॥४२॥
देखोनि गरुडाचें प्रेम पूर्ण । श्रीराम झाला सुप्रसन्न ।
देवोनि आलिंगन समाधान । करवी गमन स्वानंदे ॥४३॥
गरुडाचें आशीर्वचन, रामाच्या अस्त्रामध्ये प्रवेश :
गरुडे करितांचि गमन । श्रीरामासी आशीर्वचन ।
अनुवादला संतोषोन । गिरागर्जन ते ऐका ॥४४॥
रणी मर्दूनि रावणासी । राज्य देवोनि बिभीषणासी ।
सीता आणोनि स्वानंदेसीं । सुखी होसी श्रीरामा ॥४५॥
गरुडे नमूनि श्रीरामासी । वेगे उसळला नभासीं ।
पवन प्रवेशे आकाशी । तेणे वेगेसीं निघाला ॥४६॥
रामरावण झुंजारी । पहावया उल्लास गरुडा भारी ।
श्रीरामभात्याभीतरीं । गरुड गरुडास्त्रीं प्रवेशे ॥४७॥
अस्त्रदैवतें अत्यद्भुते । यश पावावया श्रीरामहस्ते ।
भातां दाटलीं समस्ते । रणसाह्यार्थे श्रीरामा ॥४८॥
राम शस्त्रांची निजगती । राम अस्त्रदेवतां निजशक्ती ।
राम जगदात्मा त्रिजगती । राम निश्चिती परब्रह्म ॥४९॥
गरुडे केलिया गमन । श्रीराम देखोनि सावधान ।
वानरा आले स्फुरण । करिती गर्जन हरिनामें ॥१५०॥
हरिखाच्या निजगजरीं । निशाणे त्राहाटिल्या भेरी ।
ताल घोळ मृदंग मोहरी । शंख वानरी आस्फुरिले ॥५१॥
श्रीराम शुद्धीवर आल्यामुळे सर्वत्र आनंद :
श्रीमाम नित्य सावधान । वर्म जाणोनि वानरगण ।
रणी मर्दावया रावण । गुढिया उभवोनि नाचती ॥५२॥
वाजंत्र्यांचा ध्वनि गंभीर । वानरी केला भुभुःकार ।
त्यामाजी रामनामाचा गजर । नामी अंबर कोंदलें ॥५३॥
नाम कोंदले गगनी । आनंद झाला त्रिभुवनी ।
दचकल्या राक्षसश्रेणी । ऐकता ध्वनी सुटला कंप ॥५४॥
ऐकतांचि ते नादध्वनी । रावण दचकला सिंहासनी ।
इंद्रजित दचकला मनी । राम शरबंधनी सुटला ॥५५॥
सुटोनिया शरबंधन । श्रीराम जाला सावधान ।
सुमने वर्षती सुरगण । उल्लास संपूर्ण सर्वासी ॥५६॥
एका जनार्दना शरण । श्रीराम नित्य सावधान ।
पुढील कथा अति पावन । मोक्षोपपादन श्रोतयां ॥५७॥
नर वानर निशाचर । युद्ध करिती घोरांदर ।
ते मोक्षाचें निजमाहेर । कथा पवित्र श्रीरामे ॥५८॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटिकायां
रामशरबंधननिर्मुक्तिर्नामत्रयो दशोमोऽध्यायः ॥१३॥
ओंव्या ॥१५८॥ श्लोक ॥३१॥ एवं ॥१८९॥
