वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › ७८. नाममहिमा

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088111 · अभंग क्र. ७८

78.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय अठ्ठाहत्तरावा ॥
हनुमंत नंदिग्रामास गेला -

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

भरद्वाज ऋषींनी श्रीरामांचे विमान पाहिले :

विमानी बैसोनी रघुनाथा । अति त्वरान्वित जाता ।
तळी भरद्वाज अवचिता । आश्रमी असता देखिला ॥१॥
आश्रमी असता भरद्वाज ऋषी । आश्चर्य देखिले आकाशी ।
हेमच्छाया दशदिशी । चौपासी पसरली ॥२॥
रविचंद्रांतें लाजवीत । प्रकाश शीतोष्णातीत ।
गगनी काय असे जात । ऋषि मनांत विचारी ॥३॥
निर्धारोनि पाहे नयनी । तंव परिवारला वानरगणी ।
श्रीराम देखिला विमानी । जनकनंदिनी अंकावरी ॥४॥
सौमित्रासहित राम होये । सवे वानर कैचे हो हे ।
राक्षसगणही दिसती पाहे । श्रीराम होये सर्वथा ॥५॥
माझ्या श्रीगुरूच्या अनागता । श्रीराम न करी अन्यथा ।
निवटूनियां लंकानाथा । शरणागता स्थापिले ॥६॥
होय तो शरणागत पूर्ण । राक्षसांमाजी बिभीषण ।
हनुम्यासहित सुग्रीव जाण । वानरगणसमवेत ॥७॥
ऐसे श्रीरामाचे निजविमान । निजगुरूच्या भाष्यावरून ।
परीक्षा करोनिया पूर्ण । गुणाकार पूर्ण पाहिला ॥८॥

पूर्णे चतुर्दशे वर्षे पंचम्यां भरतायज: ।
भरद्वाजाश्रमं प्राप्य ववंदे जयतो मुनिम् ॥१॥
गोत्रं नाम समुच्चार्य राघव: सहलक्ष्मणः ।
प्रणतं राघवं दृष्ट्वा सानुजं पुनरब्रवीत् ॥२॥

विमानातून जाणार्‍या रामांना स्वतःची
ओळख देऊन भरद्वाजांनी आश्रमात बोलाविले :

माघ शुद्ध पंचमीपासून । वर्ताळा करिता लेखन ।
तंव चौदा वर्षें जाहलीं पूर्ण । व्रत संपूर्ण पै झाले ॥९॥
ऐसा निश्चय मानोनी मनी । रामसौमित्र लक्षूनी ।
लोटांगण घालूनी । अति प्रीतीकरोनी विनवीत ॥१०॥
भरद्वाजगोत्रोत्पन्न । भारद्वाज माझे अभिधान ।
श्रीराम । तुज अभिवंदन । दीनवचन परिसावे ॥११॥
स्वस्तिक्षेम विजययात्रा । केली निवटोनि दशवक्त्रा ।
तेणेंकरोनि रघुवीरा । चराचरां आनंद ॥१२॥
परम भाग्याचे आम्ही पूर्ण । जे पुनरागमनी रघुनंदन ।
नयनी देखिला संपूर्ण । सकळानुष्ठान फळा आले ॥१३॥
तू दीनाची माउली । आर्तश्रांताची साउली ।
निजजनां कल्पवल्ली । कृपा ओलावली तुझेनि ॥१४॥
तू शरणागता शरण्य । आर्तबंधु आर्तत्राण ।
मी तुझे निजदीन । करी पावन आश्रम माझा ॥१५॥
आश्रमा तुझे आगमन । तेणे सकळ कृतकल्याण ।
धर्मानुष्ठानाचे फळ पूर्ण । तुझे श्रीचरण देखोनी ॥१६॥
तुझेनि पावन आश्रम । तुझेनि पावन स्वधर्म ।
तुझेनि पावन स्वकर्म । सर्वोत्तम तुझेनि आम्ही ॥१७॥
घालोनिया लोटांगण । अत्यंत प्रीती रघुनंदन ।
विनवितांचि स्वये जाण । आला ठाकून प्रेमभावे ॥१८॥
श्रीराम प्रेमाचा पाहुणा । राम प्रेमाचा अंकित जाणा ।
प्रेमाचे पडिभरें पूर्णा । न म्हणे आपण कुळजाती ॥१९॥
हा तरी द्विज वर श्रेष्ठ । ऋषीश्वरांमाजी वरिष्ठ ।
भजनयुक्त स्वधर्मनिष्ठ । प्रेम उद्‌भट त्याहीवरी ॥२०॥
ऐसियाचें उपेक्षण । सर्वथा न करी रघुनंदन ।
तळी उतरिले विमान । सेवकजनसमवेत ॥२१॥

श्रीराम व भरद्वाजांची भेट :

येरें घातले लोटांगण । केले साष्टांग नमन ।
वेगे श्रीराम उचलोन । धरी आलिंगून हृदयेसीं ॥२२॥
श्रीरामे देतो आलिंगन । उडालें शून्याचे शून्यपण ।
देह झाला चैतन्यघन । जीवशिवपण नाठवे ॥२३॥
तैसेंचि श्रीरामासी पूर्ण । देता ऋषीसीं आलिंगन ।
श्रीरामा नाठवे रामपण । आनंद पूर्ण उथळला ॥२४॥
गूळ भेटे गोडियेसीं । ऋषिरामांची भेटी तैसी ।
येरामाजी येरू परिसेयीं । निजउल्लासीं निमग्न ॥२५॥
तया सुखाचे जाणते । दुजेपण कैचे पाहते ।
टकमक झाली सकळाते । चेतवी तेथे कोण कोणा ॥२६॥
तेणे काळे रघुनाथ । आपण आपणा सावध करित ।
एकाकी न रमते स द्वितीयमैच्छत । सत्य श्रुत्यर्थ केला रामे ॥२७॥
आपल्या आपण भक्तिसुख । स्वये भोगावें सम्यक ।
देव भक्त होवोनी एक । आलिंगन देख सोडिले ॥२८॥
सुटतां दोघांचें आलिंगन । सर्वदा नाही दोन्हीपण ।
तेणेंचि भावे श्रीरामगण । बिभीषणादि नमियेले ॥२९॥
जे सुख श्रीरामभेटीसी । इतरां आलिंगन तेणेंचि भावेंसीं ।
सर्वथा भेद मानसी । न दिसे बुद्धीसीं एकत्वे ॥३०॥
श्रीराम आणि सौमित्र जाण । सुग्रीवादि बिभीषण ।
हनुम्यासहित वानरगण । आलिंगिले श्रीरामभावें ॥३१॥
मांडिलें प्रीती पूजाविधान । विष्टरयुक्त वरासन ।
बैसवोनी रघुनंदन । षोडशोपचारी पूजिला ॥३२॥
तैसेचि सकळ सेवक । बिभीषणादि प्रमुख ।
भरद्वाजे एकाएक । अतिसम्यक पूजिले ॥३३॥

भरद्वाजांकडे भोजन करण्यास रामांचा भरताकरिता विनम्र नकार :

मुसे भोजना आज्ञापन । ते न मानीच रघुनंदन ।
कांही नेदीच प्रतिवचन । तेणे ऋषिवर जाण सचिंत ॥३४॥
ऋषि देखोनि चिंताक्रांत । विनविता झाला रघुनाथ ।
क्षमा करावी भोजनार्थ । प्रसन्नचित्त होवोनियां ॥३५॥
भरत उपवासी मजवीण । त्यजिला आहार जीवन ।
व्रत अंगीकारोनि दारुण । वनवास पूर्ण घेतला ॥३६॥
राजधानी सांडोनिया दूरी । वल्कलांबर जटाधारी ।
भूमिशायी निरंतरी । व्रतधारी पै झाला ॥३७॥
त्यासी सांडोनि आपण । चौदा वर्षेंपर्यंत जाण ।
सर्वथा नाही घेतलें अन्न । आजीच भोजन केंवी करणे ॥३८॥
तुम्ही साधु सर्वज्ञ । निजचित्तीं विवंचून ।
मज द्यावे आज्ञापन । तेंचि वचन मज वंद्य ॥३९॥
म्हणोनि श्रीरामे आपण । ऋषीस घातले लोटांगण ।
तेणे ऋषि विस्मयापन्न । स्वये रघुनंदन नमियेला ॥४०॥
पूर्णब्रह्म रघुनंदन । स्वये असोन आपण ।
वाढवीत भक्तमहिमान । दीनजनकृपाळु ॥४१॥
अहं भक्तपराधीन । ऐसे श्रुतिशास्त्रपुराण ।
ते दाविले साच करोन । भक्त महिमान वाढविलें ॥४२॥
राम भक्तांचा अंकिला । राम भक्तांचा विकला ।
राम भक्तांचा केला । सत्वर या बोला आणिले रामे ॥४३॥

निदान फळाहार तरी करावा अशी भारद्वाजांची रामांना आग्रहाची प्रार्थना :

ऐसी करोनिया विनवण । ऋषीने प्रार्थिला रघुनंदन ।
फळाहारा आज्ञापन । द्यावे आपण पै स्वामी ॥४४॥
म्हणोनि विनविला रघुपती । तेणे संतोषला निश्चिती ।
स्वये मानोनियां विनंती । निजचित्तीं विवंची ॥४५॥
विरक्त ब्राह्मण तपोधन । कष्टी फलाहारालागून ।
होऊं पाहे खेदक्षीण । याचेसूचन करावे ॥४६॥

रामांची मूक संमती. सर्व वनस्पती रसपूर्ण झाल्या :

ऐसे निजचित्तीं राघवें । धरितांचि निजस्वभावें ।
वनस्पती सर्वभावे । जीवे भावे वोळल्या ॥४७॥
सर्वकऋतु सर्व काळ । एके वेळे वोळले सकळ ।
वनस्पती फळ मूळ । रसकल्लोळ वोळला ॥४८॥
शुष्कें वोळलीं रसभारें । अफळें दाटली फळसंभारें ।
खाकरे होती जी निःसारे । ती कोमळांकुरें लसलसली ॥४९॥
सजीव निर्जीव तरुवर । अमृतरसे पै समग्र ।
अवघे वोळले एकत्र । बाप रघुवीर कृपाळू ॥५०॥
सरसे विरसें नीरसें । अवघी वोळलीं ब्रह्मरसें ।
लाघव केले राघवेशें । मुनि संतोषें वसावया ॥५१॥
हा अर्थ नेणोनि मुनी । राम विनविला फळभोजनीं ।
ऋषिवचना संतोषोनी । मस्तकी मानी श्रीराम ॥५२॥

अर्ध्यं च प्रतिग्रण्हीष्व श्वोऽयोध्यायां गमिष्यसि ।
तस्य तच्छिरसा वाक्यं प्रत्यगृण्हात्स राघव ॥३॥

श्रीराम भरद्वाजांची पूजा स्वीकारून प्रसन्न झाले :

स्वामी श्रीरामा परियेसीं । आता गेलिया अयोध्येसी ।
मागुता निजप्रीतीं देखिजेसी । ऐसे कोणासी भाग्य आहे ॥५३॥
हातींचा श्रीराम गेलिया । पुनरपि भेटेल गोष्टी वांया ।
संतोष मानी तो गिळिला माया । निजात्मघात स्वये केला ॥५४॥
यालागी रघुनंदना । कृपा करावी दीनजनां ।
यथाशक्ति पाद्यार्घ्य जाणा । केले ते प्रीतीनें अंगीकारीं ॥५५॥
ऐसी प्रीतिपूर्वक विनवण । ऐकोनिया रघुनंदन ।
अंगीकारिली प्रीतिकरोन । दीनजनकृपाळु ॥५६॥
फळे आणावया ऋषीश्वर । शिष्य धाडी जंव सत्वर ।
तंव आश्रम मनोहर । पुष्पी अपार लगडला ॥५७॥
सजीव निर्जीव वनस्पती । अमृतरसे वर्षताती ।
पाषाण तेही द्रवती । श्रीरधुपतिनिजकृपा ॥५८॥
तेणे अति संतोष मानसी । श्रीरामे कृपा केली ऐसी ।
आश्रमचि रामपूजेसीं । सकळ सिद्धीसीं वोळला ॥५९॥
फळे तोडोनि अति प्रीती । कर्षीने आणिली शीघ्रगती ।
सहित वानरांच्या पैकी । श्रीरधुपति सुखावला ॥६०॥

वर देण्याची रामांची इच्छा :

विधियुक्त फळभोजन । ऋषीनें संपादिलें पूर्ण ।
तेणे संतोषला रघुनंदन । माग वरदान म्हणे द्विजा ॥६१॥
ऐकोनि वरदाचें वचन । ऋषि संतोषी निमग्न ।
घालोनिया लोटांगण । काय आपण विनवित ॥६२॥
ऐके स्वामी रघुनाथा । तंवचि वासनेची वार्ता ।
तंवचि मागणियाची कथा । जंव भेटी तत्वता नाही तुझी ॥६३॥
तंवचि आटाआटी साधनांची । तंवचि खटपट तीर्थाची ।
तंवचि उठाउठी व्रताची । भेटी रामाची जंव नाही ॥६४॥
तंवचि वासना अनिवार । तंवचि मनाचा महामार ।
तंवचि इंद्रियें दुर्निवार । जंव रघुवीर न देखती ॥६५॥
तंवचि विषय दारुण । तंवचि ऐकिजे अधःपतन ।
तंवचि बाधा जन्ममरण । जंव रघुनंदन न देखिजे ॥६६॥
दृष्टी देखता रघूत्तम । सर्वांगी वोळंगती सकळ काम. ।
मागणे निमाले निःसीम । पूर्णकाम मनोरथ ॥६७॥
असो दर्शनाची कथा । श्रीरामनाम आठवितां ।
पूर्णकाम मनोरथा । श्रीरघुनाथा तुझेनि नामे ॥६८॥
भक्तकामकल्पद्रुम । तो भेटतां रघूत्तम ।
आन इच्छी मनोधर्म । ऐसा अधम कोण आहे ॥६९॥
सावध ऐक कृपानिधी । होता तुझी आगमनविधी ।
आश्रमी वोळंगती सकळ सिद्धी । मागणे बुद्धि विसरली ॥७०॥

निर्विषयचित्त होऊन सतत रामस्मरण घडावे
अशी भरद्वाजांची मागणी. तसे रामांनी वरदान दिले :

प्रसन्न होऊनि निश्चिती । माग म्हणता रघुपती ।
हेंचि मागणे पुढतपुढती । जे विषय चित्ती रुही नेदीं ॥७१॥
निर्विषय निरभिमान । निर्विकल्प तुझे भजन ।
सर्वा भूतीं समसमान । द्यावे अनवच्छिन्न सर्वकाळ ॥७२॥
कृपाळुवा रघुनाथा । आणिक न मागे जी सर्वथा ।
म्हणोनि चरणी ठेविला माथा । अति अवस्था मुनिवरा ॥७३॥
ते देखोनि रघुनाथ । उचलोनि हृदयी आलिंगित ।
तेणे निर्विषय झाले चित्त । सुख अद्‌भुत उथळले ॥७४॥
आधींच तपोधन ऋषी । श्रीरामी प्रेमा अहिर्निशीं ।
वरी देता आलिंगनासी । निर्विषयसुखासी पावला ॥७५॥
सुख पावतां मुनिवर । अवघे झाले आल्हादपर ।
बाप कृपाळु रघुवीर । नामे वानर गर्जती ॥७६॥
देवोनियां ऋषीस वरदान । अस्तु म्हणे रघुनंदन ।
तेणे ऋषि सुखसंपन्न । केले नमन साष्टांगीं ॥७७॥

तेथून स्वतः अयोध्येस जाण्यापूर्वी रामांनी
हनुमंतास पुढे जाऊन कळविण्यास सांगितले :

करावया अयोध्यागमन । श्रीराम करी विवंचन ।
चौदा वर्षें लोटलीं पूर्ण । झाले उल्लंघन मर्यादे ॥७८॥
माझेनि वियोगें भरता । होत असेल अति चिंता ।
मर्यादा लोटली तत्वता । सांडील सर्वथा देहासी ॥७९॥
यालागोनि पै पहिलें । वृत्त पाहिजे पाठविले ।
हनुमंतासी पाचारिलें । आज्ञापिले अति शीघ्र ॥८०॥

मतिमंतं हजुमंतमिदं वचनमब्रवीत् ।
अयोध्यामद्य एव त्वं गच्छ तूर्णं वनेचर ॥४॥
शृंगवेरपुरं प्राप्य गुहं गहनगोचरम् ।
वृत्तं निषादपतये वक्तव्यं वचनान्मम ॥४॥

जाताना मार्गात शृंगवेरपुरास गुहकास वृत्त सांगण्यास सुचविले :

जो बुद्धीचा सागरू । भावार्थाचा महामेरू ।
आज्ञेचा तरी किंकरू । महावीरू हनुमंत ॥८१॥
तयासी बोलावोनि रघुपती । सांगता झाला अति प्रीती ।
तुवा जावोनि अयोध्येप्रती । आगमनस्थिती सांगावी ॥८२॥
वनवासींचा समाचार । रावणवधाचें चरित्र ।
बंदिमुक्त सुरवर । वृत्त समग्र सांगावे ॥८३॥
गुहक आमुचा निजमित्र । मार्गी त्याचे आहे नगर ।
नामे शंगवेरपुर । त्यासी सत्वर भेटावे ॥८४॥
सांगतो आमुचे आगमन । होईल सुखे संपन्न ।
पावोनिया समाधान । तुझे पूजन करील ॥८५॥
तेथोनि पुढारे गमन । अति वेगे करोनि जाण ।
घ्यावे भरताचे दर्शन । वृत्त संपूर्ण सांगावे ॥८६॥
भरत आमुचा अनुरक्त । सर्वथा संदेह नाही येथ ।
तरी राजनीतिलौकिकार्थ । पहावे व्रत भरताचे ॥८७॥

ज्ञेयाः सवे च वृत्तांता भरतश्चेंगितानि च ।
सत्वेन मुखवर्णेन दृष्टिव्याभाषितेन च ॥६॥

भरताचे चिन्ह पाहून त्याला माझ्या आगमनाची वार्ता
सांगावी व सत्वर निघून यावे असे राम मारुतीला सांगतात :

राज्यलोभाची जाती पाही । धर्माधर्म नाठवे कांही ।
ज्येष्ठाचा तेथे पाड कायी । अंध लवलाही बुद्धि होय ॥८८॥
राज्यभोग देखता पुढे । मन होवोनि ठाके वेडें ।
साखरेवरोनि माशी नुडे । तेंवी जडे विषयार्थी ॥८९॥
भरताचे पित्रार्जित । राज्य आहे पितृदत्त ।
जरी झाला लोलुप्त । तरी निश्चित देऊ त्यासी ॥९०॥
धर्ममर्यादा आहे ऐसी । जेथे जेथे प्रीत जयासी ।
ते ते अर्पावे तयासी । हेंचि साधूंचे निजव्रत ॥९१॥
राज्यलोभ तत्वता । आम्हासी नाही सर्वथा ।
चिन्ह पाहोनिया भरता । राज्य निश्चित देवो त्यासी ॥९२॥
धर्ममर्यादा ऐसी जाण । शीघ्र पाहोनि याचे चिन्ह ।
काय ते चिन्हाचें लक्षण । ऐक सांगेन संकेत ॥९३॥
दृष्टी देखतांचि प्रियासी । हर्ष दाटे सर्वांगासी ।
रोमांच उभवोनि उल्लासी । गुढी चौपासी उभविती ॥९४॥
शीघ जावोनि आपण । काय ते ओळखावें चिन्ह ।
आमुचेंही आगमन । करी निवेदन भरतासी ॥९५॥
अंतरींचिया प्रेमावस्था । कंठी बाष्प दाटतां ।
देह नावरे सर्वथा । पडे तत्वता मूर्च्छित ॥९६॥
अंतरी प्रेमा अनिवार जाण । तरी हे बाह्य प्रकटे चिन्ह ।
अंतरी प्रीति नसतां पूर्ण । बाह्म चिन्ह प्रकटेना ॥९७॥
ऐसी पाहोनि विवंचना । शीघ्र यावे वायुनंदना ।
तदनुसार अयोध्ये जाणा । करू गमना अति प्रीती ॥९८॥

इति प्रीतिसमादिष्टो हनूमान्मारुतात्मजः ।
अथोत्पतात वेगेन बलवान्कपिकुंजरः ॥७॥

रामाज्ञेप्रमाणे हनुमंताने उड्डाण केले :

ऐकोनिया श्रीरामवचन । अनायासें प्रेमचिन्ह ।
श्रीराममुखें करून । हनुमंते आपण ऐकिलें ॥९९॥
म्हणोन घातले लोटांगण । करोनि प्रदक्षिणा नमन ।
भरतदर्शनीं प्रेम गहन । केले उडाण अति वेगे ॥१००॥
गरुडवेग पवनवेग । लाजवीत मनोवेग ।
हनुमान चालिला सवेग । अतिबळवेग मारुती ॥१०१॥

शृंगवेरपुरं प्राप्य गुहमासाद्य वीर्यवान् ।
वाचा तं शुभया हर्षाद्धनूमानिदमब्रवीत् ॥८॥

हनुमान शृंगवेरपुराला आला :

नामबळें अनिवार । उडाण केले वेगवत्तर ।
गगन आक्रमिले समग्र । शृंगवेरपुर पावला ॥१०२॥
गुहकद्वारीं कपिकुंजर । रामनामे भुभुःकार ।
हनुमंते केला वेगवत्तर । तेणे समग्र गजबजिले ॥१०३॥
अति दीर्घ रामनामध्वनी । कोणा भाग्यपुरुषाची वाणी ।
गर्जिन्नली दीर्घस्वरेकरोनी । नादें अवनी दुमदुमिली ॥१०४॥
ज्याचे मुखीं नामोच्चारण । तो जाण श्रीरामासमान ।
येविषयीं श्रुतिपुराण । बाहु उभवोन गर्जती ॥१०५॥

हृदि रूपं मुखे नाम नैवेद्यमुदरे हरेः ।
पादोदकं व निर्माल्यं मस्तके यस्य सोऽस्तुतः ॥९॥

रामभक्तांचे लक्षण :

पार्थिवशरीरें जाण । जे झाले श्रीरामासमान ।
ऐक त्या भक्तांचें लक्षण । सावधान सुचिन्हीं ॥१०६॥
मनी सतत भरली मूर्ती । चित्ते चिंतन अहोरात्री ।
बुद्धीचा निश्चय रघुपती । संसारस्कृर्ती सांडोनिया ॥१०७॥
देहाचे ठायी अहंकार । झाला होता दृढोत्तर ।
त्यासी गुरुवचन निजसार । पावतां सत्वर परतला ॥१०८॥
देहाचे ठायी त्रिशुद्धी । दृढ होती अहंबुद्धी ।
तीते जाळोनि सोहंसिद्धी । निजानंदीं प्रकटली ॥१०९॥
नित्य निर्माल्य मिरवे शिरी । चरणतीर्थ अभ्यंतरीं ।
हरिप्रसाद त्याच्या उदरी । तो मूर्तिधारी श्रीराम ॥११०॥
त्यासी दृश्यमाजीं पूर्ण । सहजीं भासे रघुनंदन ।
ज्याचे अंतर जेथे निमग्न । तेंचि भान तयासी दिसे ॥१११॥
अतिशये उल्लासेंसी । नाम गर्जत आवेशेसी ।
रामरूप तो निश्चयेसी । चला भेटीसीं जाऊ तया ॥११२॥
ऐकोनि रामनामाची ध्यनी । अद्यापि प वचों भेटीलागूनी ।
अधम ऐसे आम्हांलागूनी । आन कोणी असतिना ॥११३॥

रामभक्त मारुतीच्या दर्शनासाठी गुहक आला.
त्याला रामांची माहिती गुहकाने विचारली :

ऐसा करोनि विचार । श्रीरामप्रेमें वेगवत्तर ।
बाहेरी आले जी समग्र । तंव कपींद्र देखिला ॥११४॥
वानर होवोनि मनुष्याची वाणी । श्रीरामनाम त्याच्या वदनी ।
अति प्रचंड दिसे नयनी । श्रीरामगुणीं भरलासे ॥११५॥
अति प्रचंड विख्यात । श्रीरामप्रेमें ओतिला दिसत ।
तेणे गुहक हर्षभरित । प्रीती घालित लोटांगण ॥११६॥
प्रेमयुक्त अंतःकरण । ऐकोनिया नामस्मरण ।
करोनि साष्टांगीं नमन । पुसे चिन्ह कपीसी ॥११७॥
स्वामी तुम्ही कोठील कोण । मुखी नामाचे उच्चारण ।
वानरी तनु काय कारण । येणे कोठून झाले स्वामी ॥११८॥

मारुतीने रामकथा थोडक्यात गुहकाला सांगून
रामांच्या आगमनाची शुभवार्ता त्याला सांगितली :

ऐकोनि प्रीतिमंजुळ वचन । श्रीरामी प्रेमा गहन ।
तेणे हनुमान सुखैकघन । लोटांगणें विनवित ॥११९॥
संपवोनि वनवासव्रत । करोनि राक्षसांचा निःपात ।
जनस्थान करोनि मुक्त । द्विजदानार्थ दिधले रामे ॥१२०॥
वधूनि रावण कुंभकर्ण । विजयी झाला रघुनंदन ।
सुरवरांचें बंदिमोचन । न लागता क्षण पै केले ॥१२१॥
सूरच देवोनि त्रिभुवना । सहित जानकीलक्ष्मणा ।
करोनि विमानी रोहणा । पैल जाणा येताती ॥१२२॥
शरणागत दोघे जण । सुग्रीव आणि विभीषण ।
अपरिमित वानरसैन्य । नामे त्रिभुवन गर्जत ॥१२३॥
राक्षसांसी देवोनि मुक्ती । रामे उद्धरिली त्रिजगती ।
नामे महापातकियां गती । अगाध कीर्ति रामाची ॥१२४॥
वानर वनचर पालेखाईर । केवळ श्रीरामाचे किंकर ।
माझे नाम हनुमान वीर । गुढी सत्वर घेवोनि आलो ॥१२५॥
तुम्ही श्रीरामाचे निजगण । म्हणोनि श्रीरामे आपण ।
कळवावया निजगमन । गुढी देवोन पाठविले ॥१२६॥
आता स्वस्ति! असो तुम्हांसीं । येता भेटी श्रीरामासी ।
मज जाणे अयोध्येसी । गुढी भरतासी सांगावया ॥१२७॥
ऐकोनि हनुमंताचे वचन । गुहकें घातले लोटांगण ।
वृत्त न सांगतो संपूर्ण । केंवी प्रयाण करा स्वामी ॥१२८॥

एवमुक्तस्तु स गुहः संपरिष्वज्य तं कपिम् ।
हर्षेण महताविष्टस्तं हरिं पर्यपृच्छत ॥१०॥
क्व राम: क्व च वैदेही बुद्धिमांश्व क्व लक्ष्मण: ।
ह्लावितोऽस्मि त्वया सार्धं जलौघेनेव मेदिनी ॥ ११ ।

राम -लक्ष्मण -सीता यांच्याबद्दल गुहकाची पृच्छा :

घालोनिया लोटांगण । विधियुक्त करोनिया पूजन ।
करिता झाला विनवण । रामलक्ष्मण कोठे स्वामी ॥१२९॥
काय सांगों त्यांची महती । निराहारी रघुपती ।
स्वये निघाला वनाप्रती । सांडोनि निश्चिती पादत्राण ॥१३०॥
कोठे आहे रघुपती । लवकरी सांग मजप्रती ।
सखा सौमित्र तदनुवृत्ती' । अनुपम ख्याती तयाची ॥१३१॥
श्रीरामसेवेच्या आदरा । वीरे त्यजिली निद्रातंद्रा ।
तुच्छ करोनिया शरीरा । निःशेष आहारा त्यजियेले ॥१३२॥
कोठे आहे ती जानकी माता । श्रीरामसेवेलागी तत्वता ।
बाळपणी तापसता । अति निसुरता धरियेली ॥१३३॥
विमान देखिले अंबरीं । आम्हांसी न दिसे अद्यापिवरी ।
सांग काय झाले परी । दीर्घस्वरीं आक्रंदे ॥१३४॥

मारुतीने गुहकाचे सांत्वन करून याच
मार्गाने श्रीराम येतील असे त्याला सांगितले :

देखोनि त्याचा प्रेमभावो । हनुमंत उचंबळला पहाहो ।
गुहका शांत होवोनि महाबाहो । रामागमन सांगत ॥१३५॥
मार्गी येता विमान । भरद्वाज अनन्यशरण ।
होवोनियां रघुनंदन । अति प्रीतीकरून प्रार्थिला ॥१३६॥
तेथे क्रमोनियां आजिची राती । सर्वथा आता विमानस्थितीं ।
सहित सौमित्र सीता सती । येईल रघुपति येणे मार्गे ॥१३७॥
सौमित्रे अद्यापि जाण । स्पर्शिले नाही अन्न ।
अस्थिमात्र जानकी जाण । स्वये आपण उरलीसे ॥१३८॥
श्रीरामाची गोष्टी पाहे । सर्वथा मज सांगता नये ।
ऐशा रीती आली पाहे । त्रैलोक्यी विजय करोनिया ॥१३९॥
तुमच्या भाग्याची सीमा । सर्वथा करिता नये आम्हा ।
नित्य स्मरण रघूत्तमा । तुमचा प्रेमा अनुवादे ॥१४०॥
श्रीरामाचे करिती स्मरण । ते आम्हांसी पूज्य जाण ।
म्हणोनि घातले लोटांगण । स्वये उल्लाण करिता झाला ॥१४१॥

स गत: शीघ्रमध्यानं महात्मा कपिकुंजरः ।
आससाद द्रुमान्फुल्लान् नंदिग्राम समंततः ॥१२॥

गुहकाचा निरोप घेऊन मारुती नंदिग्रामाला पोचला :

हनुमंताचे उहुाण । गुहकें स्वये देखोनि जाण ।
करोनि साष्टांगें नमन । आनंदमग्न पै झाला ॥१४२॥
श्रीरामागमसुख जाण । त्यापुढे तुच्छ ब्रह्मसदन ।
येणे हरिखें अवघे जण । निषादगण नाचती ॥१४३॥
येरीकडे हनुमंत । पवना मनातेंही लाजवित ।
वेगे चालिला त्वरित । आक्रमीत गगनातें ॥१४४॥
अति बळियाढा कपिकुंजर । मार्ग क्रमोनि सत्वर ।
पातला नंदिग्राम नगर । महावीर भरत जेथे ॥१४५॥

नंदिग्रामातील राममय झालेले वातावरण :

श्रीरामागमनवसंत । मूर्त पातला हनुमंत ।
तेणे वनश्री शोभत । अति अद्‌भुत पुष्पी फळी ॥१४६॥
अफळें आली फळासी । निरंकुरें अंकुरासी ।
निरसे आली रसासीं । निर्जीव जीवेसी उठली ॥१४७॥
आला जाणोनि रघुनाथ । अष्टमहासिद्धि धांवत ।
सत्वर पातलिया तेथ । हर्षे नाचत येवोनी पुढे ॥१४८॥
तेणे मंडित नगर । सकळ लोक भजनपर ।
श्रीरामध्यानीं अति तप्तर । इंद्रियाचार तद्‌रूप ॥१४९॥
एक करिती हरिकर्तिन । अर्थमय होवोनी पूर्ण ।
गाता श्रीरामाचे गुण । प्रेमा जाण नावरे ॥१५०॥
प्रेमे युक्त अंतःकरणा । पदी गातो रघुनंदन ।
अंतरी ठसावे चिन्ह । होती जाण तद्‌रूप ॥१५१॥
अलोट कीर्तनाचे सुख । अवघे होती तदात्मक ।
एक होती रघुकुळटिळक । एक दशमुख पै होती ॥१५२॥
छेदोनिया श्रीरामाच्या बाणी । शिरे अर्पिती श्रीरामचरणीं ।
तंव तंव उल्लास अंतःकरणी । प्रेमेंकरोनि डुल्लत ॥१५३॥
ऐका श्रोते पै सर्वज्ञ । करिती श्रीरामनामश्रवण ।
अर्थामाजी होवोनि निमग्र । करिती गर्जन रामनामे ॥१५४॥
पदव्युत्पत्ती कीर्तन । कळा विन्यास ठाणमान ।
देखता ठसावे ज्ञान । तटस्थ पूर्ण तेणे होती ॥१५५॥
ऐसे श्रीरामाचे भक्त । अवघे नगर समवेत ।
धन्य आचार्य भरत । श्रीरधुनाथ निजभजनें ॥१५६॥
ते देखोनि हनुमान जाण । झाला अत्यंत सुखसंपन्न ।
एका जनार्दना शरण । अमृतपान रामकथा ॥१५७॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
हनुमंतनंदिग्रामाभिगमनं नाम अष्टसप्ततितमोऽध्यायः ॥७८॥
॥ ओंव्या १५७ ॥ श्लोक १२ ॥ एवं १६९ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग